DNA मराठी

latest news

rain alert

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय; मराठवाड्यासह ‘या’ भागात पावसाचा इशारा

Maharashtra Rain Alert : राज्यात मान्सूनचा जोर २ महिने कमी झाल्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचे वातावरण तयार झाले आहे. एकीकडे देशाच्या पश्चिम भागातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असताना दुसरीकडे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या नव्या हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत आगामी काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या प्रणालीची तीव्रता वाढून २१ सप्टेंबरला त्याचे अवदाबात, तर २२ सप्टेंबरपर्यंत तीव्र अवदाबात रूपांतर होण्याची शक्यता आहे. ही हवामान प्रणाली पुढे दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकण्याचा अंदाज आहे. या बदलाचा परिणाम महाराष्ट्रातील पावसावरही होत असून राज्यात पुन्हा पावसाळी स्थिती निर्माण होत आहे. अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २१ सप्टेंबर रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, हिंगोली, परभणी, नांदेड, नाशिकचा घाट परिसर, अहिल्यानगर, पुण्याचा घाट परिसर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या भागांत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. २२ सप्टेंबरला पावसाचा जोर वाढणार २२ सप्टेंबर रोजी राज्यातील काही भागांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यांसह मराठवाड्यातील नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव तसेच सोलापूर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पडू शकतात. २३ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता २३ सप्टेंबरपासून राज्यातील पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता कायम राहू शकते. राज्याच्या उर्वरित भागात हवामान प्रामुख्याने कोरडे किंवा ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली असली तरी बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या जिल्ह्याचा हवामान अंदाज आणि प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे, तसेच मुसळधार पावसाच्या काळात नदी, नाले आणि घाट परिसरात अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय; मराठवाड्यासह ‘या’ भागात पावसाचा इशारा Read More »

gautami patil

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी; पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आणि तरुणाईची तुफान गर्दी त्यात काही तरुणांकडून झालेली हुल्लडबाजी या सगळ्यामुळे शेवगाव शहरातील खंडोबानगर येथील खंडोबा मैदानावर रविवारी काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्याने पोलिसांना अखेर मैदानात हस्तक्षेप करावा लागला. तरुणांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.गणेशभक्त आणि रसिक प्रेक्षकांसाठी आयोजित भव्य सांस्कृतिक महोत्सवात सायंकाळी गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाची माहिती मिळताच शेवगावसह परिसरातील तरुणांनी खंडोबा मैदानाकडे मोठी गर्दी केली. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच मैदान आणि परिसर गर्दीने फुलून गेला होता. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर गर्दीत आणखी वाढ झाली आणि काही वेळातच तरुणांचा उत्साह हुल्लडबाजीकडे वळला. तरीही तरुण ऐकेनात… गर्दी वाढत असताना काही तरुणांकडून गोंधळ सुरू झाला. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी धावपळ निर्माण झाली. संयोजक आणि पोलिसांकडून गर्दीला शिस्त लावण्याच्या सूचना करण्यात आल्या. मात्र, काही तरुणांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली. अखेर पोलिसांनी पुढाकार घेत गर्दीला मागे हटवण्यास सुरुवात केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यानंतर गर्दी काही प्रमाणात नियंत्रणात आली. कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गौतमी पाटील यांनी पोलिस प्रशासनाचे कौतुक केले. पोलीस प्रशासनामुळे माझे कार्यक्रम सुखरूप आणि चांगले होतात असे सांगत त्यांनी पोलिस प्रशासनाचे आभार मानले.कार्यक्रमांमध्ये मोठी गर्दी होते आणि त्यामुळे अनेकदा गोंधळाच्या घटना घडतात. अशा परिस्थितीत पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या बंदोबस्तामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडण्यास मदत होते, असेही गौतमी पाटील यांनी सांगितले. संस्कृती बिघडते, असे कार्यक्रम होऊ नयेत या प्रश्नावर गौतमींचे मौन प्रसारमाध्यमांनी गौतमी पाटील यांना अशा प्रकारचे कार्यक्रम होऊ नयेत, यामुळे कुठेतरी संस्कृती बिघडते, त्यामुळे असे कार्यक्रम बंद व्हायला हवेत का?असा सवाल केला.यावर गौतमी पाटील यांनी सध्या या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला. मला आत्ता सध्याला त्या गोष्टीवर बोलायचं नाही. त्यावेळेस मला वाटेल, त्यावेळेस मी बोलेल अशी स्पष्ट प्रतिक्रिया त्यांनी दिली. गौतमीच्या कार्यक्रमाला तरुणाईची क्रेझ गौतमी पाटीलच्या लावणी आणि नृत्याची तरुणाईमध्ये मोठी लोकप्रियता आहे. तिच्या कार्यक्रमांच्या चित्रफिती सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असल्याने तिच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होताना दिसते. शेवगावमधील कार्यक्रमालाही त्याचा प्रत्यय आला. गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण मैदानात दाखल झाले होते.

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी; पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात Read More »

babasaheb patil

Babasaheb Patil : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर RBI ची मोठी कारवाई; जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून हटवले

Babasaheb Patil : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावर सलग दहा वर्षांपेक्षा अधिक काळ राहिल्याच्या आक्षेपावरून भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) त्यांच्यावर कारवाई केली असून, त्यांना संचालकपदावरून दूर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात बँकेचे सभासद आणि अधिकृत मतदार प्रतिनिधी सतीश शेषराव जाधव यांनी केलेल्या तक्रारीपासून झाली. त्यांनी 25 मे 2026 रोजी RBIकडे तक्रार दाखल करत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील आठ संचालकांनी निर्धारित कालावधीपेक्षा अधिक काळ पदावर राहिल्याचा आरोप केला होता. या यादीत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचाही समावेश होता. दहा वर्षांच्या कार्यकाळाचा नियम चर्चेत सहकारी बँकांच्या संचालकांच्या कार्यकाळाबाबत करण्यात आलेल्या कायद्यातील बदलामुळे हे प्रकरण महत्त्वाचे ठरले आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, सहकारी बँकांमधील अध्यक्ष आणि पूर्णवेळ संचालक वगळता इतर संचालकांचा सलग कार्यकाळ कमाल दहा वर्षांचा करण्याची तरतूद करण्यात आली आहे. सतीश जाधव यांनी आपल्या तक्रारीत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 19 सदस्यांच्या संचालक मंडळातील आठ संचालकांच्या कार्यकाळावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्यावर नियमांनुसार अपात्र ठरवण्याची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्याचबरोबर बँकेतील कथित नोकरभरती प्रक्रियेबाबतही तक्रारीत आक्षेप नोंदवण्यात आले होते. उच्च न्यायालयातही प्रकरण या प्रकरणी सतीश जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. 3 ऑगस्ट 2026 रोजी न्यायालयाने संबंधित प्राधिकरणाला 25 मे रोजी करण्यात आलेल्या तक्रारीवर गुण-दोषांच्या आधारे सहा आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, न्यायालयाने स्वतः आठ संचालक अपात्र असल्याचा अंतिम निष्कर्ष दिलेला नव्हता; RBIने तक्रारीवर निर्णय घ्यावा, एवढाच निर्देश देण्यात आला होता. यानंतर तक्रारीतील आठ संचालकांपैकी सात जणांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याचे वृत्त आहे. मात्र, बाबासाहेब पाटील यांनी राजीनामा दिला नाही. त्यानंतर RBIकडून त्यांना संचालकपदावरून दूर करण्याची कारवाई करण्यात आली. तक्रारीत कोणत्या संचालकांची नावे? तक्रारीमध्ये बाबासाहेब पाटील यांच्यासह आठ संचालकांचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामध्ये अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर, श्रीपतराव निवृत्ती काकडे, स्वयंप्रभा धनंजय पाटील, व्यंकटराव धोंडीराम बिरादार, पृथ्वीराज हरिश्चंद्र सिरसाट, प्रमोद जाधव आणि नागोराव आर. पाटील यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. तक्रारीत त्यांच्या बँकेतील कार्यकाळावर आक्षेप घेण्यात आला होता. बाबासाहेब पाटील काय म्हणाले? RBIच्या कारवाईवर बाबासाहेब पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. 2021 मध्ये संचालकांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळासंदर्भात झालेला कायदा आपल्याला लागू होतो, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे आपल्याला संचालकपदावरून हटवता येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. RBI चा निर्णय योग्य नसून या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार.

Babasaheb Patil : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर RBI ची मोठी कारवाई; जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून हटवले Read More »

img 20260918 wa0013

Gondhal Movie : ‘गोंधळ’ ची 99व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड

Gondhal Movie : अकरा वर्षांपूर्वी ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाला भारताची अधिकृत ऑस्कर प्रवेशिका म्हणून निवडले गेले होते. त्यानंतर आता ‘गोंधळ’च्या रूपाने पुन्हा एकदा महाराष्ट्राला आणि मराठी चित्रपटसृष्टीला ऑस्करच्या व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे. हा क्षण आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा, भावनिक आणि ऐतिहासिक आहे. ‘डोरोथी’, ‘बालन’, ‘बायसन’, ‘अंग’, ‘मैं वापस आऊंगा’, ‘धुरंधर -१, ‘धुरंधर -२ ’, ‘इक्कीस’, ‘बॉर्डर २’, ‘देऊळबंद २’ आणि ‘द शेप ऑफ मोमो’ यांसारखे विविध भाषांतील अनेक दर्जेदार आणि चर्चित चित्रपट भारताच्या अधिकृत ऑस्कर प्रवेशाच्या शर्यतीत होते. काही चित्रपटांना आंतरराष्ट्रीय महोत्सवांची पार्श्वभूमी होती, तर ‘धुरंधर’सारख्या चित्रपटांमागे भव्य निर्मितीमूल्य, मोठे कलाकार आणि प्रचंड व्यावसायिक ताकद होती. या विविध आणि तगड्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या जिवंत सांस्कृतिक परंपरेचे प्रभावी सिनेमॅटिक दर्शन घडवणाऱ्या मराठी ‘गोंधळ’ची निवड झाली आणि भारताचे अधिकृत ऑस्कर प्रतिनिधित्व करण्याचा ऐतिहासिक मान चित्रपटाला मिळाला. ‘गोंधळ’चा मूळ गाभा भारतीय मातीतला असला, तरी चित्रपटाची सिनेमॅटिक भाषा, तांत्रिक गुणवत्ता आणि निर्मितीमूल्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत. त्यामुळे जागतिक स्पर्धेत हा चित्रपट प्रभावीपणे उभा राहू शकतो, याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे. भारताचे प्रतिनिधित्व करताना आवश्यक असलेली संपूर्ण मेहनत, ताकद आणि साधने आम्ही या अभियानासाठी लावणार आहोत. आमच्या चित्रपटावर विश्वास दाखवल्याबद्दल भारत सरकार, फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया आणि एफएफआयच्या निवड समितीतील सर्व मान्यवर ज्युरी सदस्यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. अनेक मोठ्या आणि दर्जेदार चित्रपटांमधून ज्युरीने ‘गोंधळ’ची निवड केली, ही आमच्यासाठी सन्मानासोबतच एक मोठी राष्ट्रीय जबाबदारी आहे. लहानपणापासून ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंकडे आम्ही अपार अभिमानाने पाहात आलो आहोत. आज ‘गोंधळ’च्या माध्यमातून जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी आमच्यावर आली आहे, तेव्हा मनात अगदी तशीच भावना आहे. हा केवळ एका चित्रपटाचा गौरव नाही, भारतीय संस्कृती, महाराष्ट्राची जिवंत लोकपरंपरा आणि आपल्या मातीतून जन्मलेल्या कथेला मिळालेला राष्ट्रीय सन्मान आहे. या सर्वोच्च सन्मानाविषयी बोलताना सर्वप्रथम माझ्या डोळ्यांसमोर ‘गोंधळ’ची संपूर्ण टीम उभी राहते. प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ आणि सहकाऱ्याने प्रामाणिकपणे, व्यावसायिक निष्ठेने आणि जिवापाड मेहनत घेऊन हा चित्रपट उभा केला. त्यामुळे या यशाचे श्रेय माझ्या एकट्याचे नसून संपूर्ण ‘गोंधळ’ परिवाराचे आहे. सध्या आम्ही सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी असलो, तरी येत्या दोन-तीन दिवसांत संपूर्ण टीम एकत्र येऊन या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा करणार आहोत. माझ्या कुटुंबीयांनी माझ्यावर आणि या स्वप्नावर अखंड विश्वास ठेवला. आमच्या इतर कंपन्यांतील संचालक, अधिकारी आणि प्रत्येक स्तरावरील सहकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. त्यांनी व्यावसायिक कामकाजाची जबाबदारी स्वीकारल्यामुळे मला पूर्ण एकाग्रतेने चित्रपटनिर्मितीकडे लक्ष देता आले. उत्तम टीम, कुटुंबाचा विश्वास आणि सर्व सहकाऱ्यांच्या भक्कम पाठबळामुळेच हा प्रवास शक्य झाला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच आम्ही एक गोष्ट ठामपणे सांगत आलो आहोत, ‘गोंधळ’ची तुलना केवळ प्रादेशिक चित्रपटांशी न करता जगातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपटांशी व्हावी. आज एफएफआयच्या ज्युरीने ‘गोंधळ’वर दाखवलेला विश्वास आमच्या त्या भूमिकेला आणखी बळ देणारा आहे. ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठीचे आमचे आंतरराष्ट्रीय अभियान लवकरच सुरू होत आहे. त्यासाठी नियोजनबद्ध, सक्षम आणि प्रभावी रोडमॅप तयार करण्यात आला आहे. भारताचे प्रतिनिधित्व जागतिक स्तरावर अत्यंत ताकदीने, प्रतिष्ठेने आणि जबाबदारीने करण्यासाठी आमची संपूर्ण टीम सज्ज आहे. ‘गोंधळ’ पाच वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये प्रदर्शनासाठी तयार आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या जागतिक प्रदर्शनाचेही नियोजन करण्यात आले आहे. भारतातील आणि जगभरातील प्रदर्शनाच्या तारखा आम्ही लवकरच अधिकृतपणे जाहीर करू. हा चित्रपट त्याची भव्य दृश्यभाषा, जिवंत ध्वनी आणि प्रभावी सिनेमॅटिक अनुभूती यांमुळे मोठ्या पडद्यावरच पाहण्यासारखा आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी कोणत्याही अनधिकृत किंवा पायरेटेड प्रतीवर अवलंबून न राहता ‘गोंधळ’ चित्रपटगृहातच अनुभवावा. ‘गोंधळ’ मर्यादित कालावधीसाठी प्रदर्शित केला जाणार आहे. प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट स्वतः पाहावा, आपल्या कुटुंबीयांना व मित्रांना पाहण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि भारताच्या या ऑस्कर प्रवासाचा अभिमानाने भाग व्हावे, असे आम्ही नम्र आवाहन करतो. प्रेक्षकांचा प्रत्येक प्रतिसाद आणि प्रत्येक तिकीट भारताच्या ऑस्कर अभियानाला अधिक बळ देईल, अशी भावना ‘गोंधळ’चे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता संतोष डावखर यांनी व्यक्त केली आहे.

Gondhal Movie : ‘गोंधळ’ ची 99व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड Read More »

sanjay shirsat

Sanjay Shirsat on Uddhav Thackeray : ‘लाज, लज्जा, शरम’ या गोष्टी उद्धव ठाकरेंनी बोलू नये

Sanjay Shirsat on Uddhav Thackeray: ‘लाज, लज्जा, शरम’ या गोष्टी उद्धव ठाकरेंनी बोलू नयेत. अडीच वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी काय केले, हे जनतेने पाहिले आहे अशी टीका संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना केली. ‘तुमसे ना हो पा येगा’ या कार्यक्रमात बोलताना शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याचे तसेच राज्यात दुष्काळ घोषित करण्याची मागणी केली होती. यावर आज माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पूर्वतयारी केली आहे. सर्व यंत्रणांनी आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. केंद्राची मदत घेताना त्यासाठी ठराविक तारीख आणि निकष पाळावे लागतात. सरकारला मदत जाहीर करण्यात कोणतीही अडचण नाही. मात्र, ती तात्पुरती मदत ठरेल. केंद्राकडून भरीव मदत मिळाली तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल असं संजय शिरसाट म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘लाज, लज्जा, शरम’ या गोष्टी उद्धव ठाकरेंनी बोलू नयेत. अडीच वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी काय केले, हे जनतेने पाहिले आहे. कुठलेही डायलॉग मारू नका. काल आंदोलन केले, त्याला पाठिंबा देण्यासाठी किती लोक आले, हेही पाहिले. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे सर्व निर्णय घेऊ. तर यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याकडून करण्यात आलेल्या दुष्काळ मागणीवर देखील प्रतिक्रिया दिली. शरद पवार साहेबांनी जी मागणी केली आहे, तीच मागणी गेल्या कॅबिनेट बैठकीत आम्ही सर्व मंत्र्यांनी केली आहे. कॅबिनेटमध्ये यावर सविस्तर चर्चा झाली असून, मुख्यमंत्र्यांनी उपाययोजनांबाबत माहिती दिली आहे. यंत्रणा कामाला लागली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर मराठवाडा आणि विदर्भात भीषण दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. मात्र, सरकार लवकरच दुष्काळ जाहीर करेल, असे वातावरण आहे. सरकार या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहत आहे.

Sanjay Shirsat on Uddhav Thackeray : ‘लाज, लज्जा, शरम’ या गोष्टी उद्धव ठाकरेंनी बोलू नये Read More »

supriya sule

Supriya Sule on Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात CBI ची FIR; सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘आश्चर्य वाटतंय…’

Supriya Sule on Disha Salian Case : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची माजी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाला तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा वेगळे वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) दिशा सालियन मृत्यू प्रकरणात FIR दाखल केली आहे. या कारवाईनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दिशा सालियन यांच्या मृत्यूची घटना जून 2020 मध्ये घडली होती. त्यानंतर या प्रकरणाची दीर्घकाळ चर्चा झाली. आता CBI कडे तपास गेल्यानंतर प्रकरण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. सुप्रिया सुळेंना नेमकं आश्चर्य कशाचं? CBI ने FIR दाखल केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी या घडामोडीवर प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात यापूर्वी तपास करण्यात आला होता आणि त्यानंतर आता पुन्हा CBI मार्फत FIR दाखल होत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. एखाद्या प्रकरणात आधी तपास करून ते बंद करण्यात आले असेल, तर पुन्हा त्याच प्रकरणात नव्याने FIR आणि तपास का सुरू झाला, हा प्रश्न उपस्थित होतो, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच सुळे यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणामागे राजकीय हेतू असण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. मात्र, तपासातून सत्य समोर आले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. दिशा सालियन प्रकरण पुन्हा चर्चेत का? दिशा सालियन या मनोरंजन क्षेत्रात मॅनेजर म्हणून काम करत होत्या. 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीवरून पडून त्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी या घटनेची नोंद अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली होती. दिशा यांच्या मृत्यूनंतर अवघ्या काही दिवसांनी, 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचा मृत्यू झाला होता.दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी मुलीच्या मृत्यूबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या तक्रारी आणि आरोपांच्या पार्श्वभूमीवर प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी पुढे आली. या प्रकरणात FIR दाखल करण्यात विलंब झाल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयानेही प्रश्न उपस्थित केले होते. अखेर न्यायालयाच्या निर्देशानंतर तपास CBI कडे देण्याचा मार्ग मोकळा झाला आणि आता केंद्रीय तपास यंत्रणेने FIR नोंदवली आहे. FIR मध्ये कोणकोणाची नावे चर्चेत? CBI च्या ताज्या कारवाईनंतर या प्रकरणात काही राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींची नावे चर्चेत आली आहेत. त्यात शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांच्यासह काही अन्य व्यक्तींच्या नावांचा उल्लेख विविध वृत्तांमध्ये करण्यात आला आहे.

Supriya Sule on Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात CBI ची FIR; सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘आश्चर्य वाटतंय…’ Read More »

siya goyal

Ketan Agarwal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक; रितेश हांगे नवाचा पोलिसांच्या ताब्यात

Ketan Agarwal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या अटकेनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात आणखी एका संशयिताला अटक केली आहे. रितेश हांगे नवाचा (वय २३, रा. लोणावळा ग्रामीण) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. रितेश हा चेतन चौधरीचा मित्र असल्याची माहिती पोलिसांनी दिली. रितेशला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाच्या तपासाबाबत पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक (एसपी) संदीपसिंग गिल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पोलिसांच्या तपासानुसार, चेतन, सिया आणि रितेश यांच्यात मैत्री होती. केतन अग्रवालच्या हत्येपूर्वी झालेल्या नियोजनाची माहिती रितेशला होती. व्हॉट्सॲपवरील संदेश आणि इतर पुराव्यांच्या आधारे रितेशचा या प्रकरणात सक्रिय सहभाग असल्याचे समोर आल्याने त्याला अटक करण्यात आली. केतन अग्रवालची हत्या करण्यासाठी सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट किलिंगची योजना आखण्यात आली होती. मात्र, नंतर हा प्लॅन बदलण्यात आला आणि चेतन, सिया आणि रितेश यांनी स्वतःच केतनची हत्या करण्याचा कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे. सध्या तरी अन्य कोणतीही व्यक्ती तपासात समोर आलेली नसल्याचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी स्पष्ट केले. रितेशकडून मिळणाऱ्या माहितीतून हत्येच्या कटातील आणखी बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Ketan Agarwal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक; रितेश हांगे नवाचा पोलिसांच्या ताब्यात Read More »

donald trump

Donald Trump : इराणच्या ‘पिकॅक्स माउंटन’वर लवकरच हल्ला? ट्रम्प यांचा थेट इशारा

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. इराणमधील अत्यंत सुरक्षित आणि भूमिगत ‘पिकॅक्स माउंटन’ अणुस्थळावर अमेरिका लवकरच हल्ला करू शकते, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी अमेरिकन लष्कर या ठिकाणाला “लवकरच” लक्ष्य करू शकते, असे संकेत दिले. इराणला अण्वस्त्र विकसित करण्यापासून रोखणे हा अमेरिकेच्या लष्करी कारवाईमागील प्रमुख उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पिकॅक्स माउंटन इतके महत्त्वाचे का? ‘पिकॅक्स माउंटन’ हे इराणमधील नतांझ अणुस्थळाजवळील डोंगराळ भागात असलेले अत्यंत मजबूत भूमिगत संकुल आहे. या ठिकाणी खोलवर बोगदे तयार करण्यात आले असून, त्यामुळे पारंपरिक हवाई हल्ल्यांपासून या परिसरातील सुविधा सुरक्षित राहू शकतात. अमेरिका आणि इस्रायली गुप्तचर यंत्रणांना संशय आहे की इराणने आपल्या अणुकार्यक्रमाशी संबंधित संवेदनशील उपकरणे किंवा सेंट्रीफ्यूज या भूमिगत ठिकाणी हलवले असावेत. मात्र, या ठिकाणी नेमके कोणते साहित्य किंवा उपकरणे आहेत, याबाबत पूर्णपणे स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता पिकॅक्स माउंटनवर अमेरिकेने प्रत्यक्ष हल्ला केल्यास अमेरिका-इराण संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. हे ठिकाण अत्यंत खोलवर असल्याने हल्ल्याचा परिणाम किती होईल, याबाबत लष्करी तज्ज्ञांमध्येही मतभेद आहेत. काही तज्ज्ञांच्या मते, हल्ल्यामुळे प्रवेशमार्ग बाधित होऊ शकतात मात्र भूमिगत मुख्य भाग पूर्णपणे नष्ट करणे आव्हानात्मक ठरू शकते. दरम्यान, इराणच्या अणुकार्यक्रमावरून अमेरिका आणि इराणमधील तणाव कायम असून, पिकॅक्स माउंटनवरील ट्रम्प यांचा ताजा इशारा या संघर्षातील पुढील मोठ्या लष्करी कारवाईचे संकेत मानला जात आहे.

Donald Trump : इराणच्या ‘पिकॅक्स माउंटन’वर लवकरच हल्ला? ट्रम्प यांचा थेट इशारा Read More »

ahilyanagar municipal corporation election

Ahilyanagar News : महापालिका रुग्णालयाच्या आरक्षणावर खासगी हॉस्पिटलची परवानगी शासनाच्या रडारवर

Ahilyanagar News : सावेडीतील महापालिका रुग्णालयासाठी विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या जागेवर खासगी रुग्णालयाला विकास व बांधकाम परवानगी देण्यात आल्याचे प्रकरण आता नगरविकास विभागाच्या वरिष्ठ स्तरावरील परीक्षणाखाली आले आहे. सामाजिक कार्यकर्ते शेख शाकीर यांनी प्रधान सचिवांकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर शासनाने नगररचना संचालकांसह संबंधित वरिष्ठ कार्यालयांकडून स्वयंस्पष्ट अभिप्राय, सविस्तर अहवाल आणि विकास योजनेचा भाग नकाशा मागविला आहे. मौजे सावेडी येथील सर्वे नं. 9/2/1B/2 व सर्वे नं. 12/4/12/5B मधील जागा विकास आराखड्यात ‘EP-43 Municipal Hospital Reservation’ म्हणून महापालिका रुग्णालयासाठी आरक्षित आहे. मात्र, याच जागेवर खासगी रुग्णालयासाठी भूखंड एकत्रीकरण, विकास परवानगी व बांधकाम परवानगीची प्रक्रिया करण्यात आल्याचा आक्षेप आहे. सावेडी परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वाढलेली असून सार्वजनिक रुग्णालयाची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत महापालिका रुग्णालयासाठी आरक्षित जागेवर खासगी रुग्णालयाला परवानगी दिल्याने भविष्यात महापालिकेचे स्वतःचे रुग्णालय उभारण्याच्या मूळ उद्देशालाच अडथळा निर्माण होऊ शकतो, असा मुद्दा शासनाकडे मांडण्यात आला आहे. या परवानगी प्रक्रियेत महानगरपालिकेत शासनाकडून नियुक्त तत्कालीन सहाय्यक संचालक नगररचना श्रीमती स्नेहल यादव यांचा अभिप्राय व मान्यता न घेताच प्रस्ताव पुढे नेण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच संबंधित रुग्णालयासाठी संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा यांच्याकडून आवश्यक Fire NOC न घेता महापालिकेच्या अग्निशमन अधीक्षकांची NOC ग्राह्य धरून पुढील परवानगी देण्यात आल्याची बाबही शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. या प्रकरणी शेख यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे स्वतंत्र तक्रार केली होती. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी 22 जुलै 2026 रोजी प्रधान सचिव, नगरविकास विभाग यांना पत्र पाठवून, भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने चौकशी आवश्यक असल्यास विभागाला प्राधिकृत करण्याची विनंती केली होती. मात्र, नगरविकास विभागाने 31 जुलै 2026 रोजी हे प्रकरण तपासणी व नियमानुसार कार्यवाहीसाठी पुन्हा अहिल्यानगर महानगरपालिका आयुक्तांकडे पाठविल्याने शेख यांनी प्रधान सचिवांकडे लेखी आक्षेप घेतला. “ज्या प्रशासनाच्या परवानगी प्रक्रियेची तक्रार आहे, त्याच प्रशासनाकडे चौकशी देणे निष्पक्ष चौकशीच्या तत्त्वाशी विसंगत आहे,” असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. या आक्षेपानंतर शासनाने प्रकरणाची व्याप्ती वाढवत आयुक्त मनापा. संचालक नगररचना, ; सहसंचालक, नगररचना,  सहाय्यक संचालक, नगररचना, यांच्याकडून अहवाल व अभिप्राय मागविला आहे. शासनास सादर होणाऱ्या अहवालात EP-43 चे महापालिका रुग्णालय आरक्षण अस्तित्वात असताना खासगी रुग्णालयाला परवानगी कोणत्या आधारावर देण्यात आली, आरक्षण बदल अथवा रद्द करण्याचा सक्षम आदेश आहे का, शासन नियुक्त नगररचना अधिकाऱ्याची मान्यता का घेण्यात आली नाही आणि महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालकांची NOC नसताना महापालिकेची NOC कोणत्या अधिकारात ग्राह्य धरण्यात आली, या बाबींवर खुलासा अपेक्षित आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगररचनाकार वैभव जोशी आणि आयुक्त यशवंत डांगे यांच्या प्रशासकीय कार्यकाळात ही परवानगी प्रक्रिया झाल्याने संबंधित निर्णयांची स्वतंत्र व वरिष्ठ स्तरावर चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सावेडीतील EP-43 प्रकरण आता केवळ एका बांधकाम परवानगीपुरते मर्यादित राहिले नसून सार्वजनिक आरोग्यासाठी राखीव जमीन, नगररचना प्रक्रियेची वैधानिकता, अग्निसुरक्षा मंजुरी आणि प्रशासकीय जबाबदारी या सर्वच मुद्द्यांवर शासनाच्या परीक्षणाखाली आले आहे.

Ahilyanagar News : महापालिका रुग्णालयाच्या आरक्षणावर खासगी हॉस्पिटलची परवानगी शासनाच्या रडारवर Read More »

maharashtra sir

Maharashtra SIR : महाराष्ट्रात खळबळ, SIR नंतर 2 कोटी 6 लाखांहून अधिक मतदार ड्राफ्ट यादीतून गायब; पुढे काय?

Maharashtra SIR : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण अर्थात Special Intensive Revision (SIR) प्रक्रियेनंतर राज्याची सुधारित प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत तब्बल 2 कोटी 6 लाख 88 हजार 487 मतदारांची नावे समाविष्ट झालेली नाहीत. त्यामुळे राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रात SIR प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी एकूण 9 कोटी 78 लाख 54 हजार 49 मतदार नोंदणीकृत होते. मात्र, 31 ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत 7 कोटी 71 लाख 65 हजार 562 मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच आधीच्या मतदारसंख्येच्या तुलनेत तब्बल 21.14 टक्के मतदार प्रारूप यादीत दिसत नाहीत. प्रारूप मतदार यादीत कोणाचा समावेश? नवीन प्रारूप मतदार यादीमध्ये एकूण 7.71 कोटींहून अधिक मतदारांचा समावेश आहे. पुरुष मतदार: 3 कोटी 95 लाख 89 हजार 905 महिला मतदार: 3 कोटी 75 लाख 72 हजार 570 तृतीयपंथी मतदार: 3 हजार 87 या आकडेवारीवरून प्रारूप मतदार यादीतील पुरुष आणि महिला मतदारांची संख्या जवळपास समान असल्याचे दिसून येते. तब्बल 2.06 कोटी नावे का राहिली बाहेर? निवडणूक यंत्रणेच्या माहितीनुसार, SIR प्रक्रियेदरम्यान काही मतदारांचे गणना अर्ज अर्थात Enumeration Forms जमा होऊ शकले नाहीत. अशा मतदारांचा प्रारूप यादीत समावेश करण्यात आलेला नाही. यामध्ये काही मतदार सापडले नाहीत, काहींचा मृत्यू झाला आहे किंवा काही मतदारांनी आपले निवासस्थान बदलले आहे, अशी कारणे समोर आली आहेत. त्यामुळे प्रारूप यादीत नाव नसणे म्हणजे संबंधित व्यक्तीचे नाव कायमस्वरूपी मतदार यादीतून रद्द झाले आहे, असा थेट अर्थ होत नाही. दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्र संधी दिली आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे परिसरात मोठी घट SIR प्रक्रियेमुळे मोठ्या शहरांमध्ये मतदारसंख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः मुंबई, ठाणे आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरी भागांमध्ये स्थलांतर, मृत्यू, मतदारांचा पत्ता बदलणे आणि गणना अर्ज उपलब्ध न होणे यांसारख्या कारणांचा परिणाम झाल्याचे वृत्त आहे. मुंबईतच सुमारे 36 लाख मतदारांची नावे प्रारूप यादीत दिसत नसल्याचे अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील मतदारांनी आपले नाव नव्या यादीत आहे की नाही, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. नाव यादीत नसेल तर काय करायचे? प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर मतदारांना आपले नाव तपासण्याची आणि आवश्यक असल्यास दावा किंवा हरकत दाखल करण्याची संधी देण्यात आली आहे. 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. त्यामुळे ज्या पात्र मतदाराचे नाव प्रारूप यादीत नाही, त्यांनी ही मुदत चुकवू नये. नाव, पत्ता किंवा इतर तपशीलात काही चूक असल्यासही या कालावधीत दुरुस्तीची प्रक्रिया करता येणार आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी सर्वप्रथम आपले नाव प्रारूप मतदार यादीत आहे का, हे तपासावे. नाव नसल्यास संबंधित अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसह दावा दाखल करणे गरजेचे आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांसाठीही संधी SIR प्रक्रियेनंतर तयार करण्यात आलेली ही प्रारूप यादी केवळ जुन्या मतदारांच्या नावांच्या तपासणीपुरती मर्यादित नाही. पात्र असलेल्या पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नागरिकांनाही 30 सप्टेंबरपर्यंत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे 18 वर्षे पूर्ण झालेल्या किंवा मतदानासाठी पात्र असलेल्या नव्या मतदारांनीही आपली नोंदणी तपासणे महत्त्वाचे आहे. अंतिम मतदार यादी कधी जाहीर होणार? सध्या जाहीर झालेली यादी ही प्रारूप मतदार यादी आहे. त्यामुळे 2.06 कोटी मतदारांची नावे कायमस्वरूपी वगळण्यात आली आहेत, असे समजणे योग्य ठरणार नाही. दावे आणि हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांची छाननी करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. उपलब्ध माहितीनुसार 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील मतदार यादीत एकाच वेळी 2 कोटींपेक्षा जास्त नावे प्रारूप यादीत न आल्याने या प्रक्रियेला राजकीय महत्त्वही प्राप्त झाले आहे. विरोधकांकडून या मोठ्या संख्येवर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे, तर निवडणूक यंत्रणेकडून SIRचा उद्देश मतदार यादी अद्ययावत करणे आणि पात्र-अयोग्य मतदारांची नोंद अचूक करणे हा असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता पुढील एक महिना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. दावे आणि हरकती दाखल झाल्यानंतर किती नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट होतात आणि अंतिम यादीत मतदारसंख्या किती राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुमचं नाव मतदार यादीत आहे का? SIRनंतर मोठ्या प्रमाणावर नावे प्रारूप यादीत दिसत नसल्याने प्रत्येक पात्र मतदाराने आपले नाव तपासणे आवश्यक आहे. नाव नसल्यास 30 सप्टेंबर 2026 पूर्वी दावा दाखल करून नाव पुन्हा समाविष्ट करून घेण्याची संधी उपलब्ध आहे. अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.

Maharashtra SIR : महाराष्ट्रात खळबळ, SIR नंतर 2 कोटी 6 लाखांहून अधिक मतदार ड्राफ्ट यादीतून गायब; पुढे काय? Read More »