DNA मराठी

Maharashtra

vivek kolhe

Vivek Kolhe : संयमाला मर्यादा असते, ‘जब भी घायल होता हूं तब घातक होता हूं’; विवेक कोल्हेंचा विखे-पाटलांना थेट इशारा

Vivek Kolhe :  माझा स्वभाव सकारात्मक राजकारण करण्याचा आहे. दुसऱ्याची रेघ पुसण्यापेक्षा आपली रेघ कशी मोठी करता येईल, यावर माझा विश्वास आहे. मात्र, जाणीवपूर्वक कुणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, तर किती संयम ठेवायचा यालाही एक मर्यादा असते. लक्षात ठेवा, ‘जब भी घायल होता हूं तब घातक होता हूं’,” अशा अत्यंत कडक शब्दांत नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे यांनी विरोधकांना आणि पर्यायाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना जाहीर इशारा दिला आहे. राहाता शहरात आयोजित एका सत्कार समारंभादरम्यान सभेत नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे हे बोलत होते. सर्वपक्षीय उपस्थिती आणि वाढती ताकद या सभेला मिळाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती यावेळी होती या सर्वपक्षीय प्रेमाचा उल्लेख करत विवेक कोल्हे म्हणाले की, “अनेक टीका-टिप्पण्या आणि क्रॉस फायरिंग झाली, पण आज मला केवळ टीका करायची नाही. हा जो वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांचा पाठिंबा मिळतो आहे, हीच माझी खरी ताकद आहे ‘गणेश’ कारखान्यावरून विरोधकांना टोला शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या ‘गणेश’ कारखान्याच्या मुद्द्यावरून त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “दोन-तीन वर्षांनी पुन्हा निवडणुका येतील, तेव्हा लोकशाही मार्गाने सभासदांसमोर जा आणि मते मागा. पण, आता अशा पद्धतीने कायदेशीर अडथळे आणून शेतकऱ्यांची कामधेनू अडचणीत आणू नका,” अशी नम्र विनंती त्यांनी केली. तसेच जर विरोधक ऐकणार नसतील, तर संस्थेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री यांनी लावला छातीवर बिल्ला: आपल्या आमदारकीचा उल्लेख करताना कोल्हे म्हणाले, “मला आमदारकी रूपी जो सातबारा मिळाला आहे, तो बिल्ला खुद्द मुख्यमंत्री यांनीच माझ्या छातीवर लावला आहे त्यामुळे कुणीही काळजी करण्याची गरज नाही. या सातबाऱ्याच्या पोटहिश्श्यामध्ये तुम्ही सर्वसामान्य नागरिक आणि कार्यकर्तेच आहात असे कोल्हे म्हणाले. आधी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यापुरते मर्यादित असलो, तरी आता आपले कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघ हे आहे. यामध्ये राहता आणि लोणी परिसर आवर्जून येतो, याची मला पूर्ण जाणीव आहे. कामासाठी पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे जाण्याची आपली तयारी आहे, मात्र जाणीवपूर्वक जर कुणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला, तर मी भाऊ आणि सहकारी म्हणून खंबीरपणे पाठीशी उभा राहीन,” असा ठाम विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Vivek Kolhe : संयमाला मर्यादा असते, ‘जब भी घायल होता हूं तब घातक होता हूं’; विवेक कोल्हेंचा विखे-पाटलांना थेट इशारा Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: जिल्ह्यातील सरकारी मेडिकल कॉलेजची जागा निच्छित ‘या’ ठिकाणी होणार कॉलेज

Nilesh Lanke : जिल्ह्याच्या वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालया’साठी नगर तालुक्यातील कापूरवाडी येथे २५ एकर जागा निश्चित करण्यात आली असून, जिल्ह्याच्या पहिल्या सरकारी मेडिकल कॉलेजचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. खासदार नीलेश लंके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली असून महाविद्यालयासाठी ४४८ पदांची निर्मितीही मंजूर केली आहे. जिल्ह्यात सरकारी मेडिकल कॉलेज व्हावे, यासाठी खासदार डॉ. निलेश लंके गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत होते. दिल्ली ते मुंबई विविध स्तरांवर बैठका घेऊन त्यांनी जिल्ह्याची आवश्यकता शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्यासमोरही त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्याची परिस्थिती मांडत मेडिकल कॉलेजची गरज अधोरेखित केली होती. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर राज्य शासनाने प्रकल्पाला गती देत आवश्यक प्रशासकीय निर्णय घेतले आहेत. महाविद्यालयासाठी सुरुवातीला नालेगाव, अरणगाव आणि कापूरवाडी या ठिकाणांची पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर सर्व निकषांचा विचार करून कापूरवाडी येथील २५ एकर जागा अंतिम करण्यात आली आहे. या ठिकाणी भविष्यात अत्याधुनिक सुविधा असलेले मेडिकल कॉलेज, संलग्न रुग्णालय, विद्यार्थी वसतिगृह आणि संशोधन सुविधा उभारल्या जाणार आहेत. चालू शैक्षणिक वर्षापासून १०० एमबीबीएस जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून सप्टेंबर २०२६ पासून प्रत्यक्ष अध्यापन सुरू होण्याची शक्यता आहे. नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत महाविद्यालयाचे तात्पुरते कामकाज जिल्हा आयुष रुग्णालयातून चालविण्यात येणार आहे. तसेच पुढील सात वर्षांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) मेडिकल कॉलेजकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या मेडिकल कॉलेजमुळे जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता वाढणार असून ग्रामीण भागातील रुग्णांना स्थानिक पातळीवरच आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई किंवा इतर शहरांकडे जाण्याची गरज कमी होणार आहे. जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देणारा हा ऐतिहासिक प्रकल्प ठरणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Nilesh Lanke: जिल्ह्यातील सरकारी मेडिकल कॉलेजची जागा निच्छित ‘या’ ठिकाणी होणार कॉलेज Read More »

acb action

Ahilyanagar ACB Action: नगर तालुका पोलीस ठाण्यातील पीएसआयवर लाच मागितल्याचा गुन्हा; एसीबीची कारवाई

Ahilyanagar ACB Action: नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जयेश मोतीलाल गांगुर्डे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मामा व इतर 15 नातेवाईकांविरोधात नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पीएसआय जयेश गांगुर्डे यांच्याकडे होता. तपासात मदत करण्यासाठी त्यांनी तडजोडीअंती 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी 18 मे 2026 रोजी करण्यात आली. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अन्वये तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे करीत आहेत.

Ahilyanagar ACB Action: नगर तालुका पोलीस ठाण्यातील पीएसआयवर लाच मागितल्याचा गुन्हा; एसीबीची कारवाई Read More »

img 20260526 wa0007

Pratap Sarnaik: एसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम राबविणार

Pratap Sarnaik :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी “ इंधन बचत… म्हणजेच इंधन निर्मिती ” ही व्यापक संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते या अनुषंगाने मंत्रालयातील आपल्या दालनात बोलावलेल्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. एसटी महामंडळाला सध्या दररोज सरासरी १०.८७ लाख लिटर डिझेलची आवश्यकता भासत असून, इंधन खर्च कमी करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटीच्या प्रत्येक आगाराने दररोज किमान ५ लिटर डिझेल बचतीचे उद्दिष्ट निश्चित केले, तरी संपूर्ण राज्यभरातून दररोज किमान १००० लिटर डिझेलची बचत होऊ शकते. सध्याच्या डिझेल दरानुसार ही बचत दररोज जवळपास १ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. “लहान बचतीतून मोठी आर्थिक नशिस्त निर्माण होते आणि हीच बचत भविष्यात एसटीसाठी मोठी ताकद ठरू शकते,” असेही त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर सर्व विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापकांना तातडीने आगारनिहाय डिझेल बचतीची उद्दिष्टे निश्चित करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत. प्रत्येक आगाराने आपल्या बसगाड्यांच्या इंधन वापराचे नियमित विश्लेषण करून बचतीसाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असे आदेशही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.डिझेल बचतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चालकांचा विशेष सत्कार करण्यात येईल तसेच त्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याची योजनाही सुरू करण्यात येणार आहे. “एसटीचा चालक हा केवळ वाहन चालक नसून तो संस्थेच्या अर्थकारणाचा शिल्पकार आहे. जबाबदारीने आणि कौशल्याने वाहन चालवणारा चालक एसटीचे लाखो रुपये वाचवू शकतो,” असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले. याशिवाय ज्या आगारांनी निश्चित उद्दिष्टांपेक्षा अधिक डिझेल बचत केली असेल, त्या आगारांना दरमहा विशेष पुरस्कार आणि आर्थिक प्रोत्साहन देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे आगारांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन बचतीची चळवळ अधिक प्रभावी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.वाहन चालविण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे ज्या चालकांच्या बसचे के.पी.एल. (किलोमीटर प्रति लिटर) प्रमाण कमी येत असेल, अशा चालकांचे समुपदेशन करून त्यांना पुनर्प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इंधन बचतीसाठी वेग नियंत्रण, योग्य गिअरचा वापर, अनावश्यक इंजिन सुरू ठेवणे टाळणे, ब्रेकिंग पद्धतीत सुधारणा यांसारख्या बाबींवर विशेष प्रशिक्षण दिले जाईल.तसेच बसेसची दैनंदिन तांत्रिक तपासणी, वेळेवर दुरुस्ती आणि इंजिन कार्यक्षमतेची नियमित पाहणी यावर भर देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. टायर प्रेशर, इंजिन ट्युनिंग, ऑईल गळती, ब्रेक प्रणाली यांसारख्या तांत्रिक बाबींमधील त्रुटीमुळेही इंधनाचा अपव्यय होतो. त्यामुळे कार्यशाळा स्तरावर अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी महसूल वाढविण्यासोबतच खर्च नियंत्रण हीदेखील तितकीच महत्त्वाची बाब आहे. इंधन बचत ही केवळ आर्थिक बाब नसून ती राष्ट्रीय संपत्तीच्या जतनाशी संबंधित जबाबदारी आहे. प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आणि चालकाने ही मोहीम स्वतःची समजून राबवावी,” असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

