DNA मराठी

Ahilyanagar

farmers

E Pik Pahani : शेतकऱ्यांनो, ई-पीक पाहणी नोंदणी 21 मेपूर्वी करा नाहीतर…

E Pik Pahani : उन्हाळी हंगाम २०२५-२०२६ करिता राज्यात ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणीस सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी २४ मे २०२६ पूर्वी आपल्या पिकांची अचूक नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. पिकांची नोंदणी न केल्यास सातबारा उताऱ्यावर पीक नोंद कोरी राहील व ती नंतर भरता येणार नाही. परिणामी, अवकाळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या काळात मिळणारी मदत, पीक विमा तसेच शासकीय अनुदान मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. शासन निर्णयानुसार ई-पीक पाहणी प्रक्रिया दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. शेतकरी स्तरावर ८ एप्रिल ते २४ मे २०२६ या कालावधीत, तर सहाय्यक स्तरावर २५ मे ते ८ जुलै २०२६ या कालावधीत पिकांची नोंद करण्यात येईल. उन्हाळी हंगामात शेतात उभे असलेले पीक, कायम पड तसेच चालू स्थितीत पड असलेल्या जमिनींची नोंद करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेची शंभर टक्के अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्व तहसीलदारांना निर्देश देण्यात आले आहेत. भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी विहित कालावधीत मोबाईलद्वारे पीक नोंदणी पूर्ण करावी, असे‌ आवाहनही आशिया यांनी केले आहे.

E Pik Pahani : शेतकऱ्यांनो, ई-पीक पाहणी नोंदणी 21 मेपूर्वी करा नाहीतर… Read More »

nagar urban bank

Nagar Urban Bank : नगर अर्बन बँक घोटाळा; आरोपींची मालमत्ता जप्त होणार

Nagar Urban Bank : नगर अर्बन बँक घोटाळ्यातील आरोपी चेअरमन, संचालक, वरिष्ठ अधिकारी तसेच काही मोठ्या कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय हा ठेवीदारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व दिशादर्शक ठरला आहे. या निर्णयामुळे बँक बुडवणाऱ्या जबाबदार घटकांवर ठोस कारवाईची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. नगर अर्बन बँकेतील चेअरमन, संचालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संगनमताने भ्रष्ट कारभार करत बँकेचे अस्तित्व धोक्यात आणले. ठेवीदारांचा निधी धोक्यात घालून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार करण्यात आले. शासन व रिझर्व बँकेकडून वेळोवेळी सूचना देऊनही सुधारणा न करता भ्रष्टाचार सुरूच ठेवण्यात आला. विशेषतः 2014 नंतर मल्टीस्टेटच्या नावाखाली कायद्याचा गैरफायदा घेत भ्रष्टाचारात मोठी वाढ झाली. या सर्व प्रकाराचा परिणाम म्हणून 2023 मध्ये बँकेचा परवाना रद्द झाला आणि ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले. सुमारे 114 वर्षांची परंपरा असलेल्या बँकेचा जवळपास 175 कोटी रुपयांचा निधी धोक्यात आला. 2017 पासून सभासदांना लाभांश मिळणे बंद झाले, तर अनेक कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ आली. दरम्यान, बँक बचाव समितीने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत मोठ्या प्रमाणावर वसुली केली. आतापर्यंत ठेवीदारांना सुमारे 70 टक्के रक्कम परत मिळाली आहे. उर्वरित 30 टक्क्यांपैकी 15 टक्के रक्कम एप्रिल 2024 मध्ये देण्याची प्रक्रिया सुरू असून उर्वरित 15 टक्क्यांसाठीही लढा सुरू राहणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. देशभरात ठेवीदारांना एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम परत मिळवून देण्याचे हे एकमेव उदाहरण मानले जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने 18 मार्च 2024 रोजी अधिसूचना काढून संबंधित आरोपी, संचालक, अधिकारी व काही कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. जप्त करण्यात येणाऱ्या मालमत्तांची एकूण किंमत कोट्यवधी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. या कारवाईतून ठेवीदारांचे पैसे, व्याज, बँकेचा निधी, सभासदांचा लाभांश तसेच कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न होणार आहे. तसेच, संबंधित आरोपींकडून मालमत्ता विक्री करून सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी शासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अधिसूचनेत संबंधित मालमत्तांची सविस्तर यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, बँक बचाव समितीच्या प्रयत्नांमुळे ठेवीदारांना न्याय मिळत असून, 114 वर्षांची परंपरा असलेली नगर अर्बन बँक पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पत्रकार परिषदेत राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा, अ‍ॅड. अच्युत पिंगळे व डी. एम. कुलकर्णी यांनी दिली. यामधील आरोपी सुरेश शिवराम सातपुते, केशव भाऊसाहेब काळे, विनोदकुमार अण्णासाहेब श्रीखंडे, अनिल चंदुलाल कोठारी, महादेव पंढरीनाथ साळवे, अजय अमृतलाल बोरा, रवींद्र विठ्ठल कडूस, सतीश विठ्ठल रोकडे, मनेष दशरथ साठे, गिरीश केदारनाथ लाहोटी, राजेंद्र केशवराव डोळे, नवनीत शांतीलाल सुपरिया, प्रगती देवेंद्र गांधी, सरोज दिलीप गांधी, शैलेश सुरेश मुनोत, दिनेश पोपटलाल कटारिया, अक्षय राजेंद्र लुनावत, केदार मुरलीधर लोहाटी, शिवदास दिलीप गायकवाड, शितल शिवदास गायकवाड, सचिन दिलीप गायकवाड, दीप्ती सुरेंद्र गांधी, देवेंद्र दिलीप गांधी, सुरेंद्र दिलीप गांधी, संदीप ईश्वरदार वाघमारे, रवींद्र विठ्ठल जेजुरकर, अशोकलाल माधवलाल कटारिया, राजेंद्र बहिरू म्हस्के, आशुतोष सतीश लांडगे या व्यक्तींची कुणीही कोणत्याही जमिनीचा व पैशाचा व्यवहार करू नये कारण जमिनी हे महाराष्ट्र शासनाकडून जप्त करण्यात येणार असल्याने व्यवहार करू नये असे बँक बचाओ समितीने सांगितले.

Nagar Urban Bank : नगर अर्बन बँक घोटाळा; आरोपींची मालमत्ता जप्त होणार Read More »

cockfighting

Ahilyanagar Crime : कोंबड्यांची झुंज अन्…, 21 जणांवर गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime : नगर तालुक्यातील पोखर्डी शिवारात कोंबड्यांच्या झुंजी लावून त्यावर जुगार खेळणाऱ्या २१ जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून जेरबंद केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम राजेश बोध (वय-२७, रा. झेंडीगेट, अहिल्यानगर), आशरफ बाहुला खान (वय-५०,रा. आलमगीर ता.जि. अहिल्यानगर), मोहम्मद उस्मान अली शेख (वय-४०, रा. महिम उन्नती सोसायटी मुंबई), अमजद युसुफ मगदुम वय-४३, रा. नागपुरचा येरवडा पुणे), सय्यद अझर अक्तर वय-४०, रा. पंचपिर चावडी अहिल्यानगर), रोहीत श्रीचंद गोहिर (वय-३३, रा. हरिचामळा दरेवाडी, ता.जि. अहिल्यानगर), संदिप ओमप्रकाश कुडीया (वय-३२, रा. वसंत टेकडी अहिल्यानगर), राम हिरालाल क्षत्रिय (वय-४६ रा. भद्रकाली फुले मार्केट नाशिक), तौफिक सिकंदर शेख (वय-२८, रा. नेवसा खुर्द ता.नेवासा), अजहर खुदाबक्श शेख (वय-३४, रा.. मुकुंदनगर अहिल्यानगर), योगेश मनोहर छजलांनी (वय-४०, रा. हरिचामळा दरेवाडी, ता.जि. अहिल्यानगर), संतोष गणेश गोयल (वय- ३९, रा. शाहापुर ता.जि. अहिल्यानगर), विकी लक्ष्मण सुजगोहर वय-४६ रा. येरवडा पुणे), जितेंद्र चंद्रकांत म्हात्रे (वय- ४०, रा. भिवंडी जि.ठाणे), अमीन सरदार शेख (वय-४२, रा. गजराजनगर ता.जि. अहिल्यानगर), तुषार संतोष मुलतांनी वय-२९ रा. मगळवारपेठ पुणे), समीर फिरोज शेख (वय-२२ रा. अकोले नाका संगमनेर), वसीम सलीम शेख (वय-७० रा. येरवडा पुणे), गोविंद शाम राजुडीया (वय-६३, रा. मंगळवारपेठ पुणे), सोहेल कबीर सय्यद वय-३८ रा. मुकुंदनगर अहिल्यानगर), उत्तम एकनाथ साळवे ( वय-४०, रा. देवळाली कॅम्प, नाशिक जि.नाशिक), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशान्वये पथक एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोखर्डी शिवारातील पिंपळगाव उज्जनी रस्त्यावर एका मोकळ्या जागेत कापडी मंडप उभारून कोंबड्यांच्या झुंजी लावल्या जात असल्याची माहिती मिळाली. माहितीची खात्री करून पथकाने तत्काळ घटनास्थळी छापा टाकला. तेथे काही व्यक्ती कोंबड्यांची झुंज लावत असून उपस्थित नागरिक त्यावर पैशांची पैज लावत असल्याचे आढळले. पोलिसांनी २१ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकूण २४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahilyanagar Crime : कोंबड्यांची झुंज अन्…, 21 जणांवर गुन्हा दाखल Read More »

