Ambadas Danve : मुंबई पोलीस विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत त्या संभाषणाचा पेनड्राइव्हच सभापतींकडे सादर केला.
बेटिंग करणाऱ्यांमध्ये मेहुल जैन, कमलेश जैन आणि हिरेन जैन या व्यक्तींचा समावेश असून त्यांच्याकडून पाकिस्तानी खेळाडूंचा यासाठी वापर केला जात असल्याचा गंभीर आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉपी मध्ये लोटस 24 नावाच्या ऍपच्या माध्यमातून बेटिंग केल्यानंतर आता या सर्व व्यक्ती मुंबईत आयