DNA मराठी

Sujay Vikhe: सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विखे पाटील हॉस्पिटलमध्ये विविध आरोग्यसेवा मोफत

vikhe patil hospital

Sujay Vikhe: वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार देण्याचा उपक्रम डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या वतीने राबविण्यात आला आहे. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयातील विविध वैद्यकीय तपासण्या, उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गरजू रुग्णाला उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

या उपक्रमांतर्गत गर्भवती महिलांसाठी सोनोग्राफी, ॲनॉमली स्कॅन आणि आवश्यक रक्त तपासण्या मोफत करण्यात येत आहेत. तसेच सामान्य प्रसूती, सिझेरियन प्रसूती आणि कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियांचाही विनामूल्य लाभ दिला जात आहे. माता आणि बालकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, तसेच महिलांना आवश्यक वैद्यकीय सुविधा आर्थिक भाराविना उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत.

याशिवाय एक्स-रे, सोनोग्राफी, ईसीजी, 2डी इको आणि अँजिओग्राफी यांसारख्या महत्त्वपूर्ण वैद्यकीय तपासण्यांचाही या उपक्रमात समावेश आहे. नेत्ररुग्णांसाठी मोतीबिंदूसह डोळ्यांच्या अन्य आवश्यक शस्त्रक्रिया मोफत करण्यात येत आहेत. तसेच वीस वर्षांखालील मधुमेहग्रस्त रुग्णांना इन्सुलिनची सुविधा आणि लहान मुलांसाठी आंतररुग्ण उपचारसेवाही विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे.

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. विविध सुपरस्पेशालिटी विभागांच्या माध्यमातून गंभीर आजारांवरील उपचारांची सुविधा एकाच छताखाली उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील पहिले अवयव प्रत्यारोपण केंद्र सुरू करून प्रत्यारोपणासारख्या गुंतागुंतीच्या उपचारांसाठीही जिल्ह्यातच सुविधा निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे अशा उपचारांसाठी रुग्णांना अन्य मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होत आहे. शासनाच्या विविध आरोग्य योजनांच्या माध्यमातून पात्र रुग्णांना मोफत उपचारांचा लाभ दिला जात असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही सुविधा आधार ठरत आहे.

आरोग्यसेवा ही केवळ आजारांवरील उपचारांपुरती मर्यादित नसून त्यामध्ये माणुसकी, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचा भाव महत्त्वाचा असतो. याच विचारातून वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम गरजू रुग्णांसाठी दिलासादायक ठरत आहे. वाढदिवसाचे औचित्य समाजोपयोगी उपक्रमातून साजरे करण्याची ही संकल्पना रुग्णसेवेप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करणारी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *