DNA मराठी

Maharashtra

rain

Maharashtra Rain Alert: अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’

Maharashtra Rain Alert: भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यात १८ व १९ जुलै रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता वर्तविल्याने जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यास भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी यांनी केले आहे. १७ जुलै रोजी दुपारी १२ वाजता दौंड पुलाजवळ भीमा नदीत ३,४७२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यास किंवा धरणांमधून पाणी सोडल्यास भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी पाणीपातळी वाढल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे वा नाल्यांवरील पूल पाण्याखाली गेल्यास ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. धरण व नदी परिसरात जाणाऱ्या पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी. पाण्यात उतरू नये तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी अथवा छायाचित्रे काढू नयेत. मेघगर्जना होताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडांखाली, मोकळ्या मैदानात, टॉवर, ध्वजाचे खांब, विजेचे खांब, धातूचे कुंपण वा विद्युत रोहित्राजवळ थांबू नये. लोंबकळणाऱ्या तारांपासून दूर राहावे. विजा चमकत असताना विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. तसेच ट्रॅक्टर, शेतीची अवजारे व दुचाकींपासून दूर राहावे. जाहिरात फलक कोसळून होणारे अपघात टाळण्यासाठी फलकांच्या आजूबाजूला थांबू नये. विजा चमकत असताना उघड्यावर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हातांनी कान झाकावेत व डोके दोन्ही गुडघ्यांमध्ये ठेवावे, जेणेकरून जमिनीशी कमीत कमी संपर्क राहील. अतिवृष्टीमुळे भूस्खलनाची शक्यता असल्याने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी वेळीच सुरक्षित ठिकाणी जावे. तसेच घाट रस्त्याने प्रवास करणे टाळावे. जुनाट वा मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये आश्रय घेऊ नये. सर्व नागरिकांनी वादळी वारे, वीज व पाऊस यांपासून स्वतःचे तसेच जनावरांचे रक्षण करावे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्याशी, तहसील कार्यालयाशी अथवा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाशी ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४०, ११२ किंवा १०७७ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Maharashtra Rain Alert: अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’ Read More »

devendra fadnavis

Sharad Pawar : शरद पवार महायुतीच्या वाटेवर? मंत्रिपदाचा फॉर्मुलाही ठरला

Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून, त्यांचा पक्ष महायुतीत सहभागी होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार गटाने महायुतीत प्रवेश केल्यास मंत्रिमंडळात त्यांच्या गटाला प्रतिनिधित्व मिळू शकते. त्यासाठी संभाव्य मंत्रिपदांच्या वाटपावरही चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. जयंत पाटील यांच्यासह काही वरिष्ठ नेत्यांची नावे संभाव्य मंत्रिपदासाठी चर्चेत असल्याचे बोलले जात असले, तरी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही नेत्यांच्या भेटीगाठींमुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) किंवा महायुतीतील प्रमुख नेत्यांकडून याबाबत कोणतेही स्पष्ट संकेत देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या सर्व घडामोडी केवळ राजकीय चर्चेच्या पातळीवर असल्याचे मानले जात आहे. राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे आगामी काळात सत्तासमीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार, संभाव्य पक्षप्रवेश आणि नव्या राजकीय आघाड्यांबाबतचा निर्णय येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar : शरद पवार महायुतीच्या वाटेवर? मंत्रिपदाचा फॉर्मुलाही ठरला Read More »

eknath shinde

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; मोफत साडी योजना बंद

Eknath Shinde : राज्य सरकारने अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील महिलांना दरवर्षी मोफत साडी देण्याची योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत अंत्योदय रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना वर्षातून एकदा मोफत साडी देण्यात येत होती. मात्र आता सरकारने ही योजना पुढे न राबवण्याचा निर्णय घेतल्याने लाभार्थी महिलांना यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांनी हा निर्णय महिलांविरोधी असल्याची टीका केली असून, गरजू महिलांसाठी सुरू केलेली योजना बंद करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले आहे. दुसरीकडे, सरकारकडून विविध कल्याणकारी योजनांचे पुनर्मूल्यांकन करून आर्थिक शिस्त राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याआधीही सरकारने विविध योजनांमध्ये फेरबदल केले असून, लाभार्थ्यांची पडताळणी आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यावर भर दिला आहे. मोफत साडी योजनेच्या बंदीनंतर संबंधित लाभार्थी महिलांना आता या योजनेतून कोणताही लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारच्या या निर्णयाचे परिणाम आगामी काळात राजकीय आणि सामाजिक स्तरावर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; मोफत साडी योजना बंद Read More »

sunetra pawar

Sunetra Pawar: गुप्त बैठकीवरून राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांनी तटकरे यांना विचारला जाब

