Manoj Jarange on Eknath Shinde : मराठवाड्यातील काही मराठा महिला लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्यानंतर मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे.
एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले की, मराठा समाजाने त्यांना साथ दिली होती, परंतु आता समाजाचा विश्वासघात झाल्याची भावना आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही आरक्षणाच्या प्रश्नावर राजकारण केल्याचा आरोप केला.
यावेळी जरांगे म्हणाले की, एकनाथ शिंदे तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो. सत्तेत गेलात म्हणून आमच्यावर माज उतरवणार का? शिंदे साहेब, तुम्ही डबल गेम खेळत आहात का? एकीकडून ओबीसी सांभाळत आहात का? परळीच्या टोळीवाल्याच्या नादी लागून तुमच्या ऑफिसला कसे येतात? मराठ्यांचा विरोध करणारे ओबीसी नेते तुमच्या बाळासाहेब भवनमध्ये येतात कसे? मराठ्यांचे काही समन्वयक तुम्ही माझ्या अंगावर घालत आहात. एकीकडे मी पण लागतो. तुमचाच एक नेता ज्याचे संभाजीनगरला कॉलेज आहे. तिथे माझ्या विरोधात बैठका होतात. मैत्री करावी तर ठासून करावी. तुमचा गद्दारीचा डाग पुसायला आम्ही मराठे आहोत. आमच्यावर उद्धव ठाकरे बरे म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका. आम्ही तुमचे सीट पडणार असा इशारा मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला.






