Rohit Sharma: 19 फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उद्घाटन समारंभाला भारतीय कर्णधार रोहित शर्मा जाणार नसल्याची बातमी समोर येत आहे. रोहीत शर्माला पाकिस्तानमध्ये पाठवण्यास बीसीसीआय तयार नसल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे बीसीसीआयच्या या निर्णयामुळे पीसीबी देखील नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे.
तर दुसरीकडे यापूर्वी ही संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होती, परंतु बीसीसीआयने नकार दिल्यानंतर ती हायब्रिड मॉडेलवर आयोजित केली जात आहे.
रोहित शर्मा पाकिस्तानमध्ये कर्णधारांच्या पारंपारिक फोटोशूट आणि कार्यक्रमापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सहभागी होण्याची अपेक्षा होती. भारत चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने दुबईमध्ये खेळेल, ज्यामध्ये 23 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे. बीसीसीआयने रोहितला पाकिस्तानला पाठवण्याच्या वृत्ताला दुजोरा किंवा नकार दिलेला नाही. पण भारतीय संघ जर्सीवर पाकिस्तानचे नाव न छापण्याचा विचार करत असल्याबद्दल पीसीबीच्या अधिकाऱ्याने नाराजी व्यक्त केली आहे.
पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर आयएएनएसला सांगितले की, ‘बीसीसीआय क्रिकेटमध्ये राजकारण आणत आहे, जे खेळासाठी अजिबात चांगले नाही. आधी त्याने पाकिस्तान दौऱ्याला नकार दिला, नंतर आता तो कर्णधाराला उद्घाटन समारंभाला पाठवत नाही. आणि आता बातम्या येत आहेत की त्यांना जर्सीवर यजमान देशाचे (पाकिस्तान) नाव नको आहे. आम्हाला आशा आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) हे होऊ देणार नाही आणि पाकिस्तानला पाठिंबा देईल.
या स्पर्धेसाठी भारताने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. रोहित शर्माला कर्णधार आणि शुभमन गिलला उपकर्णधार बनवण्यात आले आहे, तर मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि यशस्वी जयस्वाल यांचाही संघात समावेश आहे.
भारत आपला पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळेल आणि 23 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरेल. भारताचा गटातील शेवटचा सामना 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध असेल.