DNA मराठी

हायलाईट

nitesh rane

डीजेला विरोध असेल तर ईदच्या मिरवणुकीतही डीजे बंद करा

Nitesh Rane : विश्व हिंदू परिषदेने घेतलेल्या भूमिकेवरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. विश्व हिंदू परिषदेची भूमिका हा राजकीय नव्हे, तर धार्मिक विषय असल्याचे सांगत राणे यांनी हिंदू सणांबाबतच नियम आणि आव्हाने का दिली जातात, असा सवाल केला. तसेच डीजे, मराठा आरक्षण, राज ठाकरे यांचे GDP वरील वक्तव्य आणि दिशा सालियन प्रकरणावरही त्यांनी भाष्य केले. ‘विश्व हिंदू परिषदेची भूमिका धार्मिक, राजकीय नाही’ विश्व हिंदू परिषदेने घेतलेली भूमिका ही राजकीय नसून धार्मिक विषयाशी संबंधित असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. एखाद्या भूमिकेवर कोणी टीका केली म्हणून तो राजकीय विषय ठरत नाही, असेही ते म्हणाले. “ईदचा सण झाला. जे इस्लाम धर्माला मानतात, त्यांच्यात कोणत्याही हिंदूला सहभागी होण्याची परवानगी नाही. मग हिंदू धर्मात अशी परवानगी कशी असेल?” असा सवाल राणे यांनी केला. विश्व हिंदू परिषदेने कोणत्याही धर्माला डिवचण्यासाठी ही मागणी केलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, हिंदू सणांच्या वेळीच नियम आणि सूचना का दिल्या जातात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “सगळी आव्हानं फक्त हिंदूंनाच का? गणेश चतुर्थीच्या वेळी चपला मारू नका, अंडी मारू नका, असा सल्ला मुल्ला-मौलवी का देत नाहीत? आम्हालाच का सगळे सल्ले? यांना का नाही? हिंमत असेल तर ईदच्या अगोदर बोलून दाखवा,” असे राणे म्हणाले. सनातन धर्माला टार्गेट करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत, “बाळासाहेब ठाकरे बोलण्याची हिंमत करायचे,” असे म्हटले. ‘डीजेचा त्रास असेल तर ईदच्या मिरवणुकीतही बंद करा’ गणेशोत्सवातील डीजेच्या मुद्द्यावरूनही नितेश राणे यांनी भूमिका मांडली. डीजेमुळे नागरिकांना त्रास होत असेल तर सर्व धर्मांच्या मिरवणुकींसाठी समान नियम असायला हवेत, असे ते म्हणाले. “डीजे ईदला वाजत नाही का? मुख्यमंत्र्यांच्या सरकारची भूमिका स्पष्ट आहे. सांस्कृतिक पद्धतीने सण साजरा करा. पण डीजेमुळे त्रास होत असेल तर ईदच्या मिरवणुकीतही डीजे बंद करा,” असे राणे म्हणाले. आमच्या धर्मात कोणालाही त्रास देण्याचे कुठेही लिहिलेले नाही, असे सांगत डीजेबाबत सर्वांसाठी समान नियम असण्याची मागणी त्यांनी केली. रस्त्यावर होणाऱ्या नमाजाबाबत आणि ईदच्या मिरवणुकांबाबतही हाच नियम लागू असायला हवा, असे राणे म्हणाले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात समानतेचा विचार मांडला आहे. हे सर्वच हिंदू धर्म मानतो. मग इतर धर्मांसाठी वेगळे नियम का? कायदा सर्वांसाठी समान असायला पाहिजे,” असे त्यांनी म्हटले. मराठा आरक्षणावर सरकार सकारात्मक मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना नितेश राणे यांनी राज्य सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले. “सर्व जातींना समान न्याय देण्याची जबाबदारी आमची आणि महायुतीची आहे. हिंदू समाजाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व जातींचा विचार आमचे सरकार नक्कीच करेल,” असे राणे म्हणाले. यावेळी त्यांनी एका नेत्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत, “त्यांच्या मालकाला सांगायला पाहिजे की, संध्याकाळच्या कार्यक्रमाला जाऊ नका. सकाळी तुम्ही गुजराती समाजाबद्दल बोलता आणि तुमच्या मालकाचा मुलगा संध्याकाळी गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला जातो,” असा टोला लगावला. राज ठाकरे यांच्या GDP वक्तव्यावर राणेंचा टोला राज ठाकरे यांनी GDP संदर्भात केलेल्या वक्तव्यावरही राणे यांनी टीका केली. “GDP आणि ठाकरेंचा काय संबंध आहे?” असा सवाल करत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर उपरोधिक टिप्पणी केली. “GDP चा फुल फॉर्म सांगायचा असेल, तर त्यांच्याच भाषेत सांगतो कॅमेरा बंद करा,” असे म्हणत राणे यांनी आपली भूमिका मांडली. दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंना सवाल दिशा सालियन प्रकरणावरूनही नितेश राणे यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आदित्य ठाकरे या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे सांगत असतील, तर त्यांच्या वकिलांनी या प्रकरणात प्रतिज्ञापत्र (अॅफिडेव्हिट) का केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “आदित्य ठाकरे म्हणतात की, माझा या केसशी संबंध नाही. मग त्यांच्या वकिलांनी अॅफिडेव्हिट का केलं? महाविकास आघाडीच्या काळात लपवालपवी का झाली? जर तुमचा या प्रकरणाशी संबंध नाही, तर तुमच्या वकिलांना सांगा ते कोर्टात का उपस्थित राहतात?” असा सवाल राणे यांनी केला. दिशा सालियन प्रकरणात महाविकास आघाडी सरकारच्या काळात लपवालपवी झाल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