Sunetra Pawar : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल पटेल यांनी भेट घेतल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत नाराजी उघड झाल्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या बैठकीची माहिती आपल्याला देण्यात आली नव्हती, याबाबत सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त करत जाब विचारल्याचे वृत्त आहे. माहितीनुसार, या बैठकीला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वातील काही महत्त्वाच्या व्यक्तींना या बैठकीची पूर्वकल्पना नसल्याने पक्षात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. या घडामोडीनंतर सुनेत्रा पवार यांनी थेट तटकरे यांच्याकडे याबाबत स्पष्टीकरण मागितल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सुनील तटकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देताना कोणताही वाद नसल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, हा केवळ गैरसमज असून बैठकीबाबत कोणताही गुप्त अजेंडा नव्हता. प्रफुल्ल पटेल यांनी त्यांना ‘देवगिरी’ येथे बोलावले होते आणि त्यानंतर पुढील घडामोडी झाल्या, असे त्यांनी स्पष्ट केले. अलीकडील काही दिवसांत सुनेत्रा पवार यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडीवरूनही पक्षात मतभेद समोर आले होते. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सार्वजनिकरीत्या पक्षात कोणतीही फूट नसल्याचा दावा केला असला, तरी या नव्या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संवाद आणि समन्वयावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Sunetra Pawar: गुप्त बैठकीवरून राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांनी तटकरे यांना विचारला जाब Read More »

vilas ghule case

Vilas Ghule : विलास घुले प्रकरणाला नवे वळण; उमेश मानेविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल

Vilas Ghule : केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, ज्याला वाचवण्यासाठी विलास घुले यांनी धाव घेतली होती, त्या उमेश मानेविरुद्ध आता अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि धमकावल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घडामोडीमुळे संपूर्ण प्रकरणाचा तपास नव्या दिशेने सुरू झाला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, उमेश माने याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करून त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तो वारंवार तिचे ब्लॅकमेलिंग करत होता. त्रास असह्य झाल्यानंतर महिलेने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीय पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना त्यांना धमकावून परावृत्त करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. महिलेने केलेल्या आरोपानुसार, त्यानंतरही तिचा छळ सुरूच राहिला. विलास घुले आणि उमेश माने हे वारंवार घराजवळ येऊन धमक्या देत होते. अखेर संबंधितांना समजावून सांगण्यासाठी दोन्ही बाजूंची भेट झाली. मात्र, तेथे झालेल्या हाणामारीत विलास घुले यांचा मृत्यू झाला. पीडित महिलेच्या कुटुंबाने हा प्रकार स्वसंरक्षणात घडल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या प्रकरणात यापूर्वीच अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता उमेश मानेविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने तपासाचे स्वरूप अधिक व्यापक झाले असून, पोलीस सर्व आरोपांची सखोल चौकशी करत आहेत.

Vilas Ghule : विलास घुले प्रकरणाला नवे वळण; उमेश मानेविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल Read More »

shrikant shinde

Shrikant Shinde : केंद्रीय मंत्रिमंडळ श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट तर ओमराजे निंबाळकर राज्यमंत्री?

Shrikant Shinde : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव कॅबिनेट मंत्रिपदासाठी जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यांच्या नावाला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचीही पसंती असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, राज्यमंत्रीपदासाठी शिवसेनेत रस्सीखेच सुरू असून ओमराजे निंबाळकर, संजय जाधव आणि संजय दिना पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. नुकतेच ठाकरे गटातून शिंदे गटात दाखल झालेल्या सहा खासदारांपैकी एका नेत्याला ही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत होणाऱ्या संभाव्य बैठकीमुळे या चर्चांना अधिक वेग आला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्यानंतर पक्षाच्या खासदारांची संख्या १३ वर पोहोचली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वाधिक खासदार असलेला पक्ष म्हणून शिवसेनेचे केंद्रातील राजकीय वजन वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाला अतिरिक्त मंत्रिपदे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार आणि संभाव्य मंत्र्यांच्या नावांबाबत अद्याप केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता दिल्लीतील घडामोडींवर लागल्या आहेत.

Shrikant Shinde : केंद्रीय मंत्रिमंडळ श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट तर ओमराजे निंबाळकर राज्यमंत्री? Read More »

sujay vikhe

Sujay Vikhe: एकतर्फी कारवाईमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय… सुजय विखे स्पष्टच बोलले

Sujay Vikhe : नगर–मनमाड महामार्गावरील सावळीविहीर जंक्शन येथे सुरू असलेल्या रस्ते व उड्डाणपुलाच्या कामामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी पुढील तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात दूर केली जाईल. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित ठेकेदार, पोलीस प्रशासन आणि परिसरातील ग्रामस्थ यांच्या संयुक्त बैठकीत सविस्तर कृती आराखडा निश्चित करण्यात आला असून, गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू पूर्ण करून वाहतुकीसाठी खुली केली जाईल, अशी माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. सावळीविहीर येथे नगर–मनमाड महामार्गाचे काम आणि राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम एकाच ठिकाणी सुरू असल्याने वाहतुकीवर दुहेरी ताण आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. विखे पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नाशिक विभागातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, नगर विभागाचे अधिकारी, संबंधित ठेकेदार, पोलीस प्रशासन तसेच सावळीविहीर, सावळीविहीर बुद्रुक, निमगाव, निगोंज आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेतली. तसेच पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध पर्यायी उपायांवर चर्चा करण्यात आली. अवजड वाहनांसाठी स्वतंत्र नियोजन, कामाचा वेग वाढविणे, वाहतुकीचे योग्य नियमन आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी पुढील तीन दिवसांत करण्यात येणार असून, त्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला. धुळीच्या समस्येबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, रस्त्याच्या भरावावर वारंवार पाणी टाकल्यास तो कोरडा होत नाही आणि त्यावर डांबरीकरण करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत भविष्यात रस्ता खचण्याचा धोका निर्माण होतो. राहुरी परिसरातील काही रस्त्यांवर घाईत काम केल्यामुळे अशा समस्या निर्माण झाल्याचा दाखला देत त्यांनी सांगितले की, दर्जेदार आणि टिकाऊ रस्ता व्हावा यासाठी काही दिवस धुळीचा त्रास सहन करावा लागेल. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे काम कायमस्वरूपी दर्जेदार व्हावे, हीच प्रशासनाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुपौर्णिमेपूर्वी उड्डाणपुलाच्या शेवटापासून बायपासच्या सुरुवातीपर्यंत रस्त्याची एक बाजू पूर्ण करण्यात येणार असून ती वाहतुकीसाठी खुली केली जाईल. दुसरी बाजू वाहतुकीसाठी मोटरेबल ठेवण्यात येईल. गुरुपौर्णिमेनंतर दुसऱ्या बाजूच्या कामाला गती देण्यात येईल, असा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. रस्त्याच्या मध्यरेषेपासून १५ मीटरच्या हद्दीत येणारी सर्व अतिक्रमणे दोन दिवसांत स्वेच्छेने हटवावीत, असे आवाहन करत त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, मुदतीनंतर पोलीस प्रशासनाच्या मदतीने कारवाई करून सर्व अतिक्रमणे हटविण्यात येतील. या अतिक्रमणांमध्ये काही मंदिरे, टपऱ्या आणि इतर बांधकामांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. ठेकेदारावर होत असलेल्या टीकेबाबत बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, संबंधित ठेकेदाराची नियुक्ती केंद्र शासनाने केली आहे. तो कोणाचाही नातेवाईक किंवा ओळखीचा व्यक्ती नसून, त्याच्याकडून दर्जेदार काम करून घेणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. कामात त्रुटी आढळल्यास त्या निश्चितपणे दुरुस्त केल्या जातील; मात्र अधिकारी आणि ठेकेदारांशी अरेरावी करून प्रश्न सुटणार नाहीत. उलट ठेकेदाराने काम सोडले तर प्रकल्प आणखी विलंबित होईल, याचाही विचार नागरिकांनी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. “दहा वर्षांपासून या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. आता प्रत्यक्षात काम सुरू झाले आहे. त्यामुळे संयम ठेवून दर्जेदार काम पूर्ण होऊ देणे गरजेचे आहे. चुका झाल्यास त्या दुरुस्त केल्या जातील, पण विकासकामांना अडथळा निर्माण होणार नाही याचीही सर्वांनी काळजी घ्यावी,” असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी आणखी एक महत्त्वाची बाब अधोरेखित करत सांगितले की, या कामासाठी सुमारे ४० टक्के कमी दराने ठेका स्वीकारणारा ठेकेदार मिळाला आहे. स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रकारच्या टक्केवारीची मागणी नसल्याने कामाला गती मिळाली आहे. ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होतात, तेथे विकासकामे वर्षानुवर्षे रखडतात, अशी टिप्पणीही त्यांनी केली. दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेल्या दूध भेसळविरोधी कारवाईबाबतही डॉ. सुजय विखे पाटील यांनी भूमिका मांडली. भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, या भूमिकेला त्यांनी स्पष्ट पाठिंबा दिला. मात्र, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी प्रशासनाने सखोल पडताळणी करणे आवश्यक असून, चुकीच्या पंचनाम्यांमुळे किंवा एकतर्फी कारवाईमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या कारवायांना मिळत असलेल्या प्रसिद्धीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “यापूर्वीही संबंधित अधिकारी अशा कारवाया करत होते. मात्र, आता अचानक या कारवायांना एवढी प्रसिद्धी का मिळत आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित करत, प्रशासनाने निष्पक्ष, पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केल.

Sujay Vikhe: एकतर्फी कारवाईमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय… सुजय विखे स्पष्टच बोलले Read More »

shrirampur band

Shrirampur Band : गुन्हेगारी विरोधात आज श्रीरामपूर बंद…

Shrirampur Band : श्रीरामपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावरती उच्छाद मांडला असून खून मारामाऱ्या अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे यातच श्रीरामपूर मधील एका हॉटेल मालकाच्या हत्येमुळे शहरात एकच खळबळ उडाली वाढती गुन्हेगारी विरोधात श्रीरामपूर शहरांमध्ये आज बंद पाळण्यात आला असून यामध्ये नागरिक व्यापारी व राजकीय नेत्यांनी या बंदमध्ये सहभाग घेतला आहे. श्रीरामपूर मधील हॉटेल मालक आकाश दुबय्या यांच्या भर दिवसा घडलेल्या हत्याकांडामुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे शहरात वाढती गुन्हेगारी व या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा यासाठी आज सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी स्वतःहून कडकडीत बंद पाळला असून आमदार हेमंत उगले नगराध्यक्ष करण ससाने यांच्यासह स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी फेरी काढून गुन्हेगारांचा विमोड करण्यासाठी साथ द्यावी असं आव्हान देखील केला आहे. तसेच शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुक्का अंतर्गत कारवाईचे करण्यात यावी अशी मागणी देखील पोलीस प्रशासनाला करण्यात आली आहे दरम्यान आकाश यांच्या कुटुंबीयांनी संबंधित गुन्हेगारावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली तरी जोपर्यंत प्रत्यक्ष कारवाई होत नाही तोपर्यंत श्रीरामपूर शहर बंद राहणार असे आवाहन सर्वपक्षीय विविध संघटनांनी केले आहे. श्रीरामपूर मध्ये अवैध धंदे गुंडांच्या टोळ्या ह्या कार्यरत असून यामुळे गोरगरिबांवती अन्याय महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत मात्र पोलिसांनी देखील योग्य वेळी कारवाई केली पाहिजे श्रीरामपूर शहराची ओळख गुन्हेगारी शहर म्हणून निर्माण होत आहे वाळूमुळे अनेक गुन्हेगारी टोळ्या तयार होत असून शासन दरबारी हा विषय प्राधान्याने मांडू व मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून या गुंडांचा कायमचा बंदोबस्त करण्यात असल्याचे माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली आहे.

Shrirampur Band : गुन्हेगारी विरोधात आज श्रीरामपूर बंद… Read More »

farmers

Devendra Fadnavis: CM फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; 50 हजारांची अट हटवली

Devendra Fadnavis: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचे समर्थन करताना, “कुठल्याही कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत झाला नाही. मात्र, शेतकरी अडचणीत असेल तर त्याला कर्जमाफी देणे ही सरकारची जबाबदारी आहे,” असे स्पष्ट केले. तसेच, महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांवरील ५० हजार रुपयांची अट हटवण्याचाही निर्णय सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले की, कर्जमाफी ही कायमस्वरूपी उपाययोजना नसून परिस्थितीची गरज म्हणून ती करावी लागते. “आमचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना सावकारांकडे जाण्याची वेळ येऊ नये, हे आहे. विधानसभा निवडणुकीत आम्ही कर्जमाफीचे आश्वासन दिले होते आणि त्यानुसार ते पूर्ण केले आहे. सध्या कोणतीही निवडणूक नाही, तरीही सरकारने हा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी सरकारच्या वीज सवलतीचाही उल्लेख केला. “कर्जमाफीव्यतिरिक्त सरकार दरवर्षी सुमारे २५ हजार कोटी रुपयांची वीजमाफी देते. कर्जमाफीचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व बँकांची बैठक घेऊन आणि संपूर्ण माहितीचा अभ्यास करूनच ही योजना आखण्यात आली आहे,” असे ते म्हणाले. कर्जमाफी योजनेबाबत ३६ लाख शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. “ही योजना ५६ लाख शेतकऱ्यांना सुमारे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी योजना आहे,” असा दावा त्यांनी केला. फडणवीस यांनी सांगितले की, महायुतीतील आमदारांनी कर्जमाफीतील ५० हजार रुपयांची मर्यादा हटवण्याची मागणी केली होती. सुरुवातीला ही अट काढल्यास सरकारवर ३ ते ४ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडेल, अशी माहिती देण्यात आली होती. तसेच कर्जमाफीची मर्यादा एक लाख रुपये केल्यास सुमारे दोन लाख शेतकरी लाभापासून वंचित राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. “व्यापक हिताचा विचार करून सरकारने अखेर ५० हजार रुपयांची अट हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, २०२६-२७ संदर्भातील अटही वगळण्यात येणार आहे,” असे फडणवीस यांनी जाहीर केले.

Devendra Fadnavis: CM फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; 50 हजारांची अट हटवली Read More »

tukaram munde

Tukaram Munde: अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी सावळीविहीर येथील दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबित

Tukaram Munde: अन्न सुरक्षा व मानके कायदा व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथील साई जतिन दूध संकलन केंद्राचा परवाना तात्काळ प्रभावाने पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त (अन्न) अ.अ. भोईटे यांनी दिली. अन्न व औषध प्रशासनाने ९ जुलै २०२६ रोजी संबंधित दूध संकलन केंद्राची तपासणी केली. यावेळी संकलित दुधाचे दोन नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तपासणीदरम्यान आढळून आलेल्या त्रुटी व आस्थापनेने सादर केलेल्या नाकारलेल्या अन्नपदार्थांच्या अहवालाचा विचार करण्यात आला. संबंधित केंद्राचा व्यवसाय सुरू राहिल्यास ग्राहकांच्या आरोग्याला संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आल्याने अन्न सुरक्षा व मानके विनियम, २०११ मधील तरतुदीनुसार या दूध संकलन केंद्राचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नागरिकांना स्वच्छ व निर्भेळ अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यभर अन्न भेसळविरोधी मोहीम प्रभावीपणे राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांनी अन्नपदार्थांमध्ये भेसळ असल्याचा संशय किंवा तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहनही भोईटे यांनी केले आहे.

Tukaram Munde: अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी सावळीविहीर येथील दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबित Read More »