DNA मराठी

Foreign Exchange Reserves : भारताच्या परकीय चलन साठ्यात 37.8 अब्ज डॉलर्सची घट; अर्थव्यवस्थेवर काय होणार परिणाम?

rbi

Foreign Exchange Reserves : अमेरिका – इराण युद्धाचा फटका आता भारतीय अर्थव्यवस्थेला बसताना दिसतोय. या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 104 च्या वर गेल्याने देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढत आहे. यातच देशाची सर्वात मोठी बँक भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आलेल्या आकडेवारीने देशाच्या चिंतेत वाढ केली आहे. या आकडेवारीनुसार, गेल्या दोन महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी ते मे 2026 पर्यंत भारताच्या परकीय चलन साठ्यात सुमारे 37.8 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. अवघ्या दोन महिन्यात इतकी मोठी घट झाल्याने देशात आता महागाई नियंत्रित करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना काटकसरीचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर देशात पुन्हा एकदा परकीय चलन साठा चर्चेचा विषय बनला आहे.

एक वर्षासाठी सोन्याची खरेदी करणे टाळावे, परदेश प्रवास पुढे ढकलावे आणि इंधनाचा वापर कमी करावा असं आवाहन देशातील नागरिकांना पंतप्रधान मोदींकडून हैदराबाद येथे आयोजित सभेत बोलताना करण्यात आले होते.

परकीय चलन साठा म्हणजे देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे डॉलर, सोने आणि इतर विदेशी चलनांचा साठा. भारतात या साठ्याचे व्यवस्थानप आरबीआयकडून करण्यात येते. परकीय चलन साठा आयात खर्च, रुपयाची स्थिरता आणि आर्थिक संकटाच्या काळात खूप महत्त्वाचा मानला जातो. ताज्या आकडेवारीनुसार, सध्या भारताचा परकीय चलन साठा 690.69 अब्ज डॉलर इतका असून हा साठा फेब्रुवारी 2026 मध्ये 728.49 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर होता. मात्र अवघ्या दोन महिन्यांत जवळपास 37.8 अब्ज डॉलरची घट झाली असल्याची माहिती आरबीआयकडून देण्यात आलीय. तज्ज्ञांच्या मते, रुपयाला आधार देण्यासाठी RBI कडून डॉलर विक्री करण्यात आली. याशिवाय कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमती, परदेशी गुंतवणूक बाहेर जाणे आणि जागतिक तणाव यामुळे डॉलरची मागणी वाढली. त्याचा थेट परिणाम भारताच्या परकीय चलन साठ्यावर झाला.

भारत परकीय चलन कसे मिळवतो?

भारत निर्यातीद्वारे, परकीय गुंतवणुकीद्वारे (FDI/FPI) आणि परदेशातून येणाऱ्या पैशांद्वारे परकीय चलन मिळवतो. जेव्हा भारत इतर देशांना वस्तूंची विक्री करतो, तेव्हा त्याला परकीय चलनाच्या स्वरूपात मोबदला मिळतो. याव्यतिरिक्त, जेव्हा परदेशात वास्तव्यास असलेले भारतीय नागरिक आपल्या मायदेशी असलेल्या कुटुंबाला पैसे पाठवतात, तेव्हा परदेशातून येणारा हा पैसा (रेमिटन्स) देशासाठी परकीय चलनाचा एक महत्त्वपूर्ण स्रोत ठरतो. या सर्व स्रोतांपासून प्राप्त होणाऱ्या परकीय चलनाचा समावेश देशाच्या अधिकृत परकीय चलन साठ्यामध्ये करून, त्याचे व्यवस्थापन RBI द्वारे केले जाते.

आरबीआयच्या सहामाही ‘राखीव निधी व्यवस्थापन अहवालानुसार’, मार्च 2026 च्या अखेरीस भारताचा परकीय चलन साठा 691.11 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. सुमारे 11 महिन्यांच्या आयात खर्चाची (import bills) पूर्तता करण्यासाठी हा साठा पुरेसा मानला जातो. या अहवालानुसार, भारताच्या राखीव साठ्यामध्ये सोन्याचा वाटाही वाढला आहे. मार्च 2026 पर्यंत, देशाच्या एकूण परकीय चलन साठ्यामध्ये सोन्याचे प्रमाण 16.7 टक्क्यांपर्यंत वाढले तर सप्टेंबर 2025 मध्ये हे प्रमाण 13.92 टक्के होते. मार्च 2026 च्या स्थितीनुसार, भारताकडे एकूण 880.52 मेट्रिक टन सोन्याचा साठा होता, ज्यापैकी सुमारे 680.05 मेट्रिक टन सोने देशांतर्गत (भारतातच) साठवून ठेवण्यात आले आहे. आरबीआय आणि इतर जागतिक संस्थांच्या अंदाजानुसार, मे 2026 च्या सुमारास भारताचा परकीय चलन साठा $700 अब्ज डॉलर्सच्या वर असणे अपेक्षित होते मात्र भारताला अपेक्षित साठा गाठता आला नाही. अपेक्षित साठा गाठता आल्या नसल्याने देशात महागाई वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *