Nitesh Rane : विश्व हिंदू परिषदेने घेतलेल्या भूमिकेवरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. विश्व हिंदू परिषदेची भूमिका हा राजकीय नव्हे, तर धार्मिक विषय असल्याचे सांगत राणे यांनी हिंदू सणांबाबतच नियम आणि आव्हाने का दिली जातात, असा सवाल केला. तसेच डीजे, मराठा आरक्षण, राज ठाकरे यांचे GDP वरील वक्तव्य आणि दिशा सालियन प्रकरणावरही त्यांनी भाष्य केले.
‘विश्व हिंदू परिषदेची भूमिका धार्मिक, राजकीय नाही’
विश्व हिंदू परिषदेने घेतलेली भूमिका ही राजकीय नसून धार्मिक विषयाशी संबंधित असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. एखाद्या भूमिकेवर कोणी टीका केली म्हणून तो राजकीय विषय ठरत नाही, असेही ते म्हणाले.
“ईदचा सण झाला. जे इस्लाम धर्माला मानतात, त्यांच्यात कोणत्याही हिंदूला सहभागी होण्याची परवानगी नाही. मग हिंदू धर्मात अशी परवानगी कशी असेल?” असा सवाल राणे यांनी केला. विश्व हिंदू परिषदेने कोणत्याही धर्माला डिवचण्यासाठी ही मागणी केलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, हिंदू सणांच्या वेळीच नियम आणि सूचना का दिल्या जातात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
“सगळी आव्हानं फक्त हिंदूंनाच का? गणेश चतुर्थीच्या वेळी चपला मारू नका, अंडी मारू नका, असा सल्ला मुल्ला-मौलवी का देत नाहीत? आम्हालाच का सगळे सल्ले? यांना का नाही? हिंमत असेल तर ईदच्या अगोदर बोलून दाखवा,” असे राणे म्हणाले. सनातन धर्माला टार्गेट करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत, “बाळासाहेब ठाकरे बोलण्याची हिंमत करायचे,” असे म्हटले.
‘डीजेचा त्रास असेल तर ईदच्या मिरवणुकीतही बंद करा’
गणेशोत्सवातील डीजेच्या मुद्द्यावरूनही नितेश राणे यांनी भूमिका मांडली. डीजेमुळे नागरिकांना त्रास होत असेल तर सर्व धर्मांच्या मिरवणुकींसाठी समान नियम असायला हवेत, असे ते म्हणाले. “डीजे ईदला वाजत नाही का? मुख्यमंत्र्यांच्या सरकारची भूमिका स्पष्ट आहे. सांस्कृतिक पद्धतीने सण साजरा करा. पण डीजेमुळे त्रास होत असेल तर ईदच्या मिरवणुकीतही डीजे बंद करा,” असे राणे म्हणाले.
आमच्या धर्मात कोणालाही त्रास देण्याचे कुठेही लिहिलेले नाही, असे सांगत डीजेबाबत सर्वांसाठी समान नियम असण्याची मागणी त्यांनी केली.
रस्त्यावर होणाऱ्या नमाजाबाबत आणि ईदच्या मिरवणुकांबाबतही हाच नियम लागू असायला हवा, असे राणे म्हणाले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात समानतेचा विचार मांडला आहे. हे सर्वच हिंदू धर्म मानतो. मग इतर धर्मांसाठी वेगळे नियम का? कायदा सर्वांसाठी समान असायला पाहिजे,” असे त्यांनी म्हटले.
मराठा आरक्षणावर सरकार सकारात्मक
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना नितेश राणे यांनी राज्य सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले. “सर्व जातींना समान न्याय देण्याची जबाबदारी आमची आणि महायुतीची आहे. हिंदू समाजाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व जातींचा विचार आमचे सरकार नक्कीच करेल,” असे राणे म्हणाले.
यावेळी त्यांनी एका नेत्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत, “त्यांच्या मालकाला सांगायला पाहिजे की, संध्याकाळच्या कार्यक्रमाला जाऊ नका. सकाळी तुम्ही गुजराती समाजाबद्दल बोलता आणि तुमच्या मालकाचा मुलगा संध्याकाळी गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला जातो,” असा टोला लगावला.
राज ठाकरे यांच्या GDP वक्तव्यावर राणेंचा टोला
राज ठाकरे यांनी GDP संदर्भात केलेल्या वक्तव्यावरही राणे यांनी टीका केली. “GDP आणि ठाकरेंचा काय संबंध आहे?” असा सवाल करत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर उपरोधिक टिप्पणी केली. “GDP चा फुल फॉर्म सांगायचा असेल, तर त्यांच्याच भाषेत सांगतो कॅमेरा बंद करा,” असे म्हणत राणे यांनी आपली भूमिका मांडली.
दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंना सवाल
दिशा सालियन प्रकरणावरूनही नितेश राणे यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आदित्य ठाकरे या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे सांगत असतील, तर त्यांच्या वकिलांनी या प्रकरणात प्रतिज्ञापत्र (अॅफिडेव्हिट) का केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “आदित्य ठाकरे म्हणतात की, माझा या केसशी संबंध नाही. मग त्यांच्या वकिलांनी अॅफिडेव्हिट का केलं? महाविकास आघाडीच्या काळात लपवालपवी का झाली? जर तुमचा या प्रकरणाशी संबंध नाही, तर तुमच्या वकिलांना सांगा ते कोर्टात का उपस्थित राहतात?” असा सवाल राणे यांनी केला.
दिशा सालियन प्रकरणात महाविकास आघाडी सरकारच्या काळात लपवालपवी झाल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.






