DNA मराठी

Maharashtra

petrol

Petrol Price Today: जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका

Petrol Price Today: अहिल्यानगर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. मुबलक इंधन उपलब्ध जिल्हा प्रशासनाने IOCL, BPCL व HPCL या कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत आढावा बैठक घेतली असून, मागील सात दिवसांच्या सरासरीपेक्षा अधिक इंधन पुरवठा जिल्ह्यात करण्यात आला आहे. तांत्रिक अडचणींवर तत्काळ कार्यवाही काही पेट्रोल पंपांवर बिलिंग किंवा क्रेडिटच्या तांत्रिक कारणांमुळे किरकोळ विलंब झाल्यास, प्रशासनाकडून अवघ्या ४ ते ५ तासांत इंधन उपलब्ध करून देण्याची खात्री करण्यात येत आहे. प्रशासनाचा प्रभावी समन्वय शासनाचे संबंधित विभाग, गॅस एजन्सीज व पेट्रोल पंप चालक यांच्यात योग्य समन्वय राखण्यात आला असून, सर्व प्रकारचे इंधन सुरळीत उपलब्ध राहील यासाठी दक्षता घेतली जात आहे. नागरिकांना आवाहन जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त इंधन खरेदी करू नये. अफवांपासून दूर राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडून करण्यात आले आहे.

Petrol Price Today: जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका Read More »

iea report

IEA Report: भारताकडे किती दिवसांचा तेलाचा साठा शिल्लक? IEA च्या अहवालामुळे चिंता वाढली

IEA Report: वाढता जागतिक तणाव आणि पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संकटाचा परिणाम देशात आता थेट सामान्य नागरिकांच्या खिशावर जाणवू लागला आहे. तेलाच्या साठ्यांबाबत एक गंभीर इशारा देताना, ‘आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने’ (IEA) असे नमूद केले आहे की, जगातील व्यावसायिक तेलाचे साठे वेगाने कमी होत आहेत. परिस्थिती अशा टप्प्यावर पोहोचली आहे की, अनेक देशांकडे आता केवळ काही आठवडे पुरेल इतकाच तेलाचा साठा शिल्लक आहे. दरम्यान, भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असून, या प्रवृत्तीमुळे जनतेची चिंता अधिकच वाढली आहे. पॅरिसमध्ये आयोजित G-7 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीदरम्यान बोलताना, आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे प्रमुख फातिह बिरोल यांनी सांगितले की, ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (Strait of Hormuz) भागात वाढलेला तणाव आणि युद्धसदृश परिस्थितीचा जागतिक तेल पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. बिरोल यांच्या मते, परिस्थिती स्थिर करण्याच्या उद्देशाने दररोज आपत्कालीन साठ्यांमधून (emergency reserves) सुमारे 25 लाख बॅरल्स तेल बाजारात सोडले जात आहे. त्यांनी स्पष्टपणे इशारा दिला की हे साठे अमर्याद नाहीत जर हे संकट दीर्घकाळापर्यंत कायम राहिले, तर जगाला गंभीर ऊर्जा संकटाचा सामना करावा लागू शकतो. दोन महिन्यांत तेलाचे साठे विक्रमी नीचांकी पातळीवर संस्थेच्या अहवालानुसार, मार्च आणि एप्रिल या महिन्यांमध्ये जागतिक तेलाच्या साठ्यांमध्ये मोठी घट नोंदवली गेली. अवघ्या दोन महिन्यांतच तेलाचे साठे सुमारे 24 कोटी 60 लाख बॅरल्सने कमी झाले आहेत. तज्ञांचे असे मानणे आहे की, पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे, नजीकच्या भविष्यात तेलाची मागणी आणि पुरवठा यांमधील तफावत आणखी वाढू शकते. परिस्थितीमध्ये लवकर सुधारणा न झाल्यास, तेलाच्या किमतींमध्ये आणखी वाढ होऊ शकते, असा इशारा IEA ने यापूर्वीच दिला होता. भारताकडे तेलाचा किती साठा उपलब्ध? तेलाच्या संकटाबाबत वाढत्या चिंतांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी नुकतेच असे आश्वासन दिले की, भारताकडे सध्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सरकारच्या माहितीनुसार, देशाकडे कच्च्या तेलाचा (crude oil) सुरक्षित साठा उपलब्ध असून तो सुमारे 60 दिवस पुरेल इतका आहे. याव्यतिरिक्त, सुमारे 60 दिवस पुरेल इतका LNG (द्रवरूप नैसर्गिक वायू) आणि 45 दिवस पुरेल इतका LPG (द्रवरूप पेट्रोलियम वायू) यांचा साठाही उपलब्ध आहे. सरकारने हे देखील मान्य केले आहे की, जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने उच्च पातळीवर राहिल्या, तर त्याचा सरकारी तेल कंपन्यांवर प्रचंड आर्थिक दबाव येऊ शकतो. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ मंगळवारी, पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या दरात प्रति लिटर 90 पैशांची वाढ करण्यात आली. एकाच आठवड्यात तेल कंपन्यांनी इंधनाचे दर वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये, पेट्रोलचा दर वाढून तो अंदाजे ₹98.64 प्रति लिटर झाला आहे तर डिझेलही महाग होऊन ₹91.58 प्रति लिटरवर पोहोचले आहे. मुंबई, कोलकाता आणि चेन्नई यांसारख्या प्रमुख शहरांमध्येही इंधनाच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे. कोलकातामध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली, जिथे पेट्रोलचे दर ₹110 प्रति लिटरच्या जवळ पोहोचले आहेत आणि डिझेलचा दर ₹96.07 प्रति लिटर झाला आहे. दरम्यान, मुंबईमध्ये पेट्रोलचा दर आता ₹107.59 प्रति लिटर आणि डिझेलचा दर ₹94.08 प्रति लिटर झाला आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर ₹104.49 प्रति लिटरवर पोहोचला आहे, तर डिझेलचा दर ₹96.11 प्रति लिटर इतका आहे.

IEA Report: भारताकडे किती दिवसांचा तेलाचा साठा शिल्लक? IEA च्या अहवालामुळे चिंता वाढली Read More »

School

Badlapur Case : बदलापूर प्रकरणातील पीडित ‘निर्भया’ भगिनींच्या 10 वी पर्यंतच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आता शासनामार्फत

Badlapur Case : बदलापूर (जिल्हा ठाणे) येथील दुर्दैवी घटनेतील दोन्ही अल्पवयीन पीडित मुलींना (निर्भया क्र. १ व निर्भया क्र. २) सामाजिक-शैक्षणिक आधार देण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या दोन्ही मुलींच्या इयत्ता १० वी पर्यंतच्या शैक्षणिक प्रवेश शुल्काचा संपूर्ण खर्च ‘एक वेळची विशेष बाब’ म्हणून पूर्णपणे शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या विशेष पुढाकारामुळे हा निर्णय तातडीने मार्गी लागला असून, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पीडित कुटुंबांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.तसेच यापुढे अशाच घटनांच्या बाबतीत शासनामार्फत कायमस्वरूपी मदतीबाबत देखील शासन निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचारार्थ आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १४ मे २०२६ रोजी या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे. माहे ऑगस्ट २०२४ मध्ये बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या या अत्यंत अनुचित घटनेनंतर, पीडित मुलींच्या इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या शैक्षणिक प्रवेशाचा खर्च शासनस्तरावरून करण्यात येणार आहे. यानुसार निर्भया क्र. १ चे इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी पर्यंतचे संपूर्ण प्रवेश शुल्क शासन भरणार आहे. तसेचनिर्भया क्र. २ चे प्रलंबित असलेले सिनिअर के.जी. चे शुल्क आणि इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतचे सर्व प्रवेश शुल्क शासनामार्फत अदा केले जाणार आहे. हा संपूर्ण खर्च ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९’ (RTE) अंतर्गत थेट संबंधित शाळांना त्या-त्या शैक्षणिक वर्षामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. या निर्णयाबाबत बोलताना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले, “बदलापूरची घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि संपूर्ण समाजाला वेदना देणारी होती. त्या निष्पाप मुलींना केवळ कायदेशीर न्याय मिळवून देणे एवढेच आमचे कर्तव्य नाही, तर त्यांचे भविष्य सुरक्षित करणे ही देखील आमची सामाजिक जबाबदारी आहे. त्यांच्या पालकांवर शिक्षणाचा कोणताही आर्थिक भार पडू नये, यासाठी आम्ही तातडीने हा शासन निर्णय निर्गमित केला आहे. या दोन्ही लेकींनी कोणतीही चिंता न करता आपले शिक्षण पूर्ण करावे, शासन त्यांच्या पाठीशी एका पालकाच्या भूमिकेतून खंबीरपणे उभे आहे.” या प्रक्रियेत पीडित कुटुंबाला कोणत्याही प्रशासकीय त्रासाला सामोरे जावे लागू नये, यासाठी निधी वितरणाची पद्धत अत्यंत सुटसुटीत ठेवली गेली आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे संबंधित प्राथमिक शिक्षणाधिकारी या शुल्काबाबतचा प्रस्ताव शिक्षण संचालक (प्राथमिक), पुणे यांच्याकडे सादर करतील. शिक्षण संचालकांकडून मंजुरी मिळताच हे शुल्क थेट संबंधित शाळांना अदा करण्याची कार्यवाही जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत केली जाईल. राज्य शासनाने घेतलेल्या या संवेदनशील निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, यामुळे पीडित मुलींच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठी शासनाच्या वतीने एक भक्कम पाया रचला गेला आहे.

Badlapur Case : बदलापूर प्रकरणातील पीडित ‘निर्भया’ भगिनींच्या 10 वी पर्यंतच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आता शासनामार्फत Read More »

hsrp number plate

HSRP Number Plate : मोठी बातमी! 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) बसविणे अनिवार्य

HSRP Number Plate : राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना १ जुलै पासून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट बसविणे अनिवार्य केले आहे. यासाठी यापूर्वी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यातील उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) बसविण्याच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी आता ही मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट्स आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP ) ही अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात जुन्या वाहनांनाही उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी मुदतवाढीचा लाभ घेत वेळेत HSRP बसवून घ्यावी.” वाहन मालकांनी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन HSRP बसविण्यासाठी आगाऊ वेळ (Appointment) निश्चित करावी. संबंधित वाहनधारकांनी ३० जून २०२६ पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरनाईक पुढे म्हणाले की, “ज्या वाहनधारकांनी मुदतीत HSRP बसवून घेतले नाही किंवा अपॉइंटमेंट नोंदवली नाही, अशा वाहनांची १ जुलै २०२६ पासून रस्त्यावर विशेष तपासणी मोहीम राबवून पडताळणी करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल तसेच १ हजार रुपयांपर्यंत तडजोड शुल्क (Compounding Fees) आकारण्यात येईल.” वाहनधारकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच HSRP साठी नोंदणी करावी आणि कोणत्याही अनधिकृत व्यक्ती अथवा एजंटच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहनही परिवहन मंत्र्यांनी केले आहे. राज्यातील सर्व वाहनधारकांनी वाहन सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रक्रिया गांभीर्याने घेत शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

HSRP Number Plate : मोठी बातमी! 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) बसविणे अनिवार्य Read More »

ashok kharat

Ashok Kharat Case: अशोक खरात विरोधात 17 गुन्हे दाखल; न्यायालयात दाखल होणार दोषारोप पत्र

Ashok Kharat Case : संपूर्ण राज्यात चर्चेत असणारा नाशिक जिल्ह्यातील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत १७ गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी ९ गुन्ह्यांचा तपास SIT करत आहे. ३ गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलीस करीत आहे. तसेच ३ गुन्ह्यांचा तपास नाशिक शहर पोलीस करीत आहेत. २ गुन्ह्यांचा तपास नाशिक ग्रामीण पोलीस करीत आहेत. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी अशोक खरात आरोपी असलेल्या गुन्ह्याचा तपास SIT चे मार्फतीने करणेबाबत आदेश केल्यामुळे २० मार्च पासून या व इतर १०, अशा एकूण ११ गुन्ह्यांचा तपास SIT करीत आहे. या विशेष तपास पथकामध्ये तपास अधिकारी म्हणून २ पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक तपास अधिकारी म्हणून ३ पोलीस निरीक्षक, ३ सहा. पोलीस निरीक्षक, १० पोलीस उपनिरीक्षक व ६ पोलीस अंमलदार असे एकूण २४ पोलिसांचे पथक कार्यरत आहे. SIT कडे तपासास असलेल्या एकूण ११ गुन्ह्यांमध्ये महिला अत्याचाराचे एकूण ८ गुन्हे आहेत. तसेच फसवणूकीचा १ गुन्हा आहे. तसेच अशोक खरात याने साक्षीदारांविरूद्ध खोटा खंडणीचा १ गुन्हा दाखल केला होता. अशोक खरात याने फिर्यादीवर दबाव टाकून साक्षीदाराविरूद्ध १ गुन्हा दाखल केला होता, असे २ गुन्हे आहेत. उर्वरित ८ गुन्ह्यांचा तपास संबंधीत घटक करत आहेत. अशोक खरात विरूद्ध दाखल असलेल्या एकूण गुन्हयांपैकी ८ गुन्हे हे महिलांचे लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत. तसेच उर्वरित ९ गुन्हे हे फसवणूक सह अंधश्रद्धा विरोधी कायदा, सावकारी अधिनियम २०१४ व इतर या प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. महिला लैंगिक अत्याचाराचे सर्व ८ गुन्हे व फसवणुकीचा १ गुन्हा SIT तपास करीत आहे. आजपर्यंतच्या तपासा दरम्यान १०५ पेक्षा अधिक साक्षीदारांकडे विचारपूस केलेली आहे. साक्षीदारांकडे व पीडितांकडे केलेल्या चौकशीतून आरोपी हा पीडित व्यक्ती व कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन, भीती दाखवून, खडे, चिंचुके, रूद्राक्ष, पुजा, विधी आदी माध्यमातून त्यांचेकडून पैसे उकळत होता, तसेच महिलांना स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देवून त्यांचे लैंगिक शोषण करत होता. तसेच ईशानेश्वर मंदिराच्या परिसरात अंधारामध्ये, हात चलाकीने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून समाजामध्ये सातत्याने अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करत होता, याबाबत आरोपी विरोधात मौखिक, भौतिक, दस्तऐवजी, परिस्थितीजन्य, इलेक्ट्रॉनिक पुरावा असे पुरावे प्राप्त झाले आहेत. त्या अनुशंगाने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचे काम सुरू आहे. महिलांशी संबंधीत गुन्ह्यांमध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यापासून ६० दिवसांच्या आत दोषोरापपत्र दाखल करणे आवश्यक असते. अशोक खरात विरोधात लैंगीक अत्याचाराचा पहिला गुन्हा १७ मार्च रोजी दाखल झाला. त्या नंतर आठवडा भरात इतर सात गुन्हे दाखल आहेत. आज रोजी एकुण लैंगिक अत्याचारांचे गुन्ह्यांपैकी अशोक खरात विरोधातील एकूण २ गुन्ह्यांचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेले आहेत. उर्वरीत गुन्ह्यांचे देखील दोषारोपपत्र येत्या काही दिवसात न्यायालयात दाखल करण्यात येतील. SIT कडे असणाऱ्या गुन्ह्यांमधील पीडितांचे सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेले आक्षेपार्ह व्हिडीओच्या १३ हजार १७५ लिंक्स SIT च्या सायबर टीमने महाराष्ट्र सायबरच्या मदतीने SIT ने काढून टाकल्या आहेत. तसेच सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट पुन्हा पुन्हा टाकणारे ४५१ अकाऊंट देखील कायमस्वरूपी काढून टाकण्यात आले आहेत. पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित केल्या प्रकरणी आतापर्यंत २ गुन्हे दाखल केले गेले आहेत. गुन्हयातील आरोपी अशोककुमार एकनाथ खरात हा एकूण ४९ दिवस वेगवेगळ्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाचे कस्टडीत होता. त्यानंतर त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली. सध्या तो इतर ठिकाणच्या गुन्ह्यात अटक आहे. आज पावेतो दाखल गुन्हयांचे तपासामध्ये प्राप्त झालेल्या साक्षी पुराव्यांवरून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झालेले असले तरीही वरील गुन्ह्यांचा तपास पुढे सुरूच राहणार असुन अधिकचे पुरावे प्राप्त होताच ते न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्रासह दाखल करण्यात येतील, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Ashok Kharat Case: अशोक खरात विरोधात 17 गुन्हे दाखल; न्यायालयात दाखल होणार दोषारोप पत्र Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis on Police Housing Scheme : मोठी बातमी! राज्यात पोलिसांना घरांसाठी 1768.08 कोटी मंजूर

Devendra Fadnavis on Police Housing Scheme : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत राज्यातील पोलीस विभागाला मोठा दिलासा दिला आहे. 5459 पोलिसांना घरांसाठी घरबांधणी अग्रीम म्हणून 1768.08 कोटी रुपयांना मंजुरी प्रदान करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडे आलेल्या या प्रस्तावांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आली असं त्यांनी सांगितले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील पोलिसांना घर खरेदीसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2014 ते 2019 या काळात मोठ्या संख्येने पोलिसांना घरांसाठी व्याजसवलत अनुदान योजना राबविण्यात आली होती मात्र महाविकास आघाडीच्या काळात ही योजना बंद करण्यात आली होती. महायुतीच्या काळात ही योजना पुन्हा एकदा सुरु करत 5459 पोलिसांना घरांसाठी घरबांधणी अग्रीम म्हणून 1768.08 कोटी रुपयांना मंजुरी प्रदान करण्यात आली असं देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे. नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? एक्सवर पोस्ट देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्याने कार्यरत आपल्या पोलिसांना घरे मिळाली पाहिजे, यासाठी प्रारंभीपासून मी आग्रही राहिलो आहे. त्यामुळेच 2014 ते 2019 या काळात मोठ्या संख्येने पोलिसांना घरांसाठी व्याजसवलत अनुदान योजना राबविण्यात आली. महाविकास आघाडीच्या काळात ती योजना बंद केली गेली होती. नंतर पुन्हा आम्ही ती योजना सुरु केली. आज मला सांगताना आनंद होतो की, आमच्या 5459 पोलिसांना घरांसाठी घरबांधणी अग्रीम म्हणून 1768.08 कोटी रुपयांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडे आलेल्या या प्रस्तावांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे. डीजी लोन म्हणजे काय? पोलीस कर्मचाऱ्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने डीजी लोन (DG Loan – गृहबांधणी अग्रिम) योजना पुन्हा एकदा सुरू केली आहे. या योजनेद्वारे पोलिसांना घरांसाठी कमी व्याजदरात कर्ज आणि अनुदान उपलब्ध करून देण्यात येतो. ही एक विशेष गृह कर्ज योजना असल्याने कॉन्स्टेबलपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांच्या गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत सहजपणे गृहकर्ज उपलब्ध करून देण्यात येतो. पोलिस कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर हक्काचे घर मिळावे आणि सरकारी वसाहतींवरील ताण कमी व्हावा, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील कर्मचारी कॉन्स्टेबल ते निरीक्षक स्तरापर्यंत या योजनेत सर्वांना लाभ मिळणार आहे.

Devendra Fadnavis on Police Housing Scheme : मोठी बातमी! राज्यात पोलिसांना घरांसाठी 1768.08 कोटी मंजूर Read More »

heatwave

Heat Wave Alert: जिल्ह्यात उष्मालाटेचा ‘यलो अलर्ट’ ; उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Heat Wave Alert : भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार, १४ मे २०२६ पर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाटेची शक्यता वर्तविण्यात आलेली असून “यलो अलर्ट” जारी करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचे मानव व पशू-प्राणी यांच्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. प्रशासनाने नागरिकांना खालीलप्रमाणे दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत : नागरिकांनी काय करावे ? काय करू नये ?

Heat Wave Alert: जिल्ह्यात उष्मालाटेचा ‘यलो अलर्ट’ ; उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन Read More »

oplus 131072

Nilesh Lanke: खासदार निलेश लंके चर्चेत; भोंदूबाबा नानासाहेब विरकरचा आशीर्वाद घेतानाचे फोटो व्हायरल

Nilesh Lanke: नाशिक जिल्ह्यात खरात प्रकरण अजूनही ताजेच असताना, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातून रविवारी एक धक्कादायक घटना समोर आली. माढा तालुक्यातील आहेगाव येथे दरबार भरवणारा कथित भोंदूबाबा नानासाहेब विरकर उर्फ गुरु माऊली महाराज आणि त्याच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. भोंदूगिरी, फसवणूक आणि आर्थिक लुबाडणुकीसह विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे भोंदूबाबा नानासाहेब विरकर आणि अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुरु माऊली महाराज हा आहेगाव येथील स्वतःच्या पाच एकर जागेत एसी दरबार भरवत होता. दरबारात आलेल्या भक्तांनी फक्त नाव सांगितल्यानंतर त्यांच्या बँक खात्याचा क्रमांक आणि खात्यातील शिल्लक रक्कम अचूक सांगत असल्याचा दावा केला जात होता. त्यामुळे अनेक भाविक त्याच्याकडे आकर्षित होत होते.दरम्यान, खासदार निलेश लंके आणि त्यांच्या पत्नी राणी लंके यांचे या गुरुमाऊलीसोबतचे काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेषतः या भोंदू बाबाचा आशीर्वाद घेताना निलेश लंके दिसत आहे. राणी लंके जिल्हा परिषद सदस्य असताना गुरुमाऊली भक्त परिवाराने त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याचा फोटो देखील समोर आला आहे. तसेच एका फोटोमध्ये खासदार निलेश लंके यांनी गुरुमाऊलीला शाल घालून सन्मान केल्याचे दिसत आहे. खासदार निलेश लंके यांच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये “करेक्ट नियोजन, परफेक्ट कार्यक्रम” अशी कॅप्शन देत गुरुमाऊलीचा आशीर्वाद मिळाल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे आता या फोटो आणि पोस्टवरून विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक स्तरावर गुरुमाऊलीबाबत अनेक दावे केले जात होते. बंगालमध्ये सात-आठ वर्षे राहून त्याने “काळी विद्या” शिकल्याची चर्चा होती. तसेच तो स्वतःला हनुमानाचा अवतार असल्याचे सांगत असल्याचाही दावा केला जात आहे.राजकारणात विजय मिळवून देण्याची क्षमता असल्याचे तो सांगत असल्याने, 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्याचा काही प्रभाव होता का, अशा चर्चाही आता सुरू झाल्या आहेत. मात्र, या सर्व दाव्यांना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. पोलिस तपासानंतरच सत्य स्पष्ट होणार सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून, आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीच्या आरोपांची चौकशी सुरू आहे.

Nilesh Lanke: खासदार निलेश लंके चर्चेत; भोंदूबाबा नानासाहेब विरकरचा आशीर्वाद घेतानाचे फोटो व्हायरल Read More »

img 20260511 wa0035

Nilesh Lanke: खासदार लंके यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा…, रूबी हॉलमध्ये राजकीय नेत्यांच्या भेटी

Nilesh Lanke : विषाणूजन्य ताप आणि डिहायड्रेशनमुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नीलेश लंके यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांकडून देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त केली जात असताना आता उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे. रविवारी दिवसभर विविध राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निकटवर्तीयांनी रूबी हॉल क्लिनिक येथे जाऊन खा. लंके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह नगर जिल्हा आणि राज्यातील अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची भेट घेत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. गेल्या गुरुवारी खा. लंके यांना प्रकृती अधिक बिघडल्याने पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सततचे दौरे, सामाजिक मोहिमा, लग्नसराईतील कार्यक्रम, अपुरी विश्रांती आणि शारीरिक थकवा यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. तामीळनाडूतील जिंजी किल्ल्यावर राबविण्यात आलेल्या स्वच्छता व संवर्धन मोहिमेत सहभाग घेतल्यानंतर ते कोल्हापूर, नाशिक, संगमनेर आणि नगर जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. प्रकृती अस्वस्थ असतानाही त्यांनी कार्यक्रम सुरूच ठेवले. याच धावपळीचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाल्याचे बोलले जात आहे. बी. रूबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना त्यांना विषाणूजन्य ताप आणि डिहायड्रेशनचा त्रास झाल्याचे स्पष्ट केले होते. अतिदक्षता विभागाच्या संचालक डॉ. प्राची साठे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांकडून देण्यात आली. डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असून पुढील काही दिवस सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Nilesh Lanke: खासदार लंके यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा…, रूबी हॉलमध्ये राजकीय नेत्यांच्या भेटी Read More »