डीजेला विरोध असेल तर ईदच्या मिरवणुकीतही डीजे बंद करा Read More »

Vikhe Patil

Maratha Reservation: ग्रामपंचायतींमध्ये 58 लाख कुणबी नोंदी प्रसिद्ध करणार; 17 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात शिबिरे

Maratha Reservation : निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधलेल्या ५८ लाख नोंदी ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध केल्या जाणार असून, १० ते १७ सप्टेंबर दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात शिबिरे आयोजित करावीत तसेच सर्व जिल्ह्यांमधील अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय ठेवून आरक्षणातील प्रत्येक प्रश्नाबाबत गांभीर्याने कार्यवाही करावी, अशा सूचना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागीय आयुक्तांसह सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठवाड्यातील धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, लातूर, जालना या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्याशी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेऊन झालेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. या बैठकीमध्ये मंत्री विखे पाटील यांनी जिल्हानिहाय देण्यात आलेली जात पडताळणी प्रमाणपत्रांची संख्या, कुणबी नोंदी तसेच प्राप्त झालेल्या अर्जांचा सविस्तर आढावा घेतला. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याने आजपर्यंत केलेल्या कार्यवाहीची तसेच अंमलबजावणीची सविस्तर माहिती बैठकीमध्ये सादर केली. यामध्ये प्रामुख्याने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाने सापडलेल्या नोंदी वेबसाईटच्या माध्यमातून जाहीर केल्या आहेत. त्याच पद्धतीने इतर जिल्ह्यांनीही अशाच प्रकारची कार्यवाही करावी आणि १० ते १७ सप्टेंबर दरम्यान प्रमाणपत्रांच्या पूर्ततेसाठी शिबिरे आयोजित करून अधिक चांगल्या पद्धतीचे नियोजन करावे, अशा सूचना मंत्री विखे पाटील यांनी बैठकीमध्ये दिल्या. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री विखे पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. वंशावळ आणि कायदेशीर नियमांचे पालन करूनच प्रमाणपत्रे दिली जातील.” मराठवाड्यात आतापर्यंत साडेतीन लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याचे सांगत, पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे देताना नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील समाजासाठी आंदोलन करीत असून, त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत सरकार त्यांच्याशी चर्चा करणारच आहे. काही लोकांना त्या पायघड्या वाटत असतील, पण हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार पुढाकार घेत आहे; परंतु काही लोक मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी मुद्दाम आंदोलनाची भाषा करीत असतील तर ते चुकीचे असून, याद्वारे विनाकारण सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. सरकारने काहीही चुकीचे केलेले नाही व तशी भूमिकाही नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न कायदेशीर चौकटीत आणि सर्व समाजांच्या हिताचा विचार करून सोडविण्याची सरकारची भूमिका असून, पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्याचे विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. मराठा आरक्षणाबाबत सरकार केवळ आश्वासने देत असल्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपावर बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, मागील आंदोलनातील बहुतांश मागण्यांवर सरकारने कार्यवाही केली असून, उर्वरित मागण्यांवरही मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असून, आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याची सरकारची कधीही तयारी आहे.

Maratha Reservation: ग्रामपंचायतींमध्ये 58 लाख कुणबी नोंदी प्रसिद्ध करणार; 17 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात शिबिरे Read More »

satyajeet tambe

Satyajeet Tambe : तुम्ही फक्त उद्घाटनं करत बसा; काम मात्र आम्ही करणार…

Satyajeet Tambe : जनतेने आम्हाला काम करण्याचा कौल दिला आहे. तुम्ही फक्त उद्घाटनं करत बसा, काम मात्र आम्ही करणार. श्रेयाची आम्हाला गरज नाही; श्रेय कोणीही घ्या. ज्या विश्वासाने संगमनेरकरांनी आमच्यावर जबाबदारी टाकली आहे, ती पार पाडल्याशिवाय राहणार नाही,” असा स्पष्ट संदेश आमदार सत्यजीत तांबे यांनी दिला. संगमनेर नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा कार्यक्रम  नगरपरिषद प्रांगणात बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नातून उत्साहात पार पडला. यावेळी तांबे बोलत होते. या कार्यक्रमास बाळासाहेब थोरात, कार्यक्रमाध्यक्ष डॉ. सुधीर तांबे, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई मालपाणी, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, कैलासराव लोणारी, अरुणराव वाकचौरे, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नूरमोहम्मद शेख, मुख्याधिकारी दयानंद गोरे यांसह नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व नागरिक उपस्थित होते. आमदार तांबे यांनी यावेळी  संगमनेर 2.0’ च्या माध्यमातून शहराच्या विकासाचा नवा टप्पा सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला. शहरात पाणी उपलब्ध असले तरी काही भागात कमी दाबाने किंवा अशुद्ध पाणी येते. त्यामुळे २० ते २५ वर्षे जुन्या पाणीपुरवठा पाइपलाइन बदलणे, पाण्याचा दाब व गुणवत्ता सुधारणे, भूमिगत वीजवाहिन्या, भुयारी गटार आणि दर्जेदार रस्त्यांवर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विकासासाठी निधी आणण्यावर भर राज्य शासनाकडून पूर्वीच्या तुलनेत योजनांमध्ये नगरपालिकेचा वाटा वाढला असून काही योजनांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत स्थानिक स्वनिधी उभारावा लागतो, असे तांबे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, उत्पन्न वाढविणे आणि खर्च कमी करणे हा महत्त्वाचा अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांच्या म्युनिसिपल बाँडची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून क्रेडिट रेटिंगही करण्यात आले आहे. संगमनेर नगरपालिकेने यापूर्वीही बाँडच्या माध्यमातून निधी उभारला असल्याची जुनी कागदपत्रे मिळाल्याचे त्यांनी सांगितले. नगरपालिकेचे दरमहा सुमारे ४० लाख रुपयांचे वीजबिल येत असल्याने खर्च कमी करण्यासाठी मोठा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. पुढील वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण करून वीजबिल चार-पाच लाखांच्या आसपास आणण्याचा प्रयत्न असल्याचे तांबे यांनी सांगितले. 200 सीसीटीव्ही आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष शहराच्या सुरक्षेसाठी २०० सीसीटीव्ही कॅमेरे आणि ११ ठिकाणी सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा उभारण्यात आली आहे. नगरपालिकेत अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात आला असून त्यातून शहरातील कॅमेऱ्यांवर लक्ष ठेवता येणार आहे. पोलीस व रक्षक दलालाही या व्यवस्थेचा थेट उपयोग होणार आहे. महिलांची व मुलींची सुरक्षा हा निधी वापरण्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे तांबे यांनी सांगितले. या कामासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे त्यांनी आभार मानले. शहरातील रस्त्यांच्या तक्रारींची दखल घेत पुढील वर्षभरात टप्प्याटप्प्याने सर्व रस्ते दर्जेदार करण्याचे आश्वासन तांबे यांनी दिले. प्रत्येक रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतंत्र सेवानिवृत्त अभियंत्यामार्फत थर्ड पार्टी क्वालिटी तपासणी करण्यात येणार आहे. शहरातील छोट्या व्यावसायिकांना सुरक्षित व स्वच्छ जागा मिळावी यासाठी ११ ते १२ ठिकाणी फूड कोर्ट उभारण्याचे नियोजन आहे. दोन अधिकृत भाजी मार्केट सुरू करण्यात आले असून त्यापैकी एका ठिकाणी सुमारे १०० व्यापारी व शेतकऱ्यांना जागा उपलब्ध होणार आहे. ऑक्टोबरपासून नवीन कचरा व्यवस्थापन व्यवस्था सुरू होणार असून धूळमुक्त संगमनेर करण्यासाठी आधुनिक मशीनरी वापरण्यात येणार आहे. तसेच, महिला रुग्णालयाच्या प्रलंबित कामासाठी नगरपालिकेने बांधकामाची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शविली आहे. शासनाने डॉक्टर, औषधे, एमआरआय, एक्स-रे आदी आवश्यक वैद्यकीय साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याचे तांबे यांनी सांगितले. नियोजनातून शहराचा विकास करा- बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात यांनी शहराच्या विकासासोबत स्वच्छता, अतिक्रमण आणि योग्य नियोजनावर भर दिला. रस्ता तयार केल्यानंतर पुन्हा तो खोदण्याची वेळ येऊ नये, यासाठी सर्व विभागांचे आधीच नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली. छोट्या व्यावसायिकांना पर्यायी व्यवस्था देऊन शहर अधिक शिस्तबद्ध व सुंदर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी मागील आठ महिन्यांतील कामांचा आढावा घेत २०० सीसीटीव्ही, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, फूड कोर्ट, भाजी मार्केट, स्वच्छता मोहीम, रक्षक दल आणि प्राणी नियंत्रण केंद्र याबाबत माहिती दिली. शहरात अडीच ते तीन हजार झाडांची लागवड केल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी गणेशोत्सवासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Satyajeet Tambe : तुम्ही फक्त उद्घाटनं करत बसा; काम मात्र आम्ही करणार… Read More »

