Neet Exam: नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे राहुरी तालुक्यातील पूर्व भागात असणाऱ्या महाडुक सेंटर (माहेगाव) येथपर्यंत पोहचले आहेत. या प्रकरणात येथील बीए एम एस शिक्षण घेतलेल्या धनंजय निवृत्ती लोखंडे यांस सीबीआयच्या तपास पथकाने राहुरी येथून रात्री उशिरा ताब्यात घेतल्याने राहुरीमध्ये खळबळ उडाली आहे.
नाशिक येथील शुभम खैरनार याला ताब्यात घेतल्यानंतर तो फरार होता. धनंजय याने दोन वर्षापूर्वी आपले वैद्यकीय शिक्षण कर्नाटक येथील मंगरूळ येथे पूर्ण केले. गेल्या चार वर्षापासून तो पुणे येथील वाघोली येथे वास्तव्यास असून त्याने येथे प्रॅक्टीस देखील करत असल्याचे सांगण्यात येते.
मेडिकल ॲडमिशन कॉन्सिनिलिंगचे देखील तो काम करत असल्याचे समोर आले आहे. त्याचे वडील एका शिक्षण संस्थेत लिपिक म्हणून काम करतात. सीबीआयने नाशिक येथून शुभम खैरनार याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या जबाबातून धनंजय याचे नाव समोर आल्याने त्याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. याबाबत कुटुंबीयांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र, धनंजय असे कृत्य करू शकत नसल्याचे माध्यमांना नंतर त्यांनी सांगितले.
नीट प्रकरणाचे मोठे रॅकेट यामधून बाहेर येण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत असून सीबीआय आता काय तपास करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.






