DNA मराठी

FDA Action In Ahilyanagar: अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई ; आईस्क्रीम व खाद्यतेलाचा साठा जप्त

fb img 1780492492207

FDA Action In Ahilyanagar: जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अन्न भेसळविरोधी विशेष मोहिमेत राहुरी व नेवासा तालुक्यात कारवाई करून २ लाख ८४ हजार १८० रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम व खाद्यतेल जप्त करण्यात आले असून नागरिकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त अन्न अ. अ. भोईटे यांनी केले आहे.

राहुरी येथील शिवशक्ती आईस्क्रीम या आस्थापनाची तपासणी करून शिवशक्ती ब्रँडच्या आईस्क्रीम गुलकंद व अमेरिकन नट्स या उत्पादनांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. दर्जाहीन असल्याच्या संशयावरून या ठिकाणी ४१ हजार ४४० रुपये किमतीचे एकूण १४८ पॅकेट्स आईस्क्रीम जप्त करण्यात आले. तसेच नेवासा तालुक्यातील कडू गल्ली येथील संतोष किराणा स्टोअर्सची तपासणी करून एसबीजी ब्रँडच्या रिफाइंड पामोलीन ऑईल या खाद्यतेलाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. हा साठा संशयास्पद आढळल्याने २ लाख ४२ हजार ७४० रुपये किमतीचे १ हजार ४९८.४ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले.

अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार व सहआयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ व नियम २०११ अंतर्गत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार, अन्न सुरक्षा अधिकारी उ. र. पाटील व सहायक आयुक्त अन्न अ. अ. भोईटे यांनी या कारवाया केल्या आहेत.

नागरिकांना स्वच्छ व भेसळमुक्त अन्न उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हाभर ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात सुरू आहे. अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *