DNA मराठी

Maharashtra

dabur india

Dabur India : FSSAI ची डाबरला नोटीस; ‘100%’ दाव्यांमुळे अनेक उत्पादनांच्या विक्रीवर बंदी

Dabur India : देशातील अन्न सुरक्षा नियामक FSSAI ने डाबर इंडियाला मोठा दणका दिला आहे. कंपनीच्या काही खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगवर करण्यात आलेले ‘100%’ शुद्ध किंवा ‘100%’ नैसर्गिक असे दावे ग्राहकांची दिशाभूल करणारे असल्याचे निरीक्षण नोंदवत संबंधित उत्पादनांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईत डाबरचे मध, तूप, खोबरेल तेल, च्यवनप्राशसह काही इतर खाद्यपदार्थांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. FSSAI च्या मते, ‘100%’ हा दावा वैज्ञानिकदृष्ट्या पडताळता येणारा नसल्यास किंवा तो ग्राहकांना चुकीचा संदेश देत असेल, तर अशा प्रकारचे लेबलिंग अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन ठरू शकते. अन्नपदार्थांच्या लेबलिंगमध्ये पारदर्शकता राखणे आणि ग्राहकांची फसवणूक होऊ न देणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे FSSAI ने स्पष्ट केले आहे. अन्न कंपन्यांनी उत्पादनांवर अतिशयोक्त किंवा दिशाभूल करणारे दावे टाळावेत, असेही नियामक संस्थेने नमूद केले आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे अन्नपदार्थांच्या जाहिराती आणि लेबलिंगबाबतचे नियम अधिक कठोरपणे लागू केले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली असून, इतर कंपन्यांनाही त्यांच्या उत्पादनांवरील दाव्यांची फेरतपासणी करावी लागू शकते.

Dabur India : FSSAI ची डाबरला नोटीस; ‘100%’ दाव्यांमुळे अनेक उत्पादनांच्या विक्रीवर बंदी Read More »

dhanjay mumde

Dhananjay Munde : “आम्ही दोघे बहीण-भाऊ मंत्री होऊ शकलो नाही”; धनंजय मुंडेंची भावनिक खंत

Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथे लोकनेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना मंत्रिपदावर भाष्य केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाचा गौरव करताना त्यांनी त्यांच्या कार्याचा उल्लेख केला. धनंजय मुंडे म्हणाले की, 1972 च्या भीषण दुष्काळाच्या काळात वसंतराव नाईक यांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो नागरिकांना मोठा आधार दिला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्राने संकटाचा सामना केला, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी नाईक कुटुंबावर जगदंबेचा आशीर्वाद असल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक, मनोहर नाईक आणि इंद्रनील नाईक यांच्या राजकीय वाटचालीचाही गौरव केला. स्वतःच्या राजकीय आयुष्याचा उल्लेख करताना धनंजय मुंडे यांनी भावनिक शब्दांत खंत व्यक्त केली. “आम्ही दोघे बहीण-भाऊ मंत्री होऊ शकलो नाही. आम्हा दोघांपैकी एकाला मात्र घरी बसावं लागलं,” असे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी पंकजा मुंडे आणि स्वतःचे समाजाशी असलेले नाते अतूट असल्याचे सांगितले. “मैदान में हारा हुआ इंसान फिर जीत सकता है, लेकिन अपनों का साथ निभाने वाला कभी हारता नहीं,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांशी भावनिक संवाद साधला. धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्याची कार्यक्रमस्थळी उपस्थितांमध्ये चर्चा रंगली.

