Gondhal Movie : अकरा वर्षांपूर्वी ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाला भारताची अधिकृत ऑस्कर प्रवेशिका म्हणून निवडले गेले होते. त्यानंतर आता ‘गोंधळ’च्या रूपाने पुन्हा एकदा महाराष्ट्राला आणि मराठी चित्रपटसृष्टीला ऑस्करच्या व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे. हा क्षण आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा, भावनिक आणि ऐतिहासिक आहे.
‘डोरोथी’, ‘बालन’, ‘बायसन’, ‘अंग’, ‘मैं वापस आऊंगा’, ‘धुरंधर -१, ‘धुरंधर -२ ’, ‘इक्कीस’, ‘बॉर्डर २’, ‘देऊळबंद २’ आणि ‘द शेप ऑफ मोमो’ यांसारखे विविध भाषांतील अनेक दर्जेदार आणि चर्चित चित्रपट भारताच्या अधिकृत ऑस्कर प्रवेशाच्या शर्यतीत होते. काही चित्रपटांना आंतरराष्ट्रीय महोत्सवांची पार्श्वभूमी होती, तर ‘धुरंधर’सारख्या चित्रपटांमागे भव्य निर्मितीमूल्य, मोठे कलाकार आणि प्रचंड व्यावसायिक ताकद होती. या विविध आणि तगड्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या जिवंत सांस्कृतिक परंपरेचे प्रभावी सिनेमॅटिक दर्शन घडवणाऱ्या मराठी ‘गोंधळ’ची निवड झाली आणि भारताचे अधिकृत ऑस्कर प्रतिनिधित्व करण्याचा ऐतिहासिक मान चित्रपटाला मिळाला.
‘गोंधळ’चा मूळ गाभा भारतीय मातीतला असला, तरी चित्रपटाची सिनेमॅटिक भाषा, तांत्रिक गुणवत्ता आणि निर्मितीमूल्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत. त्यामुळे जागतिक स्पर्धेत हा चित्रपट प्रभावीपणे उभा राहू शकतो, याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे. भारताचे प्रतिनिधित्व करताना आवश्यक असलेली संपूर्ण मेहनत, ताकद आणि साधने आम्ही या अभियानासाठी लावणार आहोत.
आमच्या चित्रपटावर विश्वास दाखवल्याबद्दल भारत सरकार, फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया आणि एफएफआयच्या निवड समितीतील सर्व मान्यवर ज्युरी सदस्यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. अनेक मोठ्या आणि दर्जेदार चित्रपटांमधून ज्युरीने ‘गोंधळ’ची निवड केली, ही आमच्यासाठी सन्मानासोबतच एक मोठी राष्ट्रीय जबाबदारी आहे.
लहानपणापासून ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंकडे आम्ही अपार अभिमानाने पाहात आलो आहोत. आज ‘गोंधळ’च्या माध्यमातून जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी आमच्यावर आली आहे, तेव्हा मनात अगदी तशीच भावना आहे. हा केवळ एका चित्रपटाचा गौरव नाही, भारतीय संस्कृती, महाराष्ट्राची जिवंत लोकपरंपरा आणि आपल्या मातीतून जन्मलेल्या कथेला मिळालेला राष्ट्रीय सन्मान आहे.
या सर्वोच्च सन्मानाविषयी बोलताना सर्वप्रथम माझ्या डोळ्यांसमोर ‘गोंधळ’ची संपूर्ण टीम उभी राहते. प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ आणि सहकाऱ्याने प्रामाणिकपणे, व्यावसायिक निष्ठेने आणि जिवापाड मेहनत घेऊन हा चित्रपट उभा केला. त्यामुळे या यशाचे श्रेय माझ्या एकट्याचे नसून संपूर्ण ‘गोंधळ’ परिवाराचे आहे. सध्या आम्ही सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी असलो, तरी येत्या दोन-तीन दिवसांत संपूर्ण टीम एकत्र येऊन या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा करणार आहोत.
माझ्या कुटुंबीयांनी माझ्यावर आणि या स्वप्नावर अखंड विश्वास ठेवला. आमच्या इतर कंपन्यांतील संचालक, अधिकारी आणि प्रत्येक स्तरावरील सहकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. त्यांनी व्यावसायिक कामकाजाची जबाबदारी स्वीकारल्यामुळे मला पूर्ण एकाग्रतेने चित्रपटनिर्मितीकडे लक्ष देता आले. उत्तम टीम, कुटुंबाचा विश्वास आणि सर्व सहकाऱ्यांच्या भक्कम पाठबळामुळेच हा प्रवास शक्य झाला.
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच आम्ही एक गोष्ट ठामपणे सांगत आलो आहोत, ‘गोंधळ’ची तुलना केवळ प्रादेशिक चित्रपटांशी न करता जगातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपटांशी व्हावी. आज एफएफआयच्या ज्युरीने ‘गोंधळ’वर दाखवलेला विश्वास आमच्या त्या भूमिकेला आणखी बळ देणारा आहे.
९९व्या अकादमी पुरस्कारांसाठीचे आमचे आंतरराष्ट्रीय अभियान लवकरच सुरू होत आहे. त्यासाठी नियोजनबद्ध, सक्षम आणि प्रभावी रोडमॅप तयार करण्यात आला आहे. भारताचे प्रतिनिधित्व जागतिक स्तरावर अत्यंत ताकदीने, प्रतिष्ठेने आणि जबाबदारीने करण्यासाठी आमची संपूर्ण टीम सज्ज आहे.
‘गोंधळ’ पाच वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये प्रदर्शनासाठी तयार आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या जागतिक प्रदर्शनाचेही नियोजन करण्यात आले आहे. भारतातील आणि जगभरातील प्रदर्शनाच्या तारखा आम्ही लवकरच अधिकृतपणे जाहीर करू.
हा चित्रपट त्याची भव्य दृश्यभाषा, जिवंत ध्वनी आणि प्रभावी सिनेमॅटिक अनुभूती यांमुळे मोठ्या पडद्यावरच पाहण्यासारखा आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी कोणत्याही अनधिकृत किंवा पायरेटेड प्रतीवर अवलंबून न राहता ‘गोंधळ’ चित्रपटगृहातच अनुभवावा.
‘गोंधळ’ मर्यादित कालावधीसाठी प्रदर्शित केला जाणार आहे. प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट स्वतः पाहावा, आपल्या कुटुंबीयांना व मित्रांना पाहण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि भारताच्या या ऑस्कर प्रवासाचा अभिमानाने भाग व्हावे, असे आम्ही नम्र आवाहन करतो. प्रेक्षकांचा प्रत्येक प्रतिसाद आणि प्रत्येक तिकीट भारताच्या ऑस्कर अभियानाला अधिक बळ देईल, अशी भावना ‘गोंधळ’चे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता संतोष डावखर यांनी व्यक्त केली आहे.






