DNA मराठी

Vilas Ghule : विलास घुले प्रकरणाला नवे वळण; उमेश मानेविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल

vilas ghule case

Vilas Ghule : केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, ज्याला वाचवण्यासाठी विलास घुले यांनी धाव घेतली होती, त्या उमेश मानेविरुद्ध आता अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि धमकावल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घडामोडीमुळे संपूर्ण प्रकरणाचा तपास नव्या दिशेने सुरू झाला आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, उमेश माने याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करून त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तो वारंवार तिचे ब्लॅकमेलिंग करत होता. त्रास असह्य झाल्यानंतर महिलेने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीय पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना त्यांना धमकावून परावृत्त करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

महिलेने केलेल्या आरोपानुसार, त्यानंतरही तिचा छळ सुरूच राहिला. विलास घुले आणि उमेश माने हे वारंवार घराजवळ येऊन धमक्या देत होते. अखेर संबंधितांना समजावून सांगण्यासाठी दोन्ही बाजूंची भेट झाली. मात्र, तेथे झालेल्या हाणामारीत विलास घुले यांचा मृत्यू झाला. पीडित महिलेच्या कुटुंबाने हा प्रकार स्वसंरक्षणात घडल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, या प्रकरणात यापूर्वीच अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता उमेश मानेविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने तपासाचे स्वरूप अधिक व्यापक झाले असून, पोलीस सर्व आरोपांची सखोल चौकशी करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *