Manoj Jarange : मुंबई आंदोलनावरुन मनोज जरांगे पाटील आक्रमक; सरकारला थेट इशारा

Manoj Jarange : मुंबईतील आंदोलनांवर निर्बंध घालण्याच्या राज्यसरकारच्या निर्णयावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. दक्षिण मुंबईतील आझाद मैदान वगळता इतर ठिकाणी आंदोलन, धरणे किंवा मोर्चा काढण्यास निर्बंध घालण्याच्या निर्णयाला त्यांनी तीव्र विरोध केला आहे. मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने येणार असल्यानेच सरकारने हे नवे नियम लागू केल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.

सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात. मागण्या मान्य झाल्या तर मुंबईत आंदोलन करण्याची वेळच येणार नाही. मात्र, मागण्या प्रलंबित ठेवून आंदोलनाला परवानगी नाकारली, तरी आपला आंदोलनाचा निर्धार कायम राहील, असा स्पष्ट इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मुंबईतील आंदोलनांसाठी सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी करताना जरांगे पाटील यांनी आपण कायद्याचा सन्मान करत असल्याचे स्पष्ट केले. आंदोलनासाठी प्रशासनाकडे परवानगीचा अर्ज करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारने परवानगी द्यावी; मात्र परवानगी दिली नाही तरी आंदोलनापासून माघार घेतली जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

सरकारवर निशाणा साधताना जरांगे पाटील यांनी, जनतेनेआणि विशेषतः मराठा समाजाने सरकारला सत्तेवर बसवले, पण आता त्याच समाजाला मुंबईत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. मुंबईतील आंदोलनांवर निर्बंध घालण्यामागे मराठा समाजाच्या संभाव्य आंदोलनाचीच भीती असल्याचेही त्यांनी म्हटले.

मुंबईतील नागरिकांनी आंदोलनाच्या काळात काही दिवस सहकार्य करावे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले. मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य केल्या, तर मुंबईत येण्याची गरजच भासणार नाही. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल होईल, असा इशारा त्यांनी दिला.

“मराठे मुंबईत जाणार आहेत, त्यामुळे मुद्दामून सरकारने हे केलं. यात झाकून ठेवण्यासारखं काहीच नाही… आम्ही कायद्याचा सन्मान करतो. आम्ही तुम्हाला परवानगीचा अर्ज दिला आहे. तुम्ही परवानगी द्या, नाहीतर नका देऊ.”

दरम्यान, २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जरांगे पाटील यांनी पुन्हा स्पष्ट केले. या आंदोलनानंतर मुंबईतील आंदोलनाची तारीख निश्चित केली जाईल, असे त्यांनी सांगितले. मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर झाल्यानंतर मराठा समाजाने तयारीत राहावे, वाहनांना किक मारून मुंबईच्या दिशेने निघावे आणि आंदोलनात विजय मिळवूनच परत यायचे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

फडणवीस सरकारने दादागिरी करू नये, असा थेट इशारा देत जरांगे पाटील यांनी आझाद मैदानासह मुंबईतील विविध ठिकाणी आंदोलन करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा आणि आंदोलनाची वेळ येऊ नये, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली आहे. दुसरीकडे, मुंबईतील कायदा सुव्यवस्था आणि आंदोलनांवरील निर्बंधांचा मुद्दा आता पुन्हा चर्चेत आला असून, २९ ऑगस्टच्या अंतरवाली सराटी येथील आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *