Dabur India : देशातील अन्न सुरक्षा नियामक FSSAI ने डाबर इंडियाला मोठा दणका दिला आहे. कंपनीच्या काही खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगवर करण्यात आलेले ‘100%’ शुद्ध किंवा ‘100%’ नैसर्गिक असे दावे ग्राहकांची दिशाभूल करणारे असल्याचे निरीक्षण नोंदवत संबंधित उत्पादनांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या कारवाईत डाबरचे मध, तूप, खोबरेल तेल, च्यवनप्राशसह काही इतर खाद्यपदार्थांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. FSSAI च्या मते, ‘100%’ हा दावा वैज्ञानिकदृष्ट्या पडताळता येणारा नसल्यास किंवा तो ग्राहकांना चुकीचा संदेश देत असेल, तर अशा प्रकारचे लेबलिंग अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन ठरू शकते.
अन्नपदार्थांच्या लेबलिंगमध्ये पारदर्शकता राखणे आणि ग्राहकांची फसवणूक होऊ न देणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे FSSAI ने स्पष्ट केले आहे. अन्न कंपन्यांनी उत्पादनांवर अतिशयोक्त किंवा दिशाभूल करणारे दावे टाळावेत, असेही नियामक संस्थेने नमूद केले आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे अन्नपदार्थांच्या जाहिराती आणि लेबलिंगबाबतचे नियम अधिक कठोरपणे लागू केले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली असून, इतर कंपन्यांनाही त्यांच्या उत्पादनांवरील दाव्यांची फेरतपासणी करावी लागू शकते.