Dhananjay Munde : “आम्ही दोघे बहीण-भाऊ मंत्री होऊ शकलो नाही”; धनंजय मुंडेंची भावनिक खंत Read More »

rishikesh shete

Ram Shinde: शनी देवाचा कोप म्हणून तुम्ही पराभूत…राम शिंदेंना भाजपमधूनच घरचा आहेर

Ram Shinde : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या अनुषंगाने विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी जिल्ह्यातील नेतेमंडळींची भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली. नुकतेच त्यांनी माजी खासदार यशववंतराव गडाख यांची भेट घेतली मात्र त्यांच्या याच कृतीमुळे भाजपमधील काही निष्ठावंत नाराज झालेले आहे. तुम्ही शंकर गडाखाकडे गेले तुमच्या वयक्तिक फायद्यासाठी माझी इच्छा नसताना मला तुम्हाला विरोध करण्यास भाग पाडू नका अशा शब्दात भाजपचे युवानेते ऋषिकेश शेटे यांनी शिंदे यांच्या भेटीचा खरपूस शब्दात समाचार घेतला. माननीय राम शिंदे साहेब सप्रेम नमस्कार माझी इच्छा नसताना मला तुम्हाला विरोध करण्यास भाग पाडू नका. शंकर यशवंतराव गडाख या माणसाने नेवासा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्याना उबाठा काळात मंत्री असताना भयानक त्रास दिला , गोळीबार केले, भाजप ला सपोर्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे शेत तळे फोडले, पाण्याच्या पाइपलाइन फोडल्या, शेतकऱ्याचे उत्पन्नाचे साधन असलेले ऊस पेटून दिले , ऊसाच्या खोडक्या केल्या, खोट्या एट्रोसिटी दाखल केल्या,कलम ३०७ दाखल करून शेतकरी जेल मध्ये पाठवले व त्यांचे प्रपंच संपवले. तुम्ही शंकर गडाखाकडे गेले तुमच्या वयक्तिक फायद्यासाठी ज्याने भाजप चे असंख्य कार्यकर्त्याला त्रास दिला, तुमची अशी गळाभेट घेणे कार्यकर्त्यांना आवडलेले नाही त्यांची तुमच्यावर प्रचंड नाराजी आहे. शिंगणापूर देवस्थान मध्ये हजारो कोटी भ्रष्टाचार कुणामुळे झाला खरे कारणीभूत तुम्ही आणि बाळासाहेब मुरकुटे आहात तुम्ही पालकमंत्री असताना शिंगणापूर देवस्थान गडाखांना सेटलमेंट करून दिल ते कसे दिले हे जनतेला सांगायला लाऊ नका त्याचे सर्व प्रूफ आमच्याकडे आहेत आणि तुम्ही कितीही यांना भेटले तरी हे मतदान तुम्हाला करणार नाही हे लक्षात ठेवा. आता हे तुम्हाला मतदान करण्याच्या बोलीवर तुमच्या कडून काहीतरी पाप धुण्याची बोली करणार . शंकर गडाख ह्या व्यक्तीस भाजप मधे घेण्याचा प्रयत्न करू नये .एक लक्षात ठेवा तुम्ही विधानसभेला पराभूत होणे सोपे नव्हते परंतु तुम्ही शनी देवस्थान 2017 – 18 ल सेटलमेंट करून विकले म्हणून तुम्हाला शनी ने उत्तर दिले. गडाखांच्या आयुष्यात सर्व संकट येते त्याला कारण देखील शनिवार आणि शनि देवाचा कोप आहे हा तुम्ही तुमच्यावर घेऊ नका आणि हे सगळं बोलून मला त्रास होणार असेल तर संघर्ष आमच्या रक्तात आहे कारण मी खानदानी भाजपा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टी आणि पक्षासाठी आणि आमचे रक्त सांडले आहे. मात्र तुमच्या अशा सेटलमेंट वृत्तीमुळे, तुमच्या विरोधात भाजप कार्यकर्ते एकवटतील हे लक्षात घ्या अशा शब्दात ऋषिकेश शेटे यांनी आपला राग व्यक्त केला.

Ram Shinde: शनी देवाचा कोप म्हणून तुम्ही पराभूत…राम शिंदेंना भाजपमधूनच घरचा आहेर Read More »

sunetra pawar dcm

Sunetra Pawar: रात्री अकरापर्यंत बैठका अन् सकाळी सातला रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवार बीडसाठी ‘ॲक्शन मोडमध्ये

Sunetra Pawar: गुरुवारी रात्री अकरा वाजेपर्यंत प्रशासनाशी विकासकामांचा आढावा, लोकप्रतिनिधींसोबत चर्चा, नागरिकांच्या अडचणी… आणि अवघ्या काही तासांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी सकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात दाखल झाल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘ॲक्शन मोड’ने त्यांनी खऱ्या अर्थाने बीडचे पालकत्व स्वीकारल्याची भावना बीडकरांनी व्यक्त केली. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांनी स्वतःहून बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले होते. त्यानंतर ज्या झपाट्याने त्यांनी विकासकामांना गती दिली, मोठ्या निधीला मंजुरी मिळवून दिली आणि प्रशासनाला कामाला लावले, त्यामुळे बीडकरांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यांच्या अकाली निधनानंतर हा विकासाचा वेग कायम राहील का, सुरू असलेल्या कामांचे काय होईल, अशी चिंता बीडकरांच्या मनात होती. मात्र सुनेत्रा अजित पवार यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्याने त्या चर्चांना नवी दिशा मिळाली आहे. गुरुवारी सलग बैठका घेऊन रात्री जवळपास अकरा वाजेपर्यंत विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी नागरिकांच्या अडचणीही ऐकून घेतल्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी सात वाजता जिल्हा रुग्णालयात पोहोचून आरोग्य सेवांची पाहणी, सुरू असलेल्या कामांचा आढावा आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या स्पष्ट सूचनांतून त्यांनी कामालाच सर्वोच्च प्राधान्य असल्याचा संदेश दिला. बीडच्या विकासाचा धागा तुटू दिला जाणार नाही. सुनेत्रा पवार यांनी केवळ पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेली नाही, तर ती कृतीशील आणि परिणामकारक पद्धतीने पार पाडण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या कामाच्या झपाट्यामुळे बीडकरांच्या अपेक्षांना पुन्हा नवी पालवी फुटल्याचे बोलले जात आहे. अजितदादा पवार यांनी दाखवून दिलेल्या विकासाच्या वाटेवर आता सुनेत्रा पवार त्याच तळमळीने पुढे जात असल्याचे चित्र या दोन दिवसांच्या दौऱ्यातून स्पष्टपणे समोर आले. त्यामुळे बीडच्या विकासाला पुन्हा वेग मिळेल, अशी आशा जिल्ह्यातील नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.

Sunetra Pawar: रात्री अकरापर्यंत बैठका अन् सकाळी सातला रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवार बीडसाठी ‘ॲक्शन मोडमध्ये Read More »

sispe scam

SISPE Scam : सिस्पे घोटाळ्यातील मास्टरमाइंड कसा अडकला पोलिसांच्या जाळ्यात?

SISPE Scam : सिस्पे घोटाळ्याप्रकरणी अनेक दिवसांपासून फरार असलेला आणि या प्रकरणातील मास्टरमाइंड म्हणून तपास यंत्रणांकडून शोध घेतला जात असलेला राहुल श्यामराव काळोखे याला अखेर इंटरपोलच्या मदतीने फिजीमध्ये ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत त्याला भारतात आणण्यात आले असून, मुंबई विमानतळावर त्याला अटक करण्यात आली आहे. या घडामोडीमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे. तपासादरम्यान राहुल काळोखे याच्याविरोधात जानेवारी महिन्यात इंटरपोलमार्फत रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. या नोटीसमुळे जगभरातील 196 देशांच्या कायदा अंमलबजावणी यंत्रणांना त्याचा शोध घेण्यासाठी अधिकृत माहिती पाठविण्यात आली. त्यानंतर तो फिजीमध्ये असल्याची माहिती समोर आल्यानंतर तेथील संबंधित अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि भारतात प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आंतरराष्ट्रीय समन्वयानंतर राहुल काळोखे याला भारतात आणण्यात आले. आज दुपारी मुंबई विमानतळावर त्याच्यावर अधिकृतपणे अटकेची कारवाई करण्यात आली. पुढील चौकशीसाठी त्याला संबंधित तपास यंत्रणांच्या ताब्यात देण्यात येणार असून, या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, इतर आरोपींची भूमिका आणि घोटाळ्याचे संपूर्ण जाळे उघड करण्यासाठी त्याची कसून चौकशी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरुवातीपासून सातत्याने पाठपुरावा केला. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारशी समन्वय साधत आवश्यक स्तरावर पत्रव्यवहार करून तपास प्रक्रियेला गती मिळावी यासाठी प्रयत्न केले. या पाठपुराव्यानंतर विविध तपास यंत्रणांमधील समन्वय अधिक प्रभावी झाले, त्यातून आरोपीचा माग काढून त्याच्यापर्यंत पोहोचण्यास मदत झाली. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), केंद्रीय गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, इमिग्रेशन विभाग आणि इंटरपोल या सर्व संस्थांनी परस्पर समन्वय साधत काम केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील माहितीची देवाणघेवाण, कायदेशीर प्रक्रिया आणि सुरक्षा यंत्रणांचा समन्वय यामुळे आरोपीला भारतात आणणे शक्य झाले. राहुल काळोखेच्या अटकेनंतर सिस्पे घोटाळ्यातील तपास अधिक वेगाने पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे आर्थिक फटका बसलेल्या हजारो पीडितांना न्याय मिळण्याची आशा पुन्हा निर्माण झाली आहे. तसेच या घोटाळ्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींची भूमिका, आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे आणि संभाव्य नवीन खुलासे तपासातून समोर येण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.

SISPE Scam : सिस्पे घोटाळ्यातील मास्टरमाइंड कसा अडकला पोलिसांच्या जाळ्यात? Read More »

rohit pawar

Rohit Pawar on NEET Exam: नीट’ पुनर्परीक्षेचाही पेपर फुटला? रोहित पवारांचा गंभीर आरोप

Rohit Pawar on NEET Exam : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. गुजरातमध्ये पुनर्परीक्षेचाही पेपर फुटल्याचा दावा त्यांनी केला असून, या संदर्भातील काही कागदपत्रे पत्रकार परिषदेत सादर केली. रोहित पवार म्हणाले की, स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटना थांबण्याऐवजी वाढत असून त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. पवार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित करत विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, असे आवाहन केले. दरम्यान, रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांवर संबंधित यंत्रणांकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, या दाव्यांची स्वतंत्र पडताळणी होणे बाकी आहे.

Rohit Pawar on NEET Exam: नीट’ पुनर्परीक्षेचाही पेपर फुटला? रोहित पवारांचा गंभीर आरोप Read More »

Gold

Gold Price Today: खरेदीदारांसाठी दिलासा; सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवीन दर

Gold Price Today: देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या दरात आज लक्षणीय घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या दरांमुळे खरेदी पुढे ढकलणाऱ्या ग्राहकांसाठी ही किंमत घट सकारात्मक मानली जात आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात विशेष बदल नोंदवला गेला नसून भाव जवळपास स्थिर राहिले आहेत. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरासंदर्भातील अपेक्षा आणि जागतिक आर्थिक परिस्थितीचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतींवर होत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू असून गुंतवणूकदारही सावध भूमिका घेत आहेत. सराफा व्यावसायिकांच्या मते, सणासुदीचा हंगाम जवळ येत असल्याने ग्राहकांनी खरेदीपूर्वी दरांची तुलना करून निर्णय घ्यावा. आगामी काही दिवसांत जागतिक बाजारातील घडामोडींनुसार सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Gold Price Today: खरेदीदारांसाठी दिलासा; सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवीन दर Read More »

ravikant tupkar

Ravikant Tupkar : “नियमित कर्ज भरून आम्ही पाप केलंय का?” सरकारला रविकांत तुपकरांचा संतप्त सवाल

Ravikant Tupkar : संपूर्ण कर्जमुक्तीसाठी अन्नत्याग आंदोलन, विधानभवनावर धडक, मंत्रालयासमोर झाडावर चढून सरकारला दिलेला इशारा आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या निर्णायक बैठकीनंतरही शेतकऱ्यांचे प्रश्न कायम असल्याचा आरोप करत शेतकरी नेते रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारच्या अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेले केवळ ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान अत्यंत अपुरे असून ते २ लाख करण्यात यावे, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे. सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन पुन्हा एकदा राज्यव्यापी आक्रमक आंदोलन उभारू, असा स्पष्ट इशारा तुपकर यांनी दिला आहे. सध्या रविकांत तुपकर राज्यव्यापी दौऱ्यावर असून पूर्व आणि पश्चिम विदर्भात ते शेतकरी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. या दौऱ्यात शेतकऱ्यांमधील असंतोषाची तीव्रता जाणून घेत पुढील आंदोलनाची रणनीती आखली जात असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील दोन दिवसांत ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरही जाणार असून राज्यभर संघटनात्मक बैठकांची मालिका सुरू होणार आहे. या दौऱ्या दरम्यान माध्यमांशी बोलताना तुपकर म्हणाले की, २०१९ मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही नव्या कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारने अन्याय केला आहे.प्रोत्साहन अनुदान म्हणून केवळ ५० हजार देऊन सरकार नियमित कर्जदारांची थट्टा करत आहे. ही रक्कम किमान २ लाख करण्यात यावी, अशी आमची ठाम मागणी आहे. “नियमित कर्ज भरून आम्ही पाप केलंय का?” असा संतप्त सवाल करत तुपकर म्हणाले, अनेक शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज वेळेवर फेडण्यासाठी नातेवाईकांकडून किंवा खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे उचलले. प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्यांना शिक्षा का? अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. सरकारला भविष्यात नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढवायची असेल तर त्यांना सन्मानाने आणि मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन द्यावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनामुळे सरकारला बदलावे लागले होते निकष गेल्या महिन्यात संपूर्ण कर्जमुक्तीसाठी रविकांत तुपकर यांनी राज्यभर गाजलेले अन्नत्याग आंदोलन छेडले होते.त्यानंतर त्यांनी मुंबईतील विधानभवनावर धडक दिली, “क्रांतिकारी” कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर झाडावर चढून सरकारविरोधात अनोखे आंदोलन केले आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सविस्तर बैठक झाली होती. या बैठकीत तुपकर यांनी जवळपास पस्तीस महत्त्वाच्या मागण्या केल्या होत्या. प्रोत्साहन अनुदानाची रक्कम ५० हजारांवरून २ लाख करावी आणि २०१९ मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही नव्या कर्जमाफीचा लाभ मिळावा या महत्त्वाच्या मागण्यांचा त्यात समावेश होता. बैठकीनंतर त्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मधील लाभार्थ्यांनाही अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत समाविष्ट करण्याची घोषणा केली. या निर्णयाचे तुपकर यांनी स्वागत केले असले, तरी प्रोत्साहन अनुदानाबाबत सरकारने अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तीनही कर्जमाफी योजनांतून वंचित शेतकऱ्यांनाही न्याय द्या तुपकर यांनी आणखी एक महत्त्वाची मागणी करत सांगितले की, आतापर्यंतच्या तीनही कर्जमाफी योजनांतून विविध तांत्रिक कारणांमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा समावेश आताच्या योजनेत करण्यात यावा. केवळ कागदपत्रांतील किरकोळ त्रुटींमुळे शेतकरी लाभापासून वंचित राहणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. “बँक व्यवस्थापकांना सरकार आवरत नसेल तर आम्ही धडा शिकवू” कर्जमाफीच्या निकषांमध्ये बसणाऱ्या आणि दोन लाख रुपयांच्या मर्यादेत कर्ज असलेल्या काही शेतकऱ्यांकडूनही काही बँकांकडून टक्केवारीची वसुली केली जात असल्याच्या तक्रारी आमच्याकडे येत असल्याचा दावा तुपकर यांनी केला. सरकारने अशा बँक व्यवस्थापकांवर कारवाई केली नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारीच त्यांना धडा शिकवतील, असा आक्रमक इशाराही त्यांनी दिला. पुन्हा आंदोलनाचा इशारा सरकारने नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देत प्रोत्साहन अनुदानाची रक्कम २ लाख करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अन्यथा राज्यातील नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्र करून पुन्हा एकदा महाराष्ट्रभर तीव्र आणि आक्रमक आंदोलन उभे केले जाईल, असा स्पष्ट इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Ravikant Tupkar : “नियमित कर्ज भरून आम्ही पाप केलंय का?” सरकारला रविकांत तुपकरांचा संतप्त सवाल Read More »

