Cockroach Janata Party : देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेतील एका मान्यवर व्यक्तीकडून आलेले शब्द कधी कधी न्यायापेक्षा अधिक बोचरे ठरतात. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांची तुलना “झुरळांशी” केली, तेव्हा प्रश्न फक्त एका वक्तव्याचा उरला नाही तो व्यवस्थेच्या मानसिकतेचा आरसा बनला. बेरोजगारीच्या आगीत होरपळणाऱ्या तरुणांना झुरळ म्हणणे म्हणजे त्यांच्या संघर्षाची थट्टा करण्यासारखे आहे.
आज देशात लाखो तरुण पदव्या घेऊन रस्त्यावर फिरत आहेत. नोकरी नाही, उद्योग नाही, आणि भविष्याची खात्री नाही. पण सत्ताधाऱ्यांच्या भाषणात मात्र ‘अमृतकाल’ ओसंडून वाहतो. वास्तवात मात्र हा “अमृतकाल” काही घराण्यांसाठी सुवर्णकाळ आणि सामान्य तरुणांसाठी धुरकट उद्याची शिक्षा ठरत चालला आहे.
राजकारणाने तरुणांना विचार देण्याऐवजी झेंडे दिले. रोजगार देण्याऐवजी घोषणा दिल्या. अभ्यासाऐवजी ट्रोलिंग शिकवले. आज प्रत्येक पक्षाकडे घोषणा आहेत, पण रोजगाराचा नकाशा नाही. हिंदू-मुस्लिम, जात-पात, मंदिर-मशीद या वादांत तरुणांना इतके गुंतवले गेले की त्यांच्या हातातून स्वतःचे भविष्यच निसटले.
विडंबना अशी की, सत्ताधारी आपल्या मुलांचे भविष्य परदेशात सुरक्षित ठेवतात आणि सामान्य तरुणांना राष्ट्रवादाच्या नावाखाली रस्त्यावर उभे करतात. ज्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी लंडन, अमेरिकेची विद्यापीठे तयार असतात, तेच नेते गावातील तरुणाला “धर्मासाठी लढ” असा सल्ला देतात. लढणारा मात्र बेरोजगार तरुणच असतो; जिंकणारे नेहमीच सत्ताधारी असतात.
न्यायालयातील वक्तव्यावर संताप व्यक्त करणे सोपे आहे. पण प्रश्न इतकाच नाही की न्यायाधीशांनी काय म्हटले. प्रश्न असा आहे की, समाजाने स्वतःची किंमत इतकी कमी का होऊ दिली? राजकारण्यांना, व्यवस्थेला आणि सत्तेला सामान्य तरुण “झुरळ” वाटू लागतो, यामागे वर्षानुवर्षांची सामाजिक उदासीनता आहे. कारण झुरळ मेले किंवा जगले, घरमालकाच्या आयुष्यावर फारसा फरक पडत नाही; तसाच सामान्य माणूस सत्तेसाठी केवळ गर्दीचा आकडा बनला आहे.
तरुणांनी कोणाचाही झेंडा हातात घेण्यापूर्वी स्वतःच्या घराकडे पाहिले पाहिजे. आई-वडिलांच्या कष्टांचा विचार केला पाहिजे. आज जो तरुण घोषणा देत फिरतो, उद्या तोच पिता होणार आहे. त्याच्या मुलांच्या शिक्षणाची, उदरनिर्वाहाची जबाबदारी कोण घेणार? राजकीय नेते की त्यांची घोषणाबाजी?
लोकशाहीत नागरिक हा “मतदार” असतो, “झुरळ” नाही. पण नागरिकाने स्वतःची किंमत ओळखली नाही, तर व्यवस्थाही त्याला तितक्याच तुच्छतेने पाहते. म्हणूनच आता वेळ आली आहे टाळ्या वाजवणारे हात थांबवून प्रश्न विचारण्याची. धर्माच्या, जातीच्या आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन रोजगार, शिक्षण आणि सन्मान या मुद्द्यांवर उभे राहण्याची. अन्यथा, व्यवस्था बदलणार नाही; फक्त झुरळांचा रंग बदलत राहील.