vikhe patil

Vikhe Patil: DSP चौकातील वाहतूक कोंडीला आता कायमस्वरूपी दिलासा; उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा

Vikhe Patil: अहिल्यानगर शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या डीएसपी चौकातील कोंडीचा प्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. शहराच्या वाढत्या वाहतुकीचा आणि भविष्यातील गरजांचा विचार करून डीएसपी चौकात उड्डाणपूल उभारण्याच्या कामाला गती मिळाली असून, या प्रकल्पासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने तसेच आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण प्रकल्प पुढे आला आहे. कोपरगाव-शिर्डी-कोल्हार-अहिल्यानगर या प्रमुख मार्गावरील डीएसपी चौक हा शहरातील वाहतुकीचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. संभाजीनगरकडून येणारी वाहने तसेच शिर्डी, कोपरगाव, कोल्हार आणि शहराच्या विविध भागांकडे जाणारी वाहतूक या चौकातून मोठ्या प्रमाणावर होते. वाढत्या वाहनसंख्येमुळे विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत या ठिकाणी मोठी कोंडी होत होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने काही मिनिटांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी नागरिकांना बराच वेळ वाहतुकीत अडकून राहावे लागत होते. परिणामी, वेळ आणि इंधनाचा अपव्यय होण्याबरोबरच रोजच्या प्रवासाचा ताणही वाढत होता. शहराच्या दैनंदिन वाहतुकीशी निगडित हा प्रश्न लक्षात घेऊन डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी डीएसपी चौकातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. शहराचा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता भविष्यातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी सक्षम पायाभूत सुविधा उभारण्याची गरज त्यांनी मांडली. त्यांच्या पाठपुराव्याला पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. डीएसपी चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रकल्पाला आता प्रत्यक्ष अंमलबजावणीची दिशा मिळाली आहे. उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर डीएसपी चौकातील मुख्य वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. शिर्डी, कोपरगाव, कोल्हार तसेच अहिल्यानगर शहराच्या विविध भागांकडे जाणाऱ्या वाहनांना अधिक सुरळीत मार्ग उपलब्ध होईल. परिणामी, चौकातील कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. डीएसपी चौकातील वाहतूक कोंडीचा परिणाम केवळ वाहनांच्या रांगांपुरता मर्यादित नव्हता. या कोंडीत अडकणाऱ्या नागरिकांचा वेळ, इंधन आणि श्रम खर्ची पडत होते. कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी, व्यापारी, रुग्णवाहिका तसेच शहराबाहेर प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा दररोज सामना करावा लागत होता. त्यामुळे उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर अहिल्यानगरकरांच्या रोजच्या प्रवासातील वेळ आणि त्रास कमी होणे हा या प्रकल्पाचा सर्वात मोठा परिणाम ठरणार आहे. अहिल्यानगर शहराचा विस्तार वेगाने होत असून, वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि शहराला जोडणाऱ्या प्रमुख मार्गांवरील वाहतूक लक्षात घेता भविष्यातील गरजांसाठी पायाभूत सुविधा सक्षम करणे आवश्यक झाले आहे. त्या दृष्टीने डीएसपी चौकातील उड्डाणपूल हा केवळ सध्याची वाहतूक कोंडी कमी करणारा प्रकल्प नसून, अहिल्यानगर शहराच्या पुढील अनेक वर्षांच्या वाहतूक व्यवस्थेचा विचार करून उचललेले महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. वर्षानुवर्षे डीएसपी चौकातील कोंडीचा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांसाठी उड्डाणपुलाच्या मंजुरीमुळे आता मोठा दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून, आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्याने आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला गती मिळाली आहे. अहिल्यानगर शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पासाठी निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार, अशी भावना डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली. शहराच्या वाढत्या गरजा आणि भविष्यातील वाहतुकीचा विचार करून शासनाने घेतलेला हा निर्णय अहिल्यानगरच्या विकासाला अधिक गती देणारा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Vikhe Patil: DSP चौकातील वाहतूक कोंडीला आता कायमस्वरूपी दिलासा; उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा Read More »

siya goyal

Ketan Agarwal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक; रितेश हांगे नवाचा पोलिसांच्या ताब्यात

Ketan Agarwal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या अटकेनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात आणखी एका संशयिताला अटक केली आहे. रितेश हांगे नवाचा (वय २३, रा. लोणावळा ग्रामीण) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. रितेश हा चेतन चौधरीचा मित्र असल्याची माहिती पोलिसांनी दिली. रितेशला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाच्या तपासाबाबत पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक (एसपी) संदीपसिंग गिल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पोलिसांच्या तपासानुसार, चेतन, सिया आणि रितेश यांच्यात मैत्री होती. केतन अग्रवालच्या हत्येपूर्वी झालेल्या नियोजनाची माहिती रितेशला होती. व्हॉट्सॲपवरील संदेश आणि इतर पुराव्यांच्या आधारे रितेशचा या प्रकरणात सक्रिय सहभाग असल्याचे समोर आल्याने त्याला अटक करण्यात आली. केतन अग्रवालची हत्या करण्यासाठी सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट किलिंगची योजना आखण्यात आली होती. मात्र, नंतर हा प्लॅन बदलण्यात आला आणि चेतन, सिया आणि रितेश यांनी स्वतःच केतनची हत्या करण्याचा कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे. सध्या तरी अन्य कोणतीही व्यक्ती तपासात समोर आलेली नसल्याचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी स्पष्ट केले. रितेशकडून मिळणाऱ्या माहितीतून हत्येच्या कटातील आणखी बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Ketan Agarwal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक; रितेश हांगे नवाचा पोलिसांच्या ताब्यात Read More »

anandraj ambedkar

Anandraj Ambedkar : फुकटचे सल्ले कोणालाही देत नाही; आनंदराज आंबेडकरांचा मनोज जरांगेंना टोला

Anandraj Ambedkar : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी थेट भाष्य करत जरांगे यांना चांगलाच टोला लगावला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाबाबत सध्या मला काही बोलायचे नाही. फुकटचे सल्ले मी कोणालाही देत नाही असा बोचरा प्रहार आंबेडकर यांनी केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या भूमिकेला आता त्यांच्या समाजातूनच मोठा विरोध होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. उपोषण हे प्रभावी हत्यार असते; मात्र वारंवार त्याचा वापर केल्याने त्याची धार बोथट होते, असा टोला त्यांनी लगावला. आम्ही जेव्हा मराठा समाजाला सोबत घेऊन सत्तेत येऊ, तेव्हा मराठा समाजाला पूर्ण आरक्षण देऊ मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी इच्छा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही व्यक्त केली होती, असा दावा आनंदराज आंबेडकर यांनी केला. मात्र, मराठा आरक्षणासाठी आपल्याकडे वेगळी भूमिका आणि वेगळा फॉर्म्युला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही जेव्हा मराठा समाजाला सोबत घेऊन सत्तेत येऊ, तेव्हा मराठा समाजाला पूर्ण आरक्षण देऊ असा दावा आनंदराज आंबेडकर यांनी केला. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.जरांगे यांच्या आंदोलनावर थेट सल्ला देण्याचे टाळत फुकटचे सल्ले मी कोणालाही देत नाही या एका वाक्यात आंबेडकर यांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधला.

Anandraj Ambedkar : फुकटचे सल्ले कोणालाही देत नाही; आनंदराज आंबेडकरांचा मनोज जरांगेंना टोला Read More »

sujay vikhe

Sujay Vikhe: पदासाठी नव्हे, पक्षासाठी काम करा

Sujay Vikhe : भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केवळ पक्षाच्या आदेशाची वाट न पाहता जनतेच्या प्रश्नांवर आणि शासनाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे. पद मिळविण्यासाठी नव्हे, तर पक्षासाठी काम करण्याची मानसिकता प्रत्येक कार्यकर्त्याने ठेवली पाहिजे, असे आवाहन भाजपा प्रदेशउपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार अहिल्यानगर येथे आयोजित भाजपा जिल्हा कार्यकारिणी बैठकीत डॉ. विखे पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबरोबरच शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचे उदाहरण देताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, सरकारने एखादी योजना जाहीर केल्यानंतर केवळ त्याची माहिती देणे पुरेसे नाही. त्या योजनेचा लाभ नेमक्या कोणत्या शेतकऱ्याला मिळाला, हे त्याच्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीही कार्यकर्त्यांनी स्वीकारली पाहिजे.यावेळी त्यांनी आवर्जून शिर्डी विधानसभा मतदारसंघातील गावागावांमध्ये सोसायट्यांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची यादी घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रांसह लाभाची रक्कम नमूद असलेली पत्रे तयार करून ती प्रत्येक लाभार्थ्याच्या घरापर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. “एखाद्या शेतकऱ्याला दीड-दोन लाख रुपयांचा लाभ मिळत असेल, तर हा लाभ कोणामुळे मिळाला याची जाणीव त्याला करून देणे आवश्यक आहे,असे डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले. पक्षाने दिलेली विविध पदे ही केवळ नावापुरती किंवा प्रतिष्ठेसाठी नसून त्यातून पक्षाचे काम झाले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका डॉ. विखे पाटील यांनी मांडली. जिल्हा नियोजन समितीसह विविध पदांवर नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या कार्यक्रमांना आणि कार्यकारिणीच्या बैठकांना गांभीर्याने उपस्थित राहून आपली सक्रियता दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच तालुकाध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, मोर्चांचे पदाधिकारी, सरचिटणीस तसेच बूथस्तरावरील कार्यकर्ते यांचे पक्षासाठीचे योगदान आणि प्रत्यक्ष कामाचे मूल्यमापन झाले पाहिजे. पक्षासाठी वेळ देणाऱ्या आणि स्वतःहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुढे आणण्याची जबाबदारी नेतृत्वाची आहे, असेही त्यांनी सांगितले. भाजपच्या कार्यपद्धतीचा मूलमंत्र ‘राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर आणि मी शेवटी’ हा आहे. मात्र व्यक्तिगत स्वार्थाला पक्षापेक्षा प्राधान्य देण्याची प्रवृत्ती वाढणे योग्य नाही. नेत्यांप्रती वैयक्तिक निष्ठा असली तरी सर्वप्रथम निष्ठा भारतीय जनता पक्षाशी असली पाहिजे, असे डॉ. विखे पाटील यांनी ठामपणे सांगितले मंत्रीपद, पालकमंत्रीपद, आमदारकी, खासदारकी किंवा कोणतेही पद पक्षामुळे मिळते. त्यामुळे आपली पहिली निष्ठा पक्षाशी आणि त्यानंतर नेता किंवा लोकप्रतिनिधीशी असली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, आपल्या राजकीय प्रवासात कार्यकर्त्यांना बळ देण्याला नेहमीच प्राधान्य दिले. स्वतःला एखादे पद मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो; मात्र आपल्या कार्यकर्त्याला पदावर पोहोचविण्यासाठी आपण त्यापेक्षा कमी प्रयत्नातही समाधान मानले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. मी मोठा होण्यापेक्षा माझा कार्यकर्ता मोठा झाला, यातच मला आनंद आहे, असा संदेश देत त्यांनी पदाच्या मागे धावण्यापेक्षा संघटनेत कार्यकर्ते निर्माण करण्याचे आवाहन केले. अहिल्यानगरच्या पाण्याच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच अहिल्यानगर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न मांडताना डॉ. विखे पाटील यांनी डिंबे–माणिकडोह बोगदा, कुकडी कालव्यांचे नूतनीकरण आणि साकलाई योजनेचा उल्लेख केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांतून जिल्ह्याच्या पाण्याच्या प्रश्नाला निर्णायक दिशा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कुकडी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी मोठ्या निधीची तरतूद होऊन निविदा व कार्यादेशाची प्रक्रिया पुढे गेल्याचा उल्लेख करत, आपल्या मुलाबाळांचा आणि आपल्या हक्काच्या पाण्याचा हा प्रश्न आहे. एक पाऊल पुढे टाकले आहे; आता मागे हटायचे नाही,असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. अहिल्यानगर महानगरपालिकेत भाजपचे २५ नगरसेवक निवडून आल्याचा उल्लेख करत डॉ. विखे पाटील यांनी पक्षाची संघटनात्मक ताकद वाढत असल्याचे सांगितले. हीच ताकद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कायम ठेवण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने पूर्ण क्षमतेने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. याच ताकदीने आपण लढत राहिलो तर जिल्हा परिषदेच्या ७५ पैकी ६० जागा भाजपच्या येतील आणि अहिल्यानगर जिल्हा परिषद अध्यक्षपदही भाजपकडे येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकारच्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविणे, जनतेशी सातत्याने संपर्क ठेवणे, कार्यकर्त्यांना सन्मान व बळ देणे आणि पक्षाची संघटनात्मक ताकद तळागाळापर्यंत वाढविणे, या उद्देशाने सर्व पदाधिकाऱ्यांनी काम करण्याचा संदेश या बैठकीतून देण्यात आला. बैठकीस दक्षिण अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दिलीपराव भालसिंग, अहिल्यानगर शहराध्यक्ष अनिलजी मोहिते, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, उपमहापौर धनंजय भैय्या जाधव यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, विविध मोर्चा व आघाड्यांचे प्रमुख आणि भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते ओबीसी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

Sujay Vikhe: पदासाठी नव्हे, पक्षासाठी काम करा Read More »

bharat gogawale

Bharat Gogawale : राज्यात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’? भरत गोगावले म्हणाले, “आता सांगत नाही, नाहीतर …

Bharat Gogawale : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगली आहे. राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी सांगोल्यातील शिवसेना मेळाव्यात बोलताना राज्यात लवकरच आणखी एक ‘ऑपरेशन’ होणार असल्याचे संकेत दिले. मात्र, हे ऑपरेशन नेमके कोणत्या पक्षातील किंवा कोणत्या नेत्यांसंदर्भात आहे, याबाबत त्यांनी स्पष्ट माहिती देणे टाळले. सांगोला येथे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पुढाकाराने शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री भरत गोगावले, मंत्री योगेश कदम, दिपाली सय्यद यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यात बोलताना भरत गोगावले यांनी “एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर करतात. ते कुणाला कळत नाही,” असे सांगितले. त्यानंतर राज्यात लवकरच आणखी एक ऑपरेशन होणार असल्याचे त्यांनी सूचक वक्तव्य केले. मात्र, या ऑपरेशनची माहिती आत्ताच जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला. “लवकरच राज्यात दुसरे एक ऑपरेशन आहे. आता सांगत नाही, नाहीतर मीडिया बातम्या करेल,” असे म्हणत भरत गोगावले यांनी आपले वक्तव्य मध्येच थांबवले. त्यामुळे भरत गोगावले यांनी नेमके कोणत्या राजकीय घडामोडीचे संकेत दिले आहेत? राज्यात पुन्हा कोणते ‘ऑपरेशन टायगर’ होणार आहे? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

Bharat Gogawale : राज्यात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’? भरत गोगावले म्हणाले, “आता सांगत नाही, नाहीतर … Read More »

shahaji bapu patil

Shahaji Bapu Patil : अशोक खरात प्रकरणावर शहाजी बापूंची फटकेबाजी; दिपाली सय्यद यांना थेट सवाल

Shahaji Bapu Patil : अशोक खरातवर आधारित महाराष्ट्राची एल्फिन्स्टन फाईल या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सांगोल्यातील एका कथित पूजेचा प्रसंग समाविष्ट करण्यात आला आहे का? असा थेट सवाल माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी अभिनेत्री दिपाली सय्यद यांना केला. सांगोला येथे शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मंत्री भरत गोगावले, मंत्री योगेश कदम आणि दिपाली सय्यद यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शहाजी बापू पाटील यांनी आपल्या खास शैलीत अशोक खरात वर टीका करत सांगोल्यात घडलेल्या कथित पूजेचा किस्सा सांगितला. शहाजी बापू पाटील यांच्या म्हणण्यानुसार, अशोक खरातने सांगोला तालुक्यात येऊन कथितरित्या उघड्या-नागड्या पद्धतीने धिंगाणा घालत पूजा केली होती. ही पूजा माझा भाचा अतुल पवार यांचा निवडणुकीत पराभव व्हावा आणि त्यांना जीवे मारण्याचा अनिष्ट प्रकार घडावा, या उद्देशाने करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी शहाजी बापूंनी अतुल पवार यांना आपण दिलेला धीर सांगत, “तुझा मामा या महाराजाच्या बापाचा बाप आहे. तू मरत नाहीस, काळजी करू नको,” अशा आपल्या खास शैलीतील वक्तव्याचा उल्लेख केला. दरम्यान, अशोक खरात यांच्यावर आधारित चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सांगोल्यातील या कथित पूजेचा प्रसंग दाखवण्यात आला आहे का, असा सवाल शहाजी बापूंनी दिपाली सय्यद यांना केला. या मुद्द्यावरून त्यांनी माजी आमदार दीपक साळुंखे यांनाही आपल्या खास शैलीत टोला लगावला. या संपूर्ण प्रकारावर शहाजी बापू पाटील यांनी केलेली फटकेबाजी मेळाव्यात चर्चेचा विषय ठरली.

Shahaji Bapu Patil : अशोक खरात प्रकरणावर शहाजी बापूंची फटकेबाजी; दिपाली सय्यद यांना थेट सवाल Read More »

donald trump

Donald Trump : इराणच्या ‘पिकॅक्स माउंटन’वर लवकरच हल्ला? ट्रम्प यांचा थेट इशारा

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. इराणमधील अत्यंत सुरक्षित आणि भूमिगत ‘पिकॅक्स माउंटन’ अणुस्थळावर अमेरिका लवकरच हल्ला करू शकते, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी अमेरिकन लष्कर या ठिकाणाला “लवकरच” लक्ष्य करू शकते, असे संकेत दिले. इराणला अण्वस्त्र विकसित करण्यापासून रोखणे हा अमेरिकेच्या लष्करी कारवाईमागील प्रमुख उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पिकॅक्स माउंटन इतके महत्त्वाचे का? ‘पिकॅक्स माउंटन’ हे इराणमधील नतांझ अणुस्थळाजवळील डोंगराळ भागात असलेले अत्यंत मजबूत भूमिगत संकुल आहे. या ठिकाणी खोलवर बोगदे तयार करण्यात आले असून, त्यामुळे पारंपरिक हवाई हल्ल्यांपासून या परिसरातील सुविधा सुरक्षित राहू शकतात. अमेरिका आणि इस्रायली गुप्तचर यंत्रणांना संशय आहे की इराणने आपल्या अणुकार्यक्रमाशी संबंधित संवेदनशील उपकरणे किंवा सेंट्रीफ्यूज या भूमिगत ठिकाणी हलवले असावेत. मात्र, या ठिकाणी नेमके कोणते साहित्य किंवा उपकरणे आहेत, याबाबत पूर्णपणे स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता पिकॅक्स माउंटनवर अमेरिकेने प्रत्यक्ष हल्ला केल्यास अमेरिका-इराण संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. हे ठिकाण अत्यंत खोलवर असल्याने हल्ल्याचा परिणाम किती होईल, याबाबत लष्करी तज्ज्ञांमध्येही मतभेद आहेत. काही तज्ज्ञांच्या मते, हल्ल्यामुळे प्रवेशमार्ग बाधित होऊ शकतात मात्र भूमिगत मुख्य भाग पूर्णपणे नष्ट करणे आव्हानात्मक ठरू शकते. दरम्यान, इराणच्या अणुकार्यक्रमावरून अमेरिका आणि इराणमधील तणाव कायम असून, पिकॅक्स माउंटनवरील ट्रम्प यांचा ताजा इशारा या संघर्षातील पुढील मोठ्या लष्करी कारवाईचे संकेत मानला जात आहे.

Donald Trump : इराणच्या ‘पिकॅक्स माउंटन’वर लवकरच हल्ला? ट्रम्प यांचा थेट इशारा Read More »