DNA मराठी

DNA Marathi News

img 20260605 wa0010

Burudgaon Garbage Depot : बुरुडगाव कचरा डेपोतील सोलर प्रकल्प वादळी वाऱ्यामुळे कोलमडला

Burudgaon Garbage Depot : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बुरुडगाव येथील महानगरपालिकेच्या कचरा डेपोवरील सौरऊर्जा प्रकल्पाला बसला असून जोरदार वादळी वाऱ्यामुळे सोलर प्लांटचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे सुमारे ५०० मेगावॅट वीज निर्मिती करणारा सौरऊर्जा प्रकल्प बंद पडला असून त्याची प्रत्यक्ष पाहणी महापौर ज्योती गाडे यांनी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेत तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या.या पाहणीवेळी घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख पी. एस. बिडकर, इंजिनिअर गणेश गाडळकर तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महापौर ज्योती गाडे यांनी कचरा डेपो परिसरातील सोलर प्रकल्पाची पाहणी करताना नुकसानग्रस्त भागाची माहिती घेतली. तसेच भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तींचा परिणाम कमी व्हावा यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी महापौर गाडे म्हणाल्या की, वाढत्या ऊर्जा गरजा लक्षात घेता सौरऊर्जा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत. मात्र वादळ, पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अशा प्रकल्पांचे नुकसान होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी कचरा डेपो परिसरात दोन मजबूत शेड उभारण्यात याव्यात आणि त्या शेडवर सौरऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचा विचार करावा, जेणेकरून आपत्तीच्या काळात प्रकल्पांचे नुकसान कमी होईल आणि वीज निर्मिती अखंडित सुरू राहील. त्या पुढे म्हणाल्या की, पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीसाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. सौरऊर्जेसारख्या स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढविणे ही काळाची गरज असून अशा प्रकल्पांचे संरक्षण आणि देखभाल तितकीच महत्त्वाची आहे. नुकसानग्रस्त सोलर प्लांटची तातडीने दुरुस्ती करून वीज निर्मिती पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. सोलर प्रकल्पाच्या पाहणीनंतर महापौरांनी कचरा डेपो परिसरातील विविध प्रकल्पांचा देखील आढावा घेतला. यामध्ये खत निर्मिती प्रकल्प, बायोमेडिकल वेस्ट प्रक्रिया प्रकल्प, मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प, लिचेट प्रक्रिया प्रकल्प तसेच घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित इतर सुविधांची माहिती घेण्यात आली. महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्पांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि पर्यावरणीय मानकांचे काटेकोर पालन करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Burudgaon Garbage Depot : बुरुडगाव कचरा डेपोतील सोलर प्रकल्प वादळी वाऱ्यामुळे कोलमडला Read More »

img 20260605 wa0011

Shirur Taluka : शिरूर तालुक्यात खळबळ ; कारवाईच्या भीतीने तब्बल 350 किलो खवा शेता शेजारी फेकला

Shirur Taluka : राज्यभर अन्न भेसळविरोधी मोहिमेचा धडाका सुरू असताना शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे तब्बल ३५० किलो खवा शेताशेजारी फेकून दिल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. ३) उघडकीस आली. अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे भेसळखोरांमध्ये निर्माण झालेल्या भीतीपोटीच हा खवा टाकून देण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. शिरसगाव काटा येथील राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी लगत असलेल्या शेतकरी विजय वामन काटे यांच्या शेताशेजारील कॅनॉल रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्तींनी खव्याच्या १४ बॅगा टाकून दिल्या. प्रत्येक बॅगेचे वजन सुमारे २५ किलो असल्याने एकूण खव्याचे वजन अंदाजे ३०० ते ३५० किलो असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बुधवारी सकाळी परिसरात तीव्र दुर्गंधी पसरल्याने विजय काटे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात खव्याच्या बॅगा पडलेल्या आढळून आल्या. या घटनेची माहिती परिसरात वेगाने पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. विविध ठिकाणी छापे, नमुने तपासणी आणि जप्तीच्या कारवायांमुळे भेसळखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठीच हा खवा घाईघाईने फेकून दिला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, फेकून दिलेला खवा नेमका कोणाचा आहे, तो भेसळयुक्त होता का आणि तो कोणत्या ठिकाणाहून आणण्यात आला होता, याचा तपास संबंधित यंत्रणांनी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे शिरूर तालुक्यात अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Shirur Taluka : शिरूर तालुक्यात खळबळ ; कारवाईच्या भीतीने तब्बल 350 किलो खवा शेता शेजारी फेकला Read More »

img 20260605 wa0009

Amol Khatal : जिल्हा परिषद निवडणुकात सेनेचा भगवा फडकवू…आमदार खताळांनी व्यक्त केला विश्वास

Amol Khatal : संगमनेर तालुक्यातील खांबे गावात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला असून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे पदाधिकारी आणि शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. ४) सायंकाळी आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार खताळ यांच्या कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात “तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षांत अपेक्षित विकास झाला नाही. मात्र महायुती सरकारच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांत तालुक्यात विविध विकासकामांना गती देण्यात आली असून मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलत आहे. खांबे गावाच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.कार्यक्रमास खांबे ग्रामपंचायतीचे सरपंच रविंद्र दातीर, सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण जोशी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश काळे, विठ्ठल दातीर, बाबासाहेब दातीर, रामेश्वर शिंदे, दिगंबर दातीर, गबाजी कोरडे, भिकाजी वाघ, प्रेमराज बुधे आदी मान्यवर उपस्थित होते. काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणारे कार्यकर्ते… पुंजा जोशी, सुखदेव भतांबरे, रावसाहेब भांड, बाबूराव कापडी, बारकू पेकारी, बाबा एकनाथ जोशी, नवनाथ दातीर, एकनाथ दातीर, सुभाष केदार, राजू शेंडगे, बाळासाहेब दातीर, खुशाल वाघ, जनार्दन जोरी, संजय दातीर, ठकाजी दातीर, नामदेव दातीर, ज्ञानेश्वर दातीर, रवी जोरी, सोमनाथ शेंडगे, माणिक जोरी, भाऊसाहेब शेंडगे, सखाराम दातीर, रविराज जोशी, पवन जोशी यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. विकासाच्या जोरावर शिवसेनेची ताकद वाढणार केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यातील विकासकामांना वेग मिळत आहे. खांबे गावातील हा पक्षप्रवेश सोहळा साकूर पठार भागात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणारा ठरेल. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांत या भागात शिवसेनेचा भगवा निश्चित फडकेल,” असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. चाळीस वर्षांत न झालेला विकास दीड वर्षांत… खांबे ग्रामपंचायतीचे सरपंच रविंद्र दातीर म्हणाले, “गेल्या ४० वर्षांत गावाचा अपेक्षित विकास झाला नव्हता. मात्र आमदार अमोल खताळ यांनी अवघ्या दीड वर्षांत साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून अनेक विकासकामे पूर्ण केली आहेत, तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. लवकरच या विकासकामांचे लोकार्पण आणि गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.

Amol Khatal : जिल्हा परिषद निवडणुकात सेनेचा भगवा फडकवू…आमदार खताळांनी व्यक्त केला विश्वास Read More »

fb img 1780492492207

FDA Action In Ahilyanagar: अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई ; आईस्क्रीम व खाद्यतेलाचा साठा जप्त

FDA Action In Ahilyanagar: जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अन्न भेसळविरोधी विशेष मोहिमेत राहुरी व नेवासा तालुक्यात कारवाई करून २ लाख ८४ हजार १८० रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम व खाद्यतेल जप्त करण्यात आले असून नागरिकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त अन्न अ. अ. भोईटे यांनी केले आहे. राहुरी येथील शिवशक्ती आईस्क्रीम या आस्थापनाची तपासणी करून शिवशक्ती ब्रँडच्या आईस्क्रीम गुलकंद व अमेरिकन नट्स या उत्पादनांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. दर्जाहीन असल्याच्या संशयावरून या ठिकाणी ४१ हजार ४४० रुपये किमतीचे एकूण १४८ पॅकेट्स आईस्क्रीम जप्त करण्यात आले. तसेच नेवासा तालुक्यातील कडू गल्ली येथील संतोष किराणा स्टोअर्सची तपासणी करून एसबीजी ब्रँडच्या रिफाइंड पामोलीन ऑईल या खाद्यतेलाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. हा साठा संशयास्पद आढळल्याने २ लाख ४२ हजार ७४० रुपये किमतीचे १ हजार ४९८.४ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले. अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार व सहआयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ व नियम २०११ अंतर्गत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार, अन्न सुरक्षा अधिकारी उ. र. पाटील व सहायक आयुक्त अन्न अ. अ. भोईटे यांनी या कारवाया केल्या आहेत. नागरिकांना स्वच्छ व भेसळमुक्त अन्न उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हाभर ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात सुरू आहे. अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

FDA Action In Ahilyanagar: अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई ; आईस्क्रीम व खाद्यतेलाचा साठा जप्त Read More »

img 20260604 wa0018

Pune Crime : हुंड्यासाठी छळ अन् गर्भपाताची सक्ती; 25 वर्षीय विवाहितेने संपवले जीवन

Pune Crime: पुण्यातील चंदननगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चारचाकी गाडी, फ्लॅट खरेदीसाठी पैसे आणि सोन्याच्या अंगठीची मागणी करत सासरच्या मंडळींनी केलेल्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. तेजस्विनी गोरख सोनवणे असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात मृत विवाहितेच्या पतीसह सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तेजस्विनीचे वडील शामराव बाळासाहेब गवळी (वय ५२, धंदा-शेती, रा. मासावाडी रोड, नवीन वांगदरी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खालील आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे:गोरख संभाजी सोनवणे(वय ३२ वर्षे – पती)संभाजी लक्ष्मण सोनवणे(वय ६२ वर्षे – सासरा), अलका संभाजी सोनवणे(वय ५५ वर्षे – सासू) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्विनीचा विवाह २५ जून २०२० रोजी गोरख संभाजी सोनवणे याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीला तिला सासरच्यांनी चांगली वागणूक दिली. त्यांना ‘विरा’ (वय अडीच वर्षे) नावाची एक लहान मुलगी आहे. मात्र, मुलगी झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी तेजस्विनीचा छळ करण्यास सुरुवात केली. पती गोरख याने कार घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैसे आणण्यास नकार दिल्याने तिला बेदम मारहाण व मानसिक त्रास देण्यात आला. जुलै २०२२ मध्ये पतीने तिला माहेरी आणून सोडले आणि “पैसे असतील तरच पाठवा, नाहीतर पाठवू नका” अशी तंबी दिली. नंतर नातेवाईकांच्या मध्यस्थीने ती पुन्हा सासरी गेली. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी तेजस्विनीला मुलगी झाली. त्यावेळी सासरच्यांनी डिलिव्हरीचा खर्च देण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर तिच्या वडिलांनी १ लाख रुपयांची रोकड आणून दवाखान्याचे बिल भरले. त्यानंतर जून २०२४ मध्ये तेजस्विनी पुन्हा गरोदर राहिली असता, पती गोरख याने तिला माहेरी आणून सोडले आणि “हिला आधी मुलगी झाली आहे, तुम्ही आता मुलगा की मुलगी हे चेक करा आणि मुलगा असेल तरच आमच्याकडे आणून सोडा”असा अमानुष पवित्रा घेतला. या प्रचंड मानसिक तणावामुळे तेजस्विनीचा स्वतःहून गर्भपात (अबॉर्शन) झाला. फ्लॅटसाठी 3 लाख आणि ‘अधिक मासात’ सोन्याच्या अंगठीची मागणी एप्रिल २०२६ मध्ये पती गोरख याला फ्लॅट खरेदी करायचा होता, ज्यासाठी त्याने तेजस्विनीकडे ३ लाख रुपयांची मागणी केली. तिने नकार दिला असता, तिला मारहाण करून माहेरच्या लोकांशी संपर्क तोडण्यास भाग पाडले गेले. मे २०२६ मध्ये ‘अधिक मास’ असल्याने तेजस्विनीच्या वडिलांनी जावई आणि व्याहींना जेवणासाठी बोलावले होते. मात्र,”आम्हाला सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला येऊ, नाहीतर येणार नाही,”असा हट्ट गोरखने धरला. अखेर ते जेवायला आले, पण तेथेही रागाच्या भरात त्यांनी तेजस्विनीला मारहाण करत शिवीगाळ केली. २ जून २०२६ रोजी रात्री १० वाजता पती गोरख याने तेजस्विनीच्या वडिलांना फोन करून सांगितले की, “तेजस्विनीने आतून दरवाजा लावून घेतला असून ती दार उघडत नाही.” त्यानंतर काही वेळातच तेजस्विनीचे मामा दत्तात्रय बापूराव दाते यांनी फोन करून सांगितले की, तेजस्विनीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. तिला तातडीने पुण्यातील मनिपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.आपल्या मुलीला कार, फ्लॅट आणि सोन्याच्या अंगठीसाठी सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची कायदेशीर तक्रार तेजस्विनीच्या वडिलांनी दिली आहे. या फिर्यादीवरून चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Pune Crime : हुंड्यासाठी छळ अन् गर्भपाताची सक्ती; 25 वर्षीय विवाहितेने संपवले जीवन Read More »

