Ahilyanagar Accident : काही कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून मंगळवारी (ता. ५) सकाळी साडेदहाच्या सुमारास मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वैशाखरे फाट्याजवळ राज्य परिवहन मंडळाची बस व स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील हे कुटुंब मुंबईच्या दिशेने जात असताना वैशाखरे फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एसेटी बसशी त्यांच्या वाहनाची जोरदार धडक झाली. या अपघातात अविनाश रामचंद्र काकडे, अभिषेक भाऊसाहेब मोटे (दोघे रा. वडाळा, ता. नेवासा), निता अशोक धुरे आणि मीना कल्याण मडके (दोघी रा. भेंडा, ता. नेवासा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मोनिका अभिषेक मोटे, आराध्या अभिषेक मोटे, वेदांश अभिषेक मोटे आणि मनीषा रामदास बहक हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी कल्याण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती तहसिलदार अभिजित देशमुख यांनी दिली.
‘कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. मात्र बेशिस्त आणि बेदरकार वाहन चालकांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहेत. गेल्याच महिन्यात १३ एप्रिल रोजी रायते पुलावर झालेल्या अपघातात ११ जणांना प्राण गमवावे लागले होते. त्या घटनेला महिना उलटत नाही तोच आज पुन्हा चौघांचा बळी गेल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा अपघात कशामुळे झाला, नेमकी चूक कुणाची हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. घटनेची माहिती मिळताच टोकावडे पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.






