Rohit Pawar: गेल्या काही दिवसांत विविध पदे आणि उमेदवारी वाटपांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात कुटुंबातील आणि मर्जीतील व्यक्तींना संधी देण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आता वेगळी भूमिका घेतली आहे. पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांनी यासंबंधीचे संकेत दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत कार्यक्रम झाला.
येत्या पंधरा दिवसांत पक्षात फेरबदल केले जाणार असून ज्यांचे कोणा नेत्याशी नाते, घराणेशाहीशी संबंध नाही, अशा सामान्य पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे आमदार पवार म्हणाले आहेत.
रोहित पवार म्हणाले, पुढील दहा पंधरा दिवसात पक्षात संघटनात्मक बदल करण्यात येणार आहे. यामध्ये नव्या कार्यकर्त्यांना पदे देण्यात येणार आहेत. ज्यांचे कोणाही नेत्याशी नाते नाही, ज्यांचा घराणेशाहीशी संबंध नाही, अशा कार्यकर्त्यांना पक्षाची पदे दिली जाणार आहेत. ग्रामीण भागातील कार्यकर्ते, युवक आणि महिलांना पुढे आणण्यावर भर दिला जाणार आहे. पक्ष मजबुत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पक्षात बदल करण्याच्या घोषणा शक्यतो स्वतः शरद पवार करीत असतात. यावेळी पवार किंवा कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्याऐवजी आमदार रोहित पवार यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे रोहित पवार यांनाही पक्षात मोठी संधी मिळणार असल्याचे मानले जात आहे.