img 20260604 wa0017

Neet Exam: सरकारला नव्हे, ज्यांना तुम्ही मतदान दिले त्यांना जाब विचारा

Neet Exam: देशात एखादा घोटाळा उघडकीस आला, पेपरफुटी झाली, तरुण बेरोजगार राहिले किंवा शेतकरी संकटात सापडला की सोशल मीडियावर आणि चौकाचौकांत एकच सूर उमटतो “सरकार काय करत आहे?” प्रश्न योग्य आहे. पण त्याहून महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, ज्यांना आपण मतदान करून निवडून दिले, त्यांना आपण कधी जाब विचारला आहे का? लोकशाहीत सत्ता आकाशातून पडत नाही. ती मतपेटीतून जन्माला येते. प्रत्येक आमदार, खासदार, नगरसेवक किंवा सरपंच हा जनतेच्या मतांवर निवडून येतो. त्यामुळे समस्या निर्माण झाल्यानंतर केवळ व्यवस्थेला दोष देणे पुरेसे नाही; त्या व्यवस्थेचे प्रतिनिधी म्हणून आपण निवडून दिलेल्या लोकांना उत्तर मागणेही तितकेच आवश्यक आहे. आज लाखो तरुण पेपरफुटीच्या घटनांमुळे हवालदिल झाले आहेत. वर्षानुवर्षे अभ्यास करूनही परीक्षा रद्द होतात. भरती प्रक्रिया रखडतात. शेतकरी उत्पादन खर्च वाढल्याने अडचणीत आहे. हमीभाव, सिंचन आणि बाजारपेठेच्या प्रश्नांनी तो त्रस्त आहे. या प्रश्नांवर निवडणुकीपूर्वी आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपण निवडून दिल्यानंतर किती वेळा त्यांचा हिशेब मागितला? लोकशाहीतील सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे मतदाराचा सक्रिय सहभाग मतदानाच्या दिवशी संपतो. निवडणूक आली की विकास, रोजगार, शिक्षण आणि शेती यावर चर्चा होते; निवडणूक संपली की नागरिक पुन्हा प्रेक्षक बनतो. याच निष्क्रियतेतून उत्तरदायित्व हरवते. लोकशाही मजबूत करण्याचा एकच मार्ग आहे प्रतिनिधींना सतत प्रश्न विचारणे. त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण झाली का? त्यांनी विधानसभेत किंवा संसदेत आपल्या प्रश्नांवर आवाज उठवला का? आपल्या मतदारसंघासाठी निधी आणला का? या प्रश्नांची उत्तरे मागितली गेली तरच राजकारणाची दिशा बदलेल. कारण लोकशाहीत सत्ता ही जनतेची असते. सरकार बदलते, पक्ष बदलतात, चेहरे बदलतात; पण मतदाराची जबाबदारी बदलत नाही. त्यामुळे पुढच्या वेळी एखाद्या घोटाळ्यावर संताप व्यक्त करताना एक प्रश्न स्वतःलाही विचारायला हवा ज्यांना मी मतदान दिले, त्यांच्याकडे मी कधी जाब मागितला आहे का? लोकशाही केवळ मतदानाचा अधिकार देत नाही; ती प्रश्न विचारण्याचा अधिकार आणि जबाबदारीही देते. आणि कदाचित, याच जबाबदारीच्या जाणीवेतून अधिक उत्तरदायी राजकारणाची सुरुवात होऊ शकते.

Neet Exam: सरकारला नव्हे, ज्यांना तुम्ही मतदान दिले त्यांना जाब विचारा Read More »

dilip walse patil

Dilip Walse Patil : कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकार सकारात्मक; दिलीप वळसे पाटील

Dilip Walse Patil :राज्यात सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, त्यांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत, राज्याचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी आंदोलक आणि शेतकऱ्यांना जाहीर चर्चेचे खुले आमंत्रण दिले आहे. सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असून, सुधारणांसाठी आंदोलकांशी चर्चा करण्याची आपली पूर्ण तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आंदोलन संपवून आंदोलक आपल्याकडे आले, तर त्यांचे आदरातिथ्य करायला आपल्याला नक्कीच आवडेल, असे सांगत वळसे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांमध्ये योग्य त्या सुधारणा नक्कीच करता येऊ शकतात, असा विश्वास व्यक्त केला. अगदी त्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी बोलावले, तरीही मनात कोणताही पूर्वग्रह न ठेवता शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला तिथे येण्यास आपण तयार असल्याचे सांगत, या प्रयत्नांमध्ये आपला कोणताही स्वार्थ नसून शेतकऱ्यांचे हित हाच एकमेव उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कांदा उत्पादक आणि साखर उद्योगाच्या अडचणींवर केंद्र पातळीवरून वेगाने हालचाली सुरू असल्याची महत्त्वपूर्ण माहिती देताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी, गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तामामा भरणे, पणन मंत्री जयकुमार रावल, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासह केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान आणि पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते. या बैठकीत छगन भुजबळ, दादा भुसे, जयकुमार रावल आणि स्वतः दिलीप वळसे पाटील यांनी कांदा प्रश्ना संदर्भातील सद्यस्थिती आणि दाहकता केंद्राच्या निदर्शनास आणून दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या संपूर्ण विषयावर अत्यंत गांभीर्याने लक्ष दिले असून, येत्या पुढील १० दिवसांत या संदर्भात योग्य तो सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन राज्य सरकारला दिले आहे. या आश्वासनाच्या अनुषंगाने आपण स्वतः केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयाशी सातत्याने संपर्क ठेवून असून, या संपूर्ण प्रक्रियेचा नियमित पाठपुरावा घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.कांदा उत्पादकांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार यांची भेट घेणार असल्याची घोषणाही दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी केली. या आगामी भेटीदरम्यान, वळसे पाटील हे शरद पवार यांना दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीतील सविस्तर चर्चेची माहिती देणार असून, केंद्र सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आणि तातडीने दिलासा मिळावा, यासाठी पवार साहेबांनी देखील त्यांच्या पातळीवर केंद्र सरकारकडे वजन वापरावे आणि हा विषय लावून धरावा, अशी विनंती ते या भेटीत करणार आहेत. हवामान खात्याच्या अंदाजाचा दाखला देत दिलीप वळसे पाटील यांनी आगामी काळातील नैसर्गिक व आर्थिक आव्हानांकडेही लक्ष वेधले. येत्या वर्षात ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसाची संभाव्यता कमी असून साधारणतः ९० टक्केच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, शेतकरी बांधवांनी ऊस, कांदा किंवा इतर नगदी पिकांचे नियोजन करताना या सर्व हवामान बदलांचा अत्यंत गांभीर्याने विचार केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. यासोबतच आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या जागतिक युद्धाचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर होत असून यामुळे महागाई आणि आर्थिक मंदीचे सावट निर्माण होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. मात्र, जेव्हा जेव्हा देशात आर्थिक मंदी येते, तेव्हा कृषी क्षेत्रच देशाच्या आर्थिक विकासाला खरा हातभार लावून देशाला सावरू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेवटी बोलताना, शेतकरी राजा स्वतः परिस्थिती जाणत असल्याने त्याला सल्ला देण्याची गरज नाही, परंतु शेतकरी हितासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आणि प्रयत्नशील आहोत, असे सांगत आंदोलकांनी सकारात्मक चर्चेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन वळसे पाटील यांनी केले.

Dilip Walse Patil : कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकार सकारात्मक; दिलीप वळसे पाटील Read More »

Maratha Reservation 1

Maharashtra Reservation: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना मिळणार नोकरी

Maharashtra Reservation: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मध्ये नोकरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने घेतला आहे. अंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता या निर्णयातून झाली असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मराठा आरक्षण आणि इतर विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये मृत आंदोलकांच्या वारसदारांना नोकरी देण्याच्या मागणीचाही समावेश होता. या मागणीसंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने तातडीने शासन आदेश जारी करून मराठा आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांची पडताळणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी उपोषण सोडताना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मृत आंदोलकांच्या वारसदारांना एमआयडीसीमध्ये नोकरी देण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. यापूर्वी मृत आंदोलकांच्या वारसदारांना परिवहन महामंडळात समाविष्ट करून घेण्याचे ठरले होते. मात्र, काही वारसदारांची अपेक्षा एमआयडीसी किंवा महावितरण कंपनीमध्ये नोकरी मिळावी अशी होती. त्यानुसार एमआयडीसीमध्ये मृत व्यक्तींच्या वारसदारांना समाविष्ट करून घेण्याची प्रशासकीय कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यात आली असून, एमआयडीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एमआयडीसीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर सामान्य प्रशासन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून मृत आंदोलकांच्या पात्र वारसदारांची पडताळणी करून त्यांना तातडीने प्रमाणपत्र देण्याच्या सूचना दिल्या आहेत. अचूक आणि योग्य शहानिशा करून प्रमाणपत्र निर्गमित करण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, असे निर्देशही देण्यात आल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली. “अंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार करत आहे. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत महायुती सरकार संवेदनशील असून यापूर्वीही सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. भविष्यातही समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

Maharashtra Reservation: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना मिळणार नोकरी Read More »

Vikhe Patil

Radhakrishnan Vikhe Patil: शासकीय कार्यालये लोणीकडे स्थलांतर करण्याचा निर्णय अन् मंत्री विखेंविरोधात कर्मचाऱ्यांचा नाराजीचा सूर

Radhakrishnan Vikhe Patil: गोदावरी, मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अनेक कार्यालयांच्या मुख्यालयात बदल करण्याचा आदेश निघाला आहे. गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळाचे कामकाज गतिमान करण्यासाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महामंडळाच्या कार्यालयांचे स्थलांतर करून आस्थापनांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अहिल्यानगर पाटबंधारे विभागाचे मुख्यालय आता अहिल्यानगरऐवजी लोणी तर मुळा पाटबंधारे विभागाचे मुख्यालय अहिल्यानगर ऐवजी राहुरी असणार आहे. मात्र या निर्णयाला मोठा विरोध होत आहे परंतु आता कार्यालय स्थलांतर विरोधात दाखल याचिका छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. जलसंपदा विभागातील प्रशासकीय रचना बदलत गोदावरी खोरे महामंडळातील मुख्य अभियंत्याचे कार्यालय छत्रपती संभाजीनगरहून नांदेड येथे हलविण्यात आले आहे. तर नांदेड येथील उर्ध्वपैनगंगा प्रकल्प क्र. १ आणि क्र. ३ ही दोन कार्यालयांचे मुख्यालय थेट अहिल्यानगरमधील लोणी येथे हलविण्यात आले आहेत. उपअभियंत्याचे हे कार्यालय लोणीमध्ये हलिवण्यात कोणते प्रशासकीय हीत आहेत, असा प्रश्न आता विचारला जात आहे. अहिल्यानगर हे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांचा प्रभावक्षेत्र असल्याने हे बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जलसंपदा कार्यालयांच्या स्थलांतराच्या निर्णयावर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या कार्यालय स्थलांतराच्या निर्णयाविरोधात छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आली असून, जलसंपदा विभागाच्या धोरणात्मक निर्णयावर उच्‍च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून कृष्णा व गोदावरी पाटबंधारे महामंडळाने प्रदेश, मंडळ आणि विभाग स्तरावरील कार्यालयांच्या पुनर्रचनेचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. सिंचन प्रशासन गतिमान आणि लोकाभिमुख व्हावे, तसेच या निर्णयाचा लाभ शेतकरी, नागरिक आणि लोकप्रतिनिधींना व्हावा, हीच यामागची भूमिका होती. सिंचनविषयक कामांसाठी लोकप्रतिनिधी, शेतकरी व नागरिकांना कार्यालये जवळ तसेच धरण लाभक्षेत्रात असावीत, या उद्देशाने महामंडळाच्या २७ मे २०२६ रोजीच्या बैठकीत हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. मात्र, जलसंपदा विभागाच्या निर्णयाविरोधात रौफ नवजा पटेल यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने सदर याचिका खारीज केली आहे. न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान माननीय न्यायालयाने पक्षकाराला “सदरचे काम हे प्रशासकीय आहे, मात्र समाजमाध्यमांतून प्रसारित झालेली कागदपत्रे घेऊन न्यायालयात याचिका दाखल केली आहे”, असे म्हटले. तसेच सदरचे प्रकरण दाखल करताना पक्षकाराने कोणताही अभ्यास किंवा कागदपत्रांचे संशोधन केलेले नाही, असे अभिप्राय नोंदवले. याचसोबत, “विभागाच्या मंत्र्यांना प्रतिवादी का केले?” असा प्रश्नही केला. सदर याचिकेचे कामकाज चालू ठेवण्यासाठी २० लाख रुपये भरावे किंवा याचिका मागे घ्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आणि यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला होता. त्यावर पक्षकाराने याचिका मागे घेत असल्याचे न्यायालयासमोर सांगितले. कार्यालय स्थलांतर करण्याचा महामंडळाचा निर्णय असून, राज्यातील नदीजोड प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी तसेच जलसंपदा विभागाच्या योजनांच्या व निर्णयांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी घेतलेला हा धोरणात्मक निर्णय असल्याचे निरीक्षण न्यायालयाने याचिका फेटाळताना नोंदवले. राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ जी. पी. गिरासे, गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या वतीने सीनियर कौन्सिल विनायक होन आणि विधिज्ञ सुभाष तांबे यांनी बाजू मांडली. महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी १ जूनपासून सुरू झाली आहे. अनेक वरिष्ठ अधिकारी त्यांच्या नेमणुकीच्या कार्यालयांत हजर झाले. मात्र, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांच्या वतीने विभागाच्या निर्णयाविरोधात आंदोलने सुरू करण्यात आली होती. आजच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे आता सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी हजर होणे क्रमप्राप्त होणार आहे. अंबादास दानवेंनी व्यक्त केला संताप गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयांची झालेली फेरफेक म्हणजे निव्वळ ‘तुघलकी कारभार’! नांदेडचं ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाशी संबंधित कार्यालय थेट अहिल्यानगरच्या लोणीला हलवणं हा कोणता भूगोल? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला. तसेच सरकारने हे नकाशे नक्की कोणत्या शतकातले पाहून निर्णय घेतलेत? मराठवाड्याला मनस्ताप देणारा हा निर्णय त्वरित मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जा! असा इशारा देखील दानवे यांनी दिला.

Radhakrishnan Vikhe Patil: शासकीय कार्यालये लोणीकडे स्थलांतर करण्याचा निर्णय अन् मंत्री विखेंविरोधात कर्मचाऱ्यांचा नाराजीचा सूर Read More »

election

Pathardi News : ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत 19 जागांसाठी 25 अर्ज दाखल

Pathardi News : वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत १९ संचालक पदांच्या जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेच्या एक दिवस अगोदरपर्यंत २५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २ जून आहे. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी आमदार आप्पासाहेब राजळे, उपाध्यक्ष रामकिसन काकडे यांच्यासह विद्यमान संचालक मंडळातील आमदार मोनिका राजळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, उद्धव वाघ, सुभाष ताठे, श्रीकांत मिसाळ, रावसाहेब सातपुते, अनिल फलके, बाबासाहेब किलबिले, सुभाष बुधवंत, शरद अकोलकर, यशवंतराव गवळी, कुशिनाथ बर्डे, सिंधुबाई जायभाये तसेच स्वीकृत संचालक नारायण काकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय संचालक मंडळात नव्याने प्रवेश करण्यासाठी प्रदीप पाटील, संदीप लोखंडे आणि बापूसाहेब पाटेकर यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरत उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. माजी आमदार आप्पासाहेब राजळे, राहुल राजळे, सुभाष ताठे, बापूसाहेब पाटेकर या चार उमेदवारांनी वेगवेगळ्या मतदारसंघांतून प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. तर आमदार मोनिका राजळे वेगवेगळ्या मतदार संघातून तीन अर्ज दाखल केले आहे. आहे. १९ व्यक्तींनी २५ अर्ज दाखल केले आहे. दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नसल्याने या जागेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मंगळवारी (२ जून) अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस अखेर आलेले अर्ज व त्यानंतर अंतिम छाननी आणि अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २६ मे ते २ जून या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. नामनिर्देशन पत्रांची छाननी ३ जून रोजी होणार असून अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १८ जूनपर्यंत आहे. अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून चिन्हांचे वाटप १९ जून रोजी करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास २६ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल, तर २७ जून रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया तहसील कार्यालय, पाथर्डी येथे नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली पार पडणार आहे. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आज (मंगळवारी) असल्याने उमेदवारी अर्जाच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Pathardi News : ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत 19 जागांसाठी 25 अर्ज दाखल Read More »