DNA मराठी

Sujay Vikhe : माझं नाव चर्चेत आणूनच नका, दरवेळी पत्ता कट होतो : सुजय विखे

sujay vikhe

Sujay Vikhe: ‘राहुरी पोट निवडणूक आली, माझं नाव पुढं आलं. पुढे पत्ता कट झाला.. विधान परिषद निवडणूक आली.. पुन्हा माझं नाव आणि पत्ता कट… आता पुन्हा विधान परिषद आली, माझं नाव आलं, पत्ता कट.. यापुढं माझं नाव चर्चेत आणूच नका,’ असे वक्तव्य माजी खासदार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

शिर्डी संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळासंबंधी प्रश्न विचारला असता त्यांनी माध्यमांशी बोलताना हे विधान करून संस्थावर कोणाची नियुक्ती करावी, हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असल्याचेही सांगितले.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर डॉ. विखे यांचे जिल्ह्यातील विविध निवडणुकांच्यावेळी नाव पुढे आले. मात्र, त्यांना संधी मिळालीच नाही. आता शिर्डीच्या साईबााबा संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे डॉ. विखे पाटील यांचे नाव पुन्हा एकदा पुढे आले आहे.

याच अनुषंगाने प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना हा प्रश्न विचारला होता. त्यावर ते म्हणाले, तुम्हीच माझे नाव पुढे आणता आणि पुढे पत्ता कट झाला म्हणता. त्यामुळे आता माझे नाव पुढे आणूच नका. संस्थानवरील नियुक्तीच्या प्रक्रियेत विखे पाटील कुटुंब कधीच नव्हते. तरीही शिर्डीकरांचा विखे पाटील यांच्यावर विश्वास आहे.

विश्वस्त मंडळाची नियुक्ती करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. कोणीही आले तरी त्यांना शिर्डीच्या विकासासाठी काम करावेच लागेल. नाही केले तर शिर्डीचे लोक जाब विचारतील. माझ्या मते या संस्थानवर सुशिक्षित आणि समृद्ध माणसे यावीत. मोठमोठ्या कंपन्या चालविणारे, नावाजलेले, पद्मश्री, पदमभूषण असे लोक आले तर त्यांच्या अनुभवाचा फायदा शिर्डीला होईल. अर्थात हे सांगण्यापेक्षा मुख्यमंत्री आणि आमचे नेते एकत्र बसून यासंबंधी निर्णय घेतील, असेही डॉ. विखे म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *