Delimitation Bill : आगामी परिसीमन विधेयकाच्या मुद्द्यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून केंद्र सरकारला पाठिंबा मिळण्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. या पाठिंब्याच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाकडून केंद्र आणि महाराष्ट्रातील सत्तेत सहभागाची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे.
या चर्चेत बारामतीच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांना नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी असल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारमध्येही दोन कॅबिनेट मंत्रिपदे आणि दोन राज्यमंत्रिपदांची मागणी असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रातही सत्तेतील वाट्याची मागणी
सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाकडून महाराष्ट्रातील भाजपप्रणीत सरकारमध्ये दोन कॅबिनेट मंत्रिपदांची मागणी करण्यात आली आहे. जयंत पाटील यांना अर्थमंत्रिपद, तर जितेंद्र आव्हाड यांना आणखी एक कॅबिनेट पद मिळण्याची चर्चा आहे. याशिवाय दोन राज्यमंत्रिपदांचीही मागणी असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केले जाणार असल्याच्या चर्चांना स्वतः सुळेंनी यापूर्वीच निराधार ठरवले आहे. त्यांच्या पक्षाकडे विधानसभेत केवळ 10 आमदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
परिसीमन विधेयकावर राष्ट्रवादीचा नेमका स्टँड काय?
परिसीमन विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही अटी असल्याचे समोर आले आहे. लोकसभा जागांमध्ये सर्व राज्यांसाठी समान 50 टक्के वाढ, महिला आरक्षणाची अंमलबजावणी आणि परिसीमन आयोगात विरोधकांना योग्य प्रतिनिधित्व या मुद्द्यांवर पक्षाने भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पक्ष परिसीमन विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, सुप्रिया सुळे आणि पक्षाचे खासदार विधेयकाचा मसुदा पाहून अंतिम निर्णय घेतील, अशी भूमिका पक्षाच्या काही नेत्यांनी स्पष्ट केली आहे.
विशेष अधिवेशनापूर्वी राजकीय हालचालींना वेग
संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून लोकसभेत आणि 2 डिसेंबरपासून राज्यसभेत होणार आहे. या अधिवेशनात परिसीमनाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे लोकसभेत आठ खासदार असल्याने त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे परिसीमन विधेयकाच्या बदल्यात सुप्रिया सुळेंना केंद्रीय मंत्रिपद आणि महाराष्ट्रात सत्तेतील वाटा मिळणार का? याकडे आता राष्ट्रीय राजकारणाचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या मंत्रिपद किंवा सत्तावाटपाबाबत कोणताही अंतिम निर्णय अधिकृतपणे जाहीर झालेला नाही. ही माहिती सूत्रांच्या हवाल्यावर आधारित आहे.