Pratap Sarnaik: एसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम राबविणार Read More »

maharashtra government

मोठी बातमी! शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ

Maharashtra Government: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेत शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ दिली आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणार्‍या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मध्ये सूधारणेस मान्यता देण्यात आली असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. तर दुसरीकडे या मंत्रिमंडळाच्या बैठकीत डोंबिवलीतील सोनारपाड्यातील पिंपळेश्वर मंदिराला जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मौजे सागाव सोनारपाडा (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला ४ एकर २५ गुंठे जमीन मिळणार आहे. या जमिनीवरील मंदिर ट्रस्टचा वापर नियमित करण्यास व ही जमीन ट्रस्टला नाममात्र दरात देण्यास मान्यता देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ निर्णय ▶सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव. सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. कोकणातील जनतेची अनेक वर्षांची मागणी मार्गी. नामकरणाबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार. (परिवहन विभाग) ▶शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ. त्यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणार्‍या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मध्ये सूधारणेस मान्यता. (सामान्य प्रशासन विभाग) ▶डोंबिवलीतील सोनारपाड्यातील पिंपळेश्वर मंदिराला जमीन. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मौजे सागाव सोनारपाडा (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला ४ एकर २५ गुंठे जमीन मिळणार. या जमिनीवरील मंदिर ट्रस्टचा वापर नियमित करण्यास व ही जमीन ट्रस्टला नाममात्र दरात देण्यास मान्यता. (उद्योग विभाग) ▶नवीन नागपूर व नवीन बाह्य वळण रस्त्यासाठी खरेदी करायच्या जमिनीसाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय. मौजे गोदणी आणि मौजे लाडगाव (रीठी) (ता. हिंगणा, जि. नागपूर) येथील खाजगी जमीन नवीन नागपूर व नवीन बाह्य वळण रस्ता प्रकल्पासाठी वाटाघाटीने थेट खरेदी करावी लागणार. या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क माफ करण्यास मान्यता. (महसूल व मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग)

मोठी बातमी! शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ Read More »

HPCL Petrol

Petrol Price: सलग इंधन दरवाढीने नागरिक त्रस्त; “विधान परिषद निवडणुकीचा खर्च शेतकऱ्यांकडून वसूल करता का..?”

Petrol Price : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली असून आज पेट्रोल २ रुपये ६१ पैसे तर डिझेल २ रुपये १७ पैशांनी महागले आहे. यवतमाळ जिल्ह्यात पेट्रोल ११३.१७ रुपये तर डिझेल ९९.८३ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. मशागतीच्या कामांना वेग आल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात डिझेलची गरज भासत असताना अनेक पेट्रोल पंपांवर तासन्तास रांगा लागत आहेत. वाढत्या दरवाढीमुळे शेतकरी व सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसत आहे. दरम्यान, राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका सुरू असताना सतत होणाऱ्या इंधन दरवाढीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते मनीष जाधव यांनी थेट सरकारवर हल्लाबोल केला आहे. “विधान परिषद निवडणुकीचा खर्च शेतकऱ्यांच्या खिशातून काढायचा आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारने १५ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ३ रुपये प्रति लिटर वाढ केली होती. तर १९ मे रोजी ८७ पैसे पेट्रोलच्या दरात तर ९१ पैसे डिझेलच्या दरात वाढ केली होती. तर २३ मे रोजी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती.

Petrol Price: सलग इंधन दरवाढीने नागरिक त्रस्त; “विधान परिषद निवडणुकीचा खर्च शेतकऱ्यांकडून वसूल करता का..?” Read More »

agriculture minister bharne

Agriculture Minister Bharne : पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार; कृषिमंत्री भरणे

Agriculture Minister Bharne : राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाची सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आता नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार अशी ग्वाही कृषिमंत्री भरणे यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना कृषिमंत्री म्हणाले की, पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी दुष्काळ पडला असून पाण्याअभावी शेती पिके जळून चालली आहेत. ज्या ठिकाणी पावसामुळे नुकसान झाले आहे, त्या ठिकाणी कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन पंचनामे करावेत, असे आदेश मी दिले आहेत. नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली जाईल असं ते म्हणाले. तर यावेळी त्यांनी राज्यात कुठेही इंधन पुरवठा कमी नसल्याने अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन शेतकऱ्यांना केलं आहे. यावेळी ते म्हणाले की, याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मी करतो. राज्यात कुठेही पेट्रोल आणि डिझेलचा साठा अपुरा नाही साठा व्यवस्थित आहे. काही जण विनाकारण अफवा पसरवत असून त्यामुळे त्या भागात रोजचा इंधन खप 20 टक्क्यांनी वाढला आहे. डिझेल-पेट्रोलचा साठा व्यवस्थित आहे. नागरिकांनी रांगा लावण्याची गरज नाही.

Agriculture Minister Bharne : पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार; कृषिमंत्री भरणे Read More »

img 20260525 wa0000

Cockroach Janata Party : तरुणांची किंमत फक्त झुरळांइतकी? व्यवस्थेचा खरा चेहरा उघडा!

Cockroach Janata Party : देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेतील एका मान्यवर व्यक्तीकडून आलेले शब्द कधी कधी न्यायापेक्षा अधिक बोचरे ठरतात. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांची तुलना “झुरळांशी” केली, तेव्हा प्रश्न फक्त एका वक्तव्याचा उरला नाही तो व्यवस्थेच्या मानसिकतेचा आरसा बनला. बेरोजगारीच्या आगीत होरपळणाऱ्या तरुणांना झुरळ म्हणणे म्हणजे त्यांच्या संघर्षाची थट्टा करण्यासारखे आहे. आज देशात लाखो तरुण पदव्या घेऊन रस्त्यावर फिरत आहेत. नोकरी नाही, उद्योग नाही, आणि भविष्याची खात्री नाही. पण सत्ताधाऱ्यांच्या भाषणात मात्र ‘अमृतकाल’ ओसंडून वाहतो. वास्तवात मात्र हा “अमृतकाल” काही घराण्यांसाठी सुवर्णकाळ आणि सामान्य तरुणांसाठी धुरकट उद्याची शिक्षा ठरत चालला आहे. राजकारणाने तरुणांना विचार देण्याऐवजी झेंडे दिले. रोजगार देण्याऐवजी घोषणा दिल्या. अभ्यासाऐवजी ट्रोलिंग शिकवले. आज प्रत्येक पक्षाकडे घोषणा आहेत, पण रोजगाराचा नकाशा नाही. हिंदू-मुस्लिम, जात-पात, मंदिर-मशीद या वादांत तरुणांना इतके गुंतवले गेले की त्यांच्या हातातून स्वतःचे भविष्यच निसटले. विडंबना अशी की, सत्ताधारी आपल्या मुलांचे भविष्य परदेशात सुरक्षित ठेवतात आणि सामान्य तरुणांना राष्ट्रवादाच्या नावाखाली रस्त्यावर उभे करतात. ज्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी लंडन, अमेरिकेची विद्यापीठे तयार असतात, तेच नेते गावातील तरुणाला “धर्मासाठी लढ” असा सल्ला देतात. लढणारा मात्र बेरोजगार तरुणच असतो; जिंकणारे नेहमीच सत्ताधारी असतात. न्यायालयातील वक्तव्यावर संताप व्यक्त करणे सोपे आहे. पण प्रश्न इतकाच नाही की न्यायाधीशांनी काय म्हटले. प्रश्न असा आहे की, समाजाने स्वतःची किंमत इतकी कमी का होऊ दिली? राजकारण्यांना, व्यवस्थेला आणि सत्तेला सामान्य तरुण “झुरळ” वाटू लागतो, यामागे वर्षानुवर्षांची सामाजिक उदासीनता आहे. कारण झुरळ मेले किंवा जगले, घरमालकाच्या आयुष्यावर फारसा फरक पडत नाही; तसाच सामान्य माणूस सत्तेसाठी केवळ गर्दीचा आकडा बनला आहे. तरुणांनी कोणाचाही झेंडा हातात घेण्यापूर्वी स्वतःच्या घराकडे पाहिले पाहिजे. आई-वडिलांच्या कष्टांचा विचार केला पाहिजे. आज जो तरुण घोषणा देत फिरतो, उद्या तोच पिता होणार आहे. त्याच्या मुलांच्या शिक्षणाची, उदरनिर्वाहाची जबाबदारी कोण घेणार? राजकीय नेते की त्यांची घोषणाबाजी? लोकशाहीत नागरिक हा “मतदार” असतो, “झुरळ” नाही. पण नागरिकाने स्वतःची किंमत ओळखली नाही, तर व्यवस्थाही त्याला तितक्याच तुच्छतेने पाहते. म्हणूनच आता वेळ आली आहे टाळ्या वाजवणारे हात थांबवून प्रश्न विचारण्याची. धर्माच्या, जातीच्या आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन रोजगार, शिक्षण आणि सन्मान या मुद्द्यांवर उभे राहण्याची. अन्यथा, व्यवस्था बदलणार नाही; फक्त झुरळांचा रंग बदलत राहील.

Cockroach Janata Party : तरुणांची किंमत फक्त झुरळांइतकी? व्यवस्थेचा खरा चेहरा उघडा! Read More »

Vijay Wadettiwar 1

Vijay Wadettiwar: डिझेलचा तुडवडा आणि खतांच्या कमतरतेमुळे शेतकरी उध्वस्त

Vijay Wadettiwar: देशात गेल्या दहा वर्षांत अनेक पेपर फुटले त्यातही नीट सारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील आणि सिस्टममधील लोकच त्यात सामील असतील, तर याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना थोडी जरी लाज आणि नैतिकता असती, तर त्यांनी आतापर्यंत आपल्या पदाचा राजीनामा दिला असता अशी घणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही हीच मागणी केली असून, या संवेदनशील पदावर बसलेल्या मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची कोणतीही काळजी नसल्याचे यातून सिद्ध होत असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणात मोटेगावकर किंवा अमित देशमुख यांच्या जुन्या विधानाचा आधार घेऊन सरकार स्वतःचे दोष लपवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका ही वडेट्टीवार यांनी केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून सरकार त्यांना जाणीवपूर्वक उद्ध्वस्त करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी दोनदा कर्जमाफीची घोषणा केली, मात्र अद्याप कोणताही स्पष्ट शासन निर्णय निघालेला नाही. राज्यात डिझेल-पेट्रोलचा निर्माण झालेला तुटवडा आणि आगामी काळात केवळ 25% खते उपलब्ध होतील, असे केंद्रीय मंत्र्यांचे सांगणे चिंताजनक आहे. डिझेलअभावी शेतीची मशागत आणि नांगरणी कशी होणार? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. सिस्टमविरोधात संताप व्यक्त करणाऱ्या तरुणांचे X (ट्विटर) हँडल्स बंद करून सरकार आपली भीती लपवत आहे. तरुणांना हिंदू-मुस्लिम किंवा भारत-पाकिस्तानच्या मुद्द्यांपेक्षा रोजगार हवा आहे.पण सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती जेव्हा तरुणांना कॉकरोच म्हणते, तेव्हा तरुणांच्या मनातील राग उफाळून येणे स्वाभाविक आहे. सरकारचा एकूण कारभार हा पूर्णपणे तरुण विरोधी असून तो राग आता व्यक्त होत आहे अस वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar: डिझेलचा तुडवडा आणि खतांच्या कमतरतेमुळे शेतकरी उध्वस्त Read More »

