DNA मराठी

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय; मराठवाड्यासह ‘या’ भागात पावसाचा इशारा

rain alert

Maharashtra Rain Alert : राज्यात मान्सूनचा जोर २ महिने कमी झाल्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचे वातावरण तयार झाले आहे. एकीकडे देशाच्या पश्चिम भागातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असताना दुसरीकडे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या नव्या हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत आगामी काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या प्रणालीची तीव्रता वाढून २१ सप्टेंबरला त्याचे अवदाबात, तर २२ सप्टेंबरपर्यंत तीव्र अवदाबात रूपांतर होण्याची शक्यता आहे. ही हवामान प्रणाली पुढे दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकण्याचा अंदाज आहे. या बदलाचा परिणाम महाराष्ट्रातील पावसावरही होत असून राज्यात पुन्हा पावसाळी स्थिती निर्माण होत आहे.

अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २१ सप्टेंबर रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, हिंगोली, परभणी, नांदेड, नाशिकचा घाट परिसर, अहिल्यानगर, पुण्याचा घाट परिसर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या भागांत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.

२२ सप्टेंबरला पावसाचा जोर वाढणार

२२ सप्टेंबर रोजी राज्यातील काही भागांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यांसह मराठवाड्यातील नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव तसेच सोलापूर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पडू शकतात.

२३ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता

२३ सप्टेंबरपासून राज्यातील पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता कायम राहू शकते. राज्याच्या उर्वरित भागात हवामान प्रामुख्याने कोरडे किंवा ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली असली तरी बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या जिल्ह्याचा हवामान अंदाज आणि प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे, तसेच मुसळधार पावसाच्या काळात नदी, नाले आणि घाट परिसरात अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *