Dattatray Bharne : राज्य सरकारच्या वतीने पहिल्यांदा छोट्या आणि दुसऱ्यांदा साधारण १७ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी जाहीर केली आहे. कर्जमाफीसाठी केवायसी (KYC) चे काम युद्ध पातळीवर सुरू असून आतापर्यंत 12 लाखांच्या आसपास काम पूर्ण झाले आहे.
येणाऱ्या एक-दोन दिवसांमध्ये कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात होईल असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
माध्यमांशी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या अडचणीच्या काळात माझ्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली आहे. कर्जमाफीचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना होणार असून सरकार 40 हजार कोटींची मदत देणार आहे. निवडणूक डोळ्यासमोर नसताना सुद्धा अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत करणे ही सरकारची जबाबदारी होती. खचलेला शेतकरी पुन्हा कसा उभा राहील यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न आहे.
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचे सिबिल खराब होणार नाही, अशी काळजी घेतली आहे. बँकेला शासनाकडून रक्कम कमी आली तरी उरलेली रक्कम बँकांनी माफ करायची आहे, असा करार झाला आहे. कर्जमाफीनंतर शेतकऱ्याला त्याच दिवशी ‘नील’चा दाखला मिळेल आणि दुसऱ्या दिवसापासून नवीन पीक कर्ज वाटप केले जाईल. शेतकऱ्यांनी संयम ठेवावा, अजून दोन-तीन याद्या लागायच्या बाकी आहेत.
शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की, आपण आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे. सोयाबीन बियाणे न उगवल्याबाबत तक्रारी आल्यावर संबंधित कंपन्यांवर थेट एफआयआर दाखल केले आहेत. अशा कंपन्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही आणि शेतकऱ्यांना दुबार बियाणे मिळण्यासाठी सहकार्य करू.
कर्तव्यात कसूर करणाऱ्या तालुका कृषी अधिकारी आणि सहाय्यकांना निलंबित करण्यात आले आहे. खतांच्या लिंकिंग बाबत सरकारने जीआर काढला असून लिंकिंग करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाईल. ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी आहे, इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नाही.
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत मी सहमत असून राज्य सरकार त्यांना निश्चित मदत करेल. राज्यात आतापर्यंत साधारणतः 90 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. नाशिक विभागात सर्वाधिक 95 टक्के, तर ठाणे विभागात सर्वात कमी 66 टक्के पेरणी झाली असल्याची देखील माहिती त्यांनी दिली.