hpv vaccine

HPV Vaccination जिल्ह्यात 14 वर्षीय मुलींसाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम ; 9 मार्चपासून सुरुवात

HPV Vaccination : जिल्ह्यात ९ मार्च २०२६ ते ८ जून २०२६ या कालावधीत १४ वर्षे पूर्ण केलेल्या व १५ वर्षे पूर्ण न केलेल्या मुलींसाठी HPV लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचा राष्ट्रीय स्तरावर शुभारंभ करण्यात आला असून ८ मार्च २०२६ रोजी महिला दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली याचा राज्यस्तरीय शुभारंभ होईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. या मोहिमेत एकूण लोकसंख्येच्या सुमारे १ टक्का लाभार्थी अपेक्षित असून त्यांना गार्डासिल-४ या लसीचा एकच डोस देण्यात येईल. ही लस ०.५ मिली इतकी डाव्या दंडाच्या वरच्या भागात स्नायूमध्ये दिली जाईल. लसीकरण सत्र सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत चालेल व सर्व पात्र लाभार्थ्यांची तसेच दिलेल्या लसीची नोंद यू-विन पोर्टलवर केली जाणार आहे. लसीकरणापूर्वी लाभार्थी उपाशी पोटी नसेल याची पालकांनी खात्री करावी. लस देण्याआधी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून लाभार्थीची तपासणी केली जाईल. प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन करण्यात आले असून लस घेतल्यानंतर लाभार्थीला तीस मिनिटे लसीकरण सत्राच्या ठिकाणी थांबवले जाईल. मध्यम किंवा तीव्र आजार असलेल्या मुलींना त्या पूर्णपणे बऱ्या होईपर्यंत लस दिली जाणार नाही. ज्या मुलींना मागील लसीकरणामुळे ॲलर्जी आली असेल किंवा यीस्टची ॲलर्जी असेल त्यांना ही लस दिली जाणार नाही. अपेक्षित वयोगटाबाहेरील मुलींना व ज्यांनी यापूर्वी कोणतीही एचपीव्ही लस घेतली असेल त्यांना या मोहिमेत लस मिळणार नाही. या मोहिमेच्या यशस्वी नियोजनासाठी जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी व सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. तसेच गाव पातळीवरील आशा, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांचेही प्रशिक्षण घेण्यात आले आहे. ही मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नगरगोजे , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे व जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी केले आहे.

HPV Vaccination जिल्ह्यात 14 वर्षीय मुलींसाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम ; 9 मार्चपासून सुरुवात Read More »

Ahilyanagar Crime : कोपरगावात धक्कादायक घटना; दगडाने ठेचून 33 वर्षीय युवकाचा खून  

Ahilyanagar Crime :  अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. संवत्सरजवळील रामवाडी येथे दगडाने ठेचून 33 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला आहे. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान मंदिरासमोर ही घटना घडली आहे. मृत युवकाचे नाव नवनाथ माधव कानफाटे (वय 33) असे असून, अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर दगड आणि विटांनी सपासप वार करत जागीच ठार मारल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात दगड-विटांचा खच आढळून आला असून, परिसर अक्षरशः रक्ताने माखलेला होता. या भीषण प्रकारामुळे रामवाडी गाव हादरून गेले आहे. घटनेची माहिती मिळताच शिर्डी विभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती आणि कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने, पीएसआय दीपक रोठे यांच्यासह अधिकाऱ्यांनी पंचनामा करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संशयितांचा माग काढण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.   खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी जुना वाद, वैयक्तिक वैर किंवा अन्य काही कारण या दिशेने पोलीस तपास करत आहेत. रात्री उशिरापर्यंत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास वेगाने सुरू आहे. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. गावकऱ्यांमध्ये भीतीचे सावट असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.  

Ahilyanagar Crime : कोपरगावात धक्कादायक घटना; दगडाने ठेचून 33 वर्षीय युवकाचा खून   Read More »

maharashtra politics

Maharashtra Politics: आधी स्वतःचं आयुष्य घडा…, मगच जात-धर्माच्या लढाया

Maharashtra Politics : आज राज्यात एक विचित्र चित्र दिसत आहे. तरुणांच्या आयुष्याशी संबंधित खरे प्रश्न बाजूला पडत चालले आहेत आणि जात-धर्माच्या नावावर वातावरण तापवण्याचे प्रकार वाढत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट, भाषणांमध्ये आक्रमक शब्द आणि रस्त्यावरचे वाद यात सर्वात जास्त वापर होत आहे तो युवकांच्या भावनांचा. खरं पाहिलं तर आजच्या तरुणासमोरचे प्रश्न वेगळे आहेत. कॉलेजची वाढती फी, शिक्षणासाठी घेतलेली कर्जे, नोकरीची अनिश्चितता, शेतीतून मिळत नसलेले उत्पन्न आणि वाढती महागाई हेच वास्तव आहे. अनेक घरांमध्ये आई-वडील मुलांच्या भविष्यासाठी जीव तोडून मेहनत करत आहेत. पण या प्रश्नांवर मोठं आंदोलन किंवा ठाम चर्चा क्वचितच दिसते. कारण तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवले जाते. जात आणि धर्माच्या नावावर भडकवणे हे आज काही लोकांसाठी राजकीय साधन बनले आहे. भावना पेटल्या की प्रश्न विचारले जात नाहीत आणि हाच काही राजकारण्यांचा फायदा असतो. वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी समाजात विभागणी निर्माण केली जाते. तरुणांना पुढे करून संघर्ष उभा केला जातो, पण त्या संघर्षात भडकावणाऱ्यांची स्वतःची मुलं किंवा कुटुंबीय कधीच दिसत नाहीत. दंगली, भांडणं किंवा आक्रमक आंदोलनांत अडकणारा तरुण मात्र सामान्य घरातून आलेला असतो. एका चुकीच्या क्षणी झालेला गुन्हा संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. पोलिस केस, कोर्टकचेऱ्या, नोकरीच्या संधी संपणे याचा फटका फक्त त्या मुलाला नाही, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला बसतो. भडकावणाऱ्यांचे काहीच बिघडत नाही; नुकसान होते ते सर्वसामान्यांच्या भविष्याचे. जात आणि धर्माचा अभिमान ठेवणे चुकीचे नाही. पण त्या नावाखाली स्वतःचे आयुष्य धोक्यात घालणे शहाणपणाचे नाही. कारण एक गोष्ट स्पष्ट आहे, तुम्ही सुरक्षित आणि सक्षम असाल तरच तुमची ओळख टिकते. तुम्हीच नसाल तर जात-धर्माचा अर्थ उरत नाही. आज युवकांनी स्वतःला एक साधा प्रश्न विचारायला हवा, आपण कोणासाठी रागावतो आहोत? आपल्या भविष्याकरिता की कोणाच्या राजकीय फायद्यासाठी? जे लोक सतत भडकवतात, त्यांच्या भूतकाळाकडे पाहा; अनेकदा वैयक्तिक स्वार्थातून सुरू झालेल्या गोष्टींना नंतर सामाजिक रंग दिला जातो. हे ओळखण्याची जबाबदारी युवकांचीच आहे. आज गरज आहे ती दिशा बदलण्याची. शिक्षण परवडणारे व्हावे, रोजगार वाढावा, शेतीला योग्य भाव मिळावा, महागाई कमी व्हावी या मुद्द्यांवर तरुणांनी आवाज उठवला तरच खरा बदल घडेल. रागाने नव्हे, तर विचाराने समाज बदलतो. आई-वडील तुमच्यासाठी आयुष्य झिजवत असतात. तुमच्या एका चुकीच्या पावलाने त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे निर्णय घेताना घोषणांपेक्षा घरातील परिस्थिती आठवा. तरुणांनो, भावना ठेवा पण विवेकही ठेवा. राजकारण तुमच्यासाठी असावे; तुम्ही राजकारणासाठी नाही. आधी स्वतःचं आणि कुटुंबाचं आयुष्य घडा… बाकीच्या लढाया नंतरही लढता येतात.

Maharashtra Politics: आधी स्वतःचं आयुष्य घडा…, मगच जात-धर्माच्या लढाया Read More »

mla kashinath date

MLA Kashinath Date : शेतकऱ्यांच्या भावना भडकवून राजकीय खेळी करु नका; आमदार काशिनाथ दाते भडकले

MLA Kashinath Date : कुकडी डावा कालवा व पिंपळगाव जोगा डावा कालव्याच्या आवर्तनाबाबत काही घटकांकडून जाणीवपूर्वक गैरसमज पसरवून शेतकऱ्यांच्या भावनांना चिथावणी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची खंत व्यक्त करत आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकरी बांधवांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या पाण्याच्या प्रश्नाला राजकीय रंग देत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा डाव उधळून लावा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व ग्रामस्थांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आमदार दाते सर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन कुकडी व पिंपळगाव जोगा कालव्याचे आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्या- नंतर मंत्री विखे पाटील यांच्यामार्फत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून कुकडी कालव्याद्वारे 5 मार्च दरम्यान तर 25 फेब्रुवारी ते 1 मार्च च्या दरम्यान पिंपळगाव कालव्यांद्वारे पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही वेळेत आवर्तन सोडण्यात आले असल्याचे नमूद करत त्यांनी शेतकऱ्यांनी अफवांना बळी न पडता प्रशासनावर विश्वास ठेवावा, असे आवाहन केले. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून कोणत्याही परिस्थितीत त्यांना न्याय मिळवून देण्याची आपली बांधिलकी कायम राहील, अशी ग्वाहीही आमदार काशिनाथ दाते यांनी दिली. येडगाव धरणातील अपेक्षित पाणीसाठा, तांत्रिक बाबी आणि सर्व लाभक्षेत्रांचा विचार करूनच आवर्तनाचे नियोजन केले जाते. दोन-तीन दिवसांचा विलंब तांत्रिक कारणास्तव होऊ शकतो मात्र 5 मार्चपर्यंत पाणी निश्चितपणे उपलब्ध होईल, यावर कोणीही राजकारण करू नका अस यावेळी आमदार काशिनाथ दाते म्हणाले.

MLA Kashinath Date : शेतकऱ्यांच्या भावना भडकवून राजकीय खेळी करु नका; आमदार काशिनाथ दाते भडकले Read More »

pathardi

Pathardi Crime : गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटणारे दरोडेखोर जेरबंद; पाथर्डी पोलिसांची कामगिरी

Pathardi Crime : शहरातील माणिकदौंडी चौक परिसरात मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक प्रकारात गावठी कट्टा दाखवत युवकास मारहाण करून दुचाकी व रोख रक्कम लुटल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशन पोलिसांनी झडप घालत पाच आरोपींपैकी तिघांना अटक केली असून दोघांचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्यांपैकी दोघे अल्पवयीन असल्याचे उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमिर हबिब शेख (वय ३४, रा. माणिकदौंडी चौक) हे फ्लेक्स व्यवसाय करतात. त्यांनी २१ फेब्रुवारी रोजी रात्री आपली यमाहा लिबोरो (क्र. एमएच-१६ डब्ल्यू ३३१९) घरासमोर उभी केली होती. २२ फेब्रुवारी रोजी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास बॅनर लावण्यासाठी बाहेर पडताच त्यांच्या दुचाकीजवळ पाच जण संशयास्पद हालचाली करताना दिसले. शेख यांनी विचारणा केली असता तिघे जण दुचाकीची वायर तोडत असल्याचे आढळले. विरोध करताच दोघांनी त्यांना पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच वेळी एका आरोपीने कमरेतील गावठी कट्टा काढून त्यांच्या डोक्याला लावला व गप्प बस नाहीतर गोळी घालीन अशी धमकी दिली. भीतीपोटी शेख खाली बसले असता त्यांच्या खिशातील ६५० रुपये हिसकावण्यात आले. त्यानंतर आरोपींनी दुचाकी पळवून नेली, तर दोन जण पल्सरवरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन दराडे, बाबासाहेब बडे,नारायण बडे,ज्ञानेश्वर इलग, संजय जाधव,इजाज सय्यद,निलेश गुंड, संदीप बडे,संदीप नागरगोजे ,भगवान गरगडे, प्रल्हाद निळे या पोलीस पथकाने तातडीने कारवाई करत अनिकेत शामवेल शिंदे वय २२ रा. शितलानगर देहूरोड पुणे याचे सह आणखी दोघा अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. एका सज्ञान आरोपीस न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. वापरलेली पल्सरही चोरीची असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

Pathardi Crime : गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटणारे दरोडेखोर जेरबंद; पाथर्डी पोलिसांची कामगिरी Read More »

sujay vikhe

Sujay Vikhe: सुजय विखे पाटील यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी निवड; अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण

Sujay Vikhe : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश संघटनात महत्त्वपूर्ण बदल करत भारतीय जनता पक्षने अहिल्यानगर जिल्ह्याचे युवा नेतृत्व आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. डॉ. सुजय विखे पाटील हे जिल्ह्यातील सक्रिय, अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. खासदार म्हणून त्यांनी विविध विकासकामांसाठी पाठपुरावा केला असून युवक आणि ग्रामीण भागातील प्रश्न मांडण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या संघटन कौशल्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली असल्याचे मानले जात आहे. प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होईल आणि राज्यभरात भाजपची ताकद वाढेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या निवडीमुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात राज्याच्या राजकारणात डॉ. सुजय विखे पाटील यांची भूमिका अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Sujay Vikhe: सुजय विखे पाटील यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी निवड; अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण Read More »

sujay vikhe

Sujay Vikhe Patil: राज्यसभेची वाटचाल : सुजय विखे पाटील यांची राजकीय पुनर्स्थापना की वारसाहक्काचा विस्तार?

Sujay Vikhe Patil: अहिल्यानगरच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत घडलेल्या घडामोडींनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे. पराभव हा राजकीय कारकिर्दीचा शेवट नसतो, तर अनेकदा तो नव्या उभारणीचा प्रारंभ ठरतो. माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या संदर्भात हीच प्रक्रिया सध्या दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर त्यांनी घेतलेली राजकीय पुनर्बांधणीची दिशा आणि आता राज्यसभेच्या संभाव्य उमेदवारीच्या चर्चा, या केवळ वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा भाग नाहीत; त्या महाराष्ट्राच्या बदलत्या सत्तासमीकरणांचेही प्रतीक आहेत. पराभवानंतरची पुनर्बांधणी : पराभव की संधी? लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर अनेक नेते राजकीय अंधारात जातात. परंतु सुजय विखे पाटील यांनी हा पराभव आत्मपरीक्षणाची संधी मानून संघटनात्मक पातळीवर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. सहकार क्षेत्रातील नेतृत्व स्वीकारून त्यांनी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. सहकार हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा कणा मानला जातो. या क्षेत्रात नेतृत्व मिळवणे म्हणजे केवळ आर्थिक नव्हे, तर सामाजिक आणि राजकीय प्रभावही निर्माण करणे होय. याच काळात विधानसभा निवडणुकांमध्ये आणि स्थानिक राजकारणात त्यांनी घेतलेली सक्रिय भूमिका, विशेषतः संगमनेरमधील राजकीय समीकरणांमध्ये झालेला बदल, यामुळे त्यांच्या नेतृत्वाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. स्थानिक आमदारांच्या निवडणुकीत आणि महानगरपालिका सत्तास्थापनेत त्यांनी निभावलेली भूमिका, ही त्यांच्या संघटन कौशल्याची चुणूक मानली जाते. राज्यसभा : पराभूत नेत्यांसाठी पुनरागमनाचा मार्ग? भारतीय संसदीय व्यवस्थेत राज्यसभा ही केवळ “वरिष्ठ सभागृह” नसून अनेकदा ती राजकीय पुनरागमनाचे व्यासपीठ ठरते. लोकसभेत पराभव झालेल्या किंवा थेट निवडणूक लढवणे कठीण झालेल्या नेत्यांना राज्यसभेद्वारे संसदेत स्थान दिले जाते. त्यामुळे सुजय विखे पाटील यांच्या संभाव्य राज्यसभा उमेदवारीकडे केवळ वैयक्तिक प्रगती म्हणून पाहणे अपुरे ठरेल. ही एक व्यापक राजकीय रणनीती असू शकते. भाजपसाठी अहिल्यानगर आणि आसपासचा भाग हा परंपरेने काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. या भागात पक्षाची ताकद वाढवण्यात विखे पाटील कुटुंबाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाला अशा प्रभावशाली कुटुंबातील नेत्याला राष्ट्रीय पातळीवर संधी देण्याचा विचार आकर्षक वाटणे स्वाभाविक आहे. वारसा आणि नेतृत्व : कौटुंबिक प्रभावाचा प्रश्न सुजय विखे पाटील यांच्या राजकीय प्रवासात त्यांच्या वडिलांचा, राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रभाव नाकारता येणार नाही. सहकार, प्रशासन आणि राज्यकारभारातील त्यांचा अनुभव हा सुजय विखे पाटील यांच्यासाठी मार्गदर्शक ठरला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कौटुंबिक वारसा ही नवी गोष्ट नाही; शरद पवार, ठाकरे, चव्हाण, मुंडे यांसारख्या अनेक घराण्यांनी ही परंपरा निर्माण केली आहे. मात्र, वारसा हा केवळ प्रवेशद्वार असतो; टिकून राहण्यासाठी वैयक्तिक नेतृत्वगुण आवश्यक असतात. सुजय विखे पाटील यांनी स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो त्यांच्या वैयक्तिक क्षमतेचा दाखला मानला जाऊ शकतो. राज्यसभा उमेदवारी : पक्षनिष्ठेचे पारितोषिक की रणनीतिक गरज? राज्यसभेची उमेदवारी ही अनेकदा पक्षनिष्ठा, संघटनात्मक योगदान आणि भविष्यातील राजकीय संभाव्यता या तिन्ही गोष्टींचा संगम असते. भाजपसारख्या पक्षासाठी महाराष्ट्रात मजबूत स्थानिक नेतृत्व निर्माण करणे ही दीर्घकालीन गरज आहे. सुजय विखे पाटील यांची संभाव्य निवड ही या व्यापक रणनीतीचा भाग असू शकते. तथापि, राज्यसभेत जाणे म्हणजे केवळ प्रतिष्ठा नव्हे, तर जबाबदारीही आहे. राष्ट्रीय स्तरावर धोरणनिर्मितीत सहभाग, राज्याच्या प्रश्नांना संसदेत मांडणे आणि मतदारसंघाच्या अपेक्षांचे प्रतिनिधित्व करणे, ही राज्यसभा सदस्याची मूलभूत कर्तव्ये आहेत. पुनरागमन की नव्या पर्वाची सुरुवात? सुजय विखे पाटील यांच्या राज्यसभा संभाव्य उमेदवारीच्या चर्चा या केवळ राजकीय अफवा म्हणून दुर्लक्षित करता येणार नाहीत. त्या महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलत्या प्रवाहाचे संकेत आहेत. पराभवानंतरही राजकीय सक्रियता कायम ठेवून संघटनात्मक पातळीवर स्वतःला सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न, हा त्यांच्या नेतृत्वाच्या महत्त्वाकांक्षेचा पुरावा आहे. राजकारणात वारसा महत्त्वाचा असतो, पण अंतिम कसोटी ही जनतेचा विश्वास आणि नेतृत्वाची परिणामकारकता यांचीच असते. राज्यसभेचा मार्ग खुला झाला, तर तो सुजय विखे पाटील यांच्यासाठी केवळ पुनरागमन नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरील नव्या राजकीय पर्वाची सुरुवात ठरू शकतो.

Sujay Vikhe Patil: राज्यसभेची वाटचाल : सुजय विखे पाटील यांची राजकीय पुनर्स्थापना की वारसाहक्काचा विस्तार? Read More »