Tanpure

Prajakt Tanpure : … तर मुंबई-दिल्लीतही आंदोलनाचा इशारा; त्या प्रकरणात आमदार प्राजक्त तनपुरे भडकले

Prajakt Tanpure : प्रस्तावित राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्रित भूमिका निश्चित करण्यासाठी २७ जुलै सोमवार रोजी उंबरे येथील साई मंगल कार्यालयात सर्व बाधित शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. माजी मंत्री तथा विधानपरिषद सदस्य आ. प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत रेल्वेमार्गाविरोधात व्यापक कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रत्येक गावातून पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन प्रतिनिधी निवडून कृती समिती स्थापन करण्याची सूचना आ.प्राजक्त तनपुरे यांनी बैठकीत केली. बैठकीत मार्गदर्शन करताना आ. तनपुरे म्हणाले की, प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार असून, काहींच्या शेतीचे दोन तुकडे होणार आहेत. या परिसरात कोणतीही मोठी औद्योगिक वसाहत किंवा रोजगारनिर्मितीचा प्रकल्प नसताना केवळ रेल्वेमार्गासाठी सुपीक शेतीचे नुकसान करणे योग्य ठरणार नाही. विकासासाठी आवश्यक आणि लोकहिताचा प्रकल्प असता, तर त्याला विरोध केला नसता; मात्र शेतकऱ्यांचे नुकसान करणारा कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. या विषयावर पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन बाधित शेतकऱ्यांची भूमिका मांडण्यासाठी शिष्टमंडळ नेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आवश्यकतेनुसार मुंबई तसेच दिल्ली येथेही तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. प्रत्येक गावातून पक्षीय भेद बाजूला ठेवून सक्षम प्रतिनिधी निवडून कृती समिती स्थापन करण्याचे आवाहन करताना तनपुरे यांनी या समितीत शेतकरी, वकील, पत्रकार, सोशल मीडियाचे जाणकार तसेच विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींचा समावेश करण्याची सूचना केली. आंदोलन अधिक प्रभावी करण्यासाठी गावागावांत जनजागृती मोहीम राबविणे, माध्यमांच्या माध्यमातून विषय मांडणे आणि सोशल मीडियावर व्यापक जनआंदोलन उभे करण्याचे आवाहनही त्यांनी केले. “जमिनी संपादनासाठी कोणताही करार करू नका. प्रकल्पाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करू नका. शेतकऱ्यांच्या हक्कांचा हा लढा शेवटपर्यंत लढला जाईल. गरज पडल्यास जेलभरो आंदोलन करण्यासही आम्ही तयार आहोत,” असे ठाम प्रतिपादन आ. तनपुरे यांनी केले. बैठकीत उपस्थित शेतकरी आणि विविध गावांतील प्रतिनिधींनीही प्रस्तावित रेल्वेमार्ग रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार तसेच सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी व्यापक लोकआंदोलन उभारण्याचा निर्धारही बैठकीत व्यक्त करण्यात आला. बैठकीच्या शेवटी प्रस्तावित रेल्वेमार्गाविरोधात कृती समिती स्थापन करण्याचा अधिकृत निर्णय घेण्यात आला. प्रत्येक गावातून प्रतिनिधींची नावे तातडीने सादर करण्याचे आवाहन करण्यात आले असून, पुढील आंदोलनाची दिशा कृती समितीच्या माध्यमातून निश्चित केली जाणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. यावेळी बैठकीला बैठकीस तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन नामदेव ढोकणे, सुनील अडसूरे,विजय बानकर, राजेंद्र ढोकणे, भागवत देशमुख, डॉ.राजेंद्र बानकर,संचालक डॉ.माऊली दरंदले, धनंजय, वसंत कुसळकर, व्ही. एम. दरंदले, एस.बी.शेटे, शेतकरी संघटनेचे नेते अनिल निमसे, रामेश्वर कुसळकर यांच्यासह विविध गावांतील शेतकरी, ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रेल्वे प्रकल्प उभारणीसाठी आपल्या परिसरात कोणत्याही शेतकऱ्यांनी रेल्वे लाईन उभारण्यासाठी लागणारे सामान ठेवण्यासाठी ठेकेदारास आपल्या जागा शेती कोणत्याही आर्थिक स्वरूपात देऊ नये.तसेच शेतकऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी माझ्या पाठीशी उभे रहा.ज्यावेळी जेल मध्ये जायची वेळ त्यावेळी सर्वात आधी पुढे प्राजक्त तनपुरे राहिलं.एखादा मोठा उद्योग आला असता तर आम्ही विरोध केला नसता पण शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी उधवस्त करू यासाठी रेल्वे कृती समितीचे नेतृत्व करणार आहे असं आ.प्राजक्त तनपुरे म्हणाले.

