Satyajeet Tambe : जनतेने आम्हाला काम करण्याचा कौल दिला आहे. तुम्ही फक्त उद्घाटनं करत बसा, काम मात्र आम्ही करणार. श्रेयाची आम्हाला गरज नाही; श्रेय कोणीही घ्या. ज्या विश्वासाने संगमनेरकरांनी आमच्यावर जबाबदारी टाकली आहे, ती पार पाडल्याशिवाय राहणार नाही,” असा स्पष्ट संदेश आमदार सत्यजीत तांबे यांनी दिला. संगमनेर नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा कार्यक्रम नगरपरिषद प्रांगणात बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नातून उत्साहात पार पडला. यावेळी तांबे बोलत होते.
या कार्यक्रमास बाळासाहेब थोरात, कार्यक्रमाध्यक्ष डॉ. सुधीर तांबे, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई मालपाणी, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, कैलासराव लोणारी, अरुणराव वाकचौरे, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नूरमोहम्मद शेख, मुख्याधिकारी दयानंद गोरे यांसह नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
आमदार तांबे यांनी यावेळी संगमनेर 2.0’ च्या माध्यमातून शहराच्या विकासाचा नवा टप्पा सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला. शहरात पाणी उपलब्ध असले तरी काही भागात कमी दाबाने किंवा अशुद्ध पाणी येते. त्यामुळे २० ते २५ वर्षे जुन्या पाणीपुरवठा पाइपलाइन बदलणे, पाण्याचा दाब व गुणवत्ता सुधारणे, भूमिगत वीजवाहिन्या, भुयारी गटार आणि दर्जेदार रस्त्यांवर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विकासासाठी निधी आणण्यावर भर
राज्य शासनाकडून पूर्वीच्या तुलनेत योजनांमध्ये नगरपालिकेचा वाटा वाढला असून काही योजनांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत स्थानिक स्वनिधी उभारावा लागतो, असे तांबे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, उत्पन्न वाढविणे आणि खर्च कमी करणे हा महत्त्वाचा अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले.
शहराच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांच्या म्युनिसिपल बाँडची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून क्रेडिट रेटिंगही करण्यात आले आहे. संगमनेर नगरपालिकेने यापूर्वीही बाँडच्या माध्यमातून निधी उभारला असल्याची जुनी कागदपत्रे मिळाल्याचे त्यांनी सांगितले. नगरपालिकेचे दरमहा सुमारे ४० लाख रुपयांचे वीजबिल येत असल्याने खर्च कमी करण्यासाठी मोठा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. पुढील वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण करून वीजबिल चार-पाच लाखांच्या आसपास आणण्याचा प्रयत्न असल्याचे तांबे यांनी सांगितले.
200 सीसीटीव्ही आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष
शहराच्या सुरक्षेसाठी २०० सीसीटीव्ही कॅमेरे आणि ११ ठिकाणी सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा उभारण्यात आली आहे. नगरपालिकेत अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात आला असून त्यातून शहरातील कॅमेऱ्यांवर लक्ष ठेवता येणार आहे. पोलीस व रक्षक दलालाही या व्यवस्थेचा थेट उपयोग होणार आहे. महिलांची व मुलींची सुरक्षा हा निधी वापरण्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे तांबे यांनी सांगितले.
या कामासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे त्यांनी आभार मानले.
शहरातील रस्त्यांच्या तक्रारींची दखल घेत पुढील वर्षभरात टप्प्याटप्प्याने सर्व रस्ते दर्जेदार करण्याचे आश्वासन तांबे यांनी दिले. प्रत्येक रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतंत्र सेवानिवृत्त अभियंत्यामार्फत थर्ड पार्टी क्वालिटी तपासणी करण्यात येणार आहे.
शहरातील छोट्या व्यावसायिकांना सुरक्षित व स्वच्छ जागा मिळावी यासाठी ११ ते १२ ठिकाणी फूड कोर्ट उभारण्याचे नियोजन आहे. दोन अधिकृत भाजी मार्केट सुरू करण्यात आले असून त्यापैकी एका ठिकाणी सुमारे १०० व्यापारी व शेतकऱ्यांना जागा उपलब्ध होणार आहे. ऑक्टोबरपासून नवीन कचरा व्यवस्थापन व्यवस्था सुरू होणार असून धूळमुक्त संगमनेर करण्यासाठी आधुनिक मशीनरी वापरण्यात येणार आहे.
तसेच, महिला रुग्णालयाच्या प्रलंबित कामासाठी नगरपालिकेने बांधकामाची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शविली आहे. शासनाने डॉक्टर, औषधे, एमआरआय, एक्स-रे आदी आवश्यक वैद्यकीय साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याचे तांबे यांनी सांगितले.
नियोजनातून शहराचा विकास करा- बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात यांनी शहराच्या विकासासोबत स्वच्छता, अतिक्रमण आणि योग्य नियोजनावर भर दिला. रस्ता तयार केल्यानंतर पुन्हा तो खोदण्याची वेळ येऊ नये, यासाठी सर्व विभागांचे आधीच नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली. छोट्या व्यावसायिकांना पर्यायी व्यवस्था देऊन शहर अधिक शिस्तबद्ध व सुंदर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी मागील आठ महिन्यांतील कामांचा आढावा घेत २०० सीसीटीव्ही, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, फूड कोर्ट, भाजी मार्केट, स्वच्छता मोहीम, रक्षक दल आणि प्राणी नियंत्रण केंद्र याबाबत माहिती दिली. शहरात अडीच ते तीन हजार झाडांची लागवड केल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी गणेशोत्सवासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.