img 20260519 wa0072

Ahilyanagar Politics: नगरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल

Ahilyanagar Politics: अहिल्यानगरच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आणि चार वर्षांपासून गोठलेले राजकारण पुन्हा एकदा तापू लागले आहे. ही केवळ एक निवडणूक नाही तर जिल्ह्यातील बदलत्या राजकीय शक्तिसंतुलनाची पहिली मोठी चाचणी ठरणार आहे. विशेष म्हणजे, पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही जागा आता भाजपच्या वाढलेल्या संख्याबळामुळे महायुतीत कोणाच्या वाट्याला जाणार, हा खरा कुतूहलाचा विषय बनला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकराज असल्याने आणि अनेक संस्था अस्तित्वात नसल्याने ही जागा तब्बल चार वर्षे रिक्त राहिली. तरीही निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली, यामागे राजकीय अंकगणित स्पष्ट दिसते. ५५९ पैकी ९६ जागा रिक्त असल्या, तरी उर्वरित मतदाररचना भाजपसाठी अनुकूल असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये भाजपने मागील काही वर्षांत निर्माण केलेले वर्चस्व आता विधान परिषद निवडणुकीत कसोटीवर लागणार आहे. नगर जिल्ह्याच्या या मतदारसंघाचा इतिहासही तितकाच रंगतदार राहिला आहे. एका मताने दिग्गजांचा पराभव, मिठाईच्या बॉक्समधून उमेदवारीची चाहूल, मतदारांच्या ‘भावा’भोवती फिरणारे राजकारण या साऱ्यांनी या निवडणुकीला नेहमीच वेगळे स्थान मिळवून दिले. मर्यादित मतदारसंख्या असल्यामुळे येथे राजकीय गणिताइतकेच वैयक्तिक संबंध आणि स्थानिक प्रभाव महत्त्वाचा ठरतो. त्यामुळेच ही निवडणूक पक्षनिष्ठेपेक्षा सत्तासमीकरणांची अधिक असते. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट स्वतंत्रपणे राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे भाजपकडे जिल्ह्यात स्पष्ट संख्याबळ आहे. त्यामुळे “ही जागा भाजपलाच मिळावी” असा सूर पक्षातील निष्ठावंतांकडून उमटू लागला आहे. महायुतीतील जागावाटपात भाजप आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे, अजित पवार गटाकडून चंद्रशेखर घुले यांची इच्छा लपून राहिलेली नाही. तर राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राजक्त तनपुरे यांचे नावही चर्चेत आहे. तनपुरे यांनी घेतलेली ‘मवाळ’ भूमिका आणि त्याबदल्यात मिळालेल्या आश्वासनांच्या चर्चा आता या निवडणुकीच्या केंद्रस्थानी येतील. ते भाजपकडे झुकतात की अजित पवार गटाकडे, यावर अनेक समीकरणे बदलू शकतात. महाविकास आघाडीच्या दृष्टीने मात्र ही निवडणूक आव्हानात्मक आहे. काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट यांचे संख्याबळ मर्यादित असल्याने विजयासाठी त्यांना केवळ राजकीय चातुर्य आणि मतविभाजनावर अवलंबून राहावे लागेल. अशा वेळी ‘क्रॉस वोटिंग’ आणि अंतर्गत नाराजी हे घटक निर्णायक ठरू शकतात. नगर जिल्ह्याच्या राजकारणात ही निवडणूक केवळ एक जागा भरणारी प्रक्रिया नाही; तर आगामी जिल्हा परिषद, पालिका आणि विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम आहे. भाजपला आपले वर्चस्व अधिक मजबूत करायचे आहे, तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. त्यामुळे पुढील काही आठवड्यांत नगरचे राजकारण अधिक चुरशीचे, अधिक वैयक्तिक आणि अधिक अनपेक्षित वळणे घेणार, हे निश्चित.

Ahilyanagar Politics: नगरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल Read More »