Sanjay Shirsat on Uddhav Thackeray: ‘लाज, लज्जा, शरम’ या गोष्टी उद्धव ठाकरेंनी बोलू नयेत. अडीच वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी काय केले, हे जनतेने पाहिले आहे अशी टीका संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना केली.
‘तुमसे ना हो पा येगा’ या कार्यक्रमात बोलताना शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याचे तसेच राज्यात दुष्काळ घोषित करण्याची मागणी केली होती. यावर आज माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पूर्वतयारी केली आहे. सर्व यंत्रणांनी आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. केंद्राची मदत घेताना त्यासाठी ठराविक तारीख आणि निकष पाळावे लागतात. सरकारला मदत जाहीर करण्यात कोणतीही अडचण नाही. मात्र, ती तात्पुरती मदत ठरेल. केंद्राकडून भरीव मदत मिळाली तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल असं संजय शिरसाट म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘लाज, लज्जा, शरम’ या गोष्टी उद्धव ठाकरेंनी बोलू नयेत. अडीच वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी काय केले, हे जनतेने पाहिले आहे. कुठलेही डायलॉग मारू नका. काल आंदोलन केले, त्याला पाठिंबा देण्यासाठी किती लोक आले, हेही पाहिले. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे सर्व निर्णय घेऊ.
तर यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याकडून करण्यात आलेल्या दुष्काळ मागणीवर देखील प्रतिक्रिया दिली.
शरद पवार साहेबांनी जी मागणी केली आहे, तीच मागणी गेल्या कॅबिनेट बैठकीत आम्ही सर्व मंत्र्यांनी केली आहे. कॅबिनेटमध्ये यावर सविस्तर चर्चा झाली असून, मुख्यमंत्र्यांनी उपाययोजनांबाबत माहिती दिली आहे.
यंत्रणा कामाला लागली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर मराठवाडा आणि विदर्भात भीषण दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. मात्र, सरकार लवकरच दुष्काळ जाहीर करेल, असे वातावरण आहे. सरकार या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहत आहे.






