Vijay Choudhary: उत्तर महाराष्ट्रासह नंदुरबार, जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील राजकारणात कथित ध्वनीफितींमुळे मोठी खळबळ उडालेली असतानाच, या प्रकरणातील मुख्य संशयित आणि गेल्या काही दिवसांपासून फरार असलेले भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांना अखेर नंदुरबार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई करून चौधरी यांना ताब्यात घेतले आणि नंदुरबार शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. गुरुवारी रात्री उशिरा वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना अधिकृतपणे अटक करण्यात आली असून, शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
ॲट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये तीन गुन्हे दाखल
सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने प्रसारित झालेल्या कथित ध्वनीफितीत भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबद्दल आक्षेपार्ह व जातीवाचक विधाने केल्याचा ठपका चौधरी यांच्यावर आहे. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह ॲट्रॉसिटी इतर विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी यांनीही विजय चौधरी यांच्याविरोधात अशाच स्वरूपाची स्वतंत्र तक्रार दाखल केली. सध्या डॉ. हिना गावित, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मालती वळवी आणि आमदार आमश्या पाडवी यांच्याशी संबंधित वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर दाखल गुन्ह्यांनुसार ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. विजय चौधरी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून त्यांच्यावर आतापर्यंत सुमारे तीन गुन्हे दाखल झाले आहेत.
या तपासादरम्यान प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. विजय चौधरी यांच्या मोबाईलमधील ध्वनीफिती चोरून, त्यांची परस्पर विक्री करून त्या सोशल मीडियावर पसरवल्याचा आरोप झाला. यासंदर्भात चौधरी यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या माजी स्वीय सहाय्यकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी पीएला ताब्यात घेतले होते, मात्र चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याला न्यायालयातून जामीन मंजूर झाला आहे.
व्हायरल झालेल्या या कथित ऑडिओ क्लिप्समध्ये मंत्री गिरीश महाजन, मंत्री जयकुमार रावल,आमदार आमश्या पाडवी, राजेश पाडवी आणि अमरीश पटेल यांच्यासह इतर अनेक प्रमुख राजकीय नेत्यांशी झालेले संभाषण असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे राजकीय नेत्यांची बदनामी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मात्र, संबंधित राजकीय नेत्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या ध्वनीफितींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून आवाज आणि संभाषणात छेडछाड आणि फेरफार करण्यात आल्याचा दावा नेत्यांकडून करण्यात आला आहे.
नंदुरबारमध्ये दररोज नव्या कथित ध्वनीफिती बाहेर येत असल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. विजय चौधरी यांच्या अटकेनंतर आता पोलीस तपासात काय नवे सत्य समोर येते आणि या प्रकरणाचे धागेधोरे कुठेपर्यंत पोहोचतात, याकडे उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.