Prajakt Tanpure : … तर मुंबई-दिल्लीतही आंदोलनाचा इशारा; त्या प्रकरणात आमदार प्राजक्त तनपुरे भडकले Read More »

narendracharya maharaj

Ram Mandir Theft : राम मंदिर चोरीप्रकरणी नरेंद्राचार्य महाराजांची मोठी मागणी; मंदिरे आचार्यांच्या ताब्यात द्यावीत

Ram Mandir Theft : राम मंदिरातील चोरीच्या घटनेवर जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचे म्हटले आहे. ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत त्यांनी हिंदूंची मंदिरे शासनाऐवजी अधिकृत शंकराचार्य, रामानंदाचार्य, वल्लभाचार्य आदी आचार्यांच्या समितीच्या ताब्यात देण्याची मागणी केली. नरेंद्राचार्य महाराज म्हणाले की, मंदिरांचे व्यवस्थापन आणि धार्मिक परंपरा जपण्याचे आवश्यक प्रशिक्षण शासनाकडे नाही. त्यामुळे मंदिरांचे संचालन आचार्यांच्या समितीकडे दिल्यास धार्मिक परंपरा आणि मंदिरांची पवित्रता अधिक प्रभावीपणे जपली जाईल. राम मंदिर चोरीप्रकरणी सरकारने तत्पर कारवाई करत आरोपींना अटक केली असली, तरी या घटनेमुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्याची भरपाई होऊ शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना नरेंद्राचार्य महाराज यांनी सरकारने उचललेले पाऊल योग्य असल्याचे सांगितले. मात्र, केवळ राजीनामा देऊन प्रश्न सुटणार नाही. भविष्यात पेपरफुटीसारख्या घटना रोखण्यासाठी कठोर आणि प्रभावी कायदा करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Ram Mandir Theft : राम मंदिर चोरीप्रकरणी नरेंद्राचार्य महाराजांची मोठी मागणी; मंदिरे आचार्यांच्या ताब्यात द्यावीत Read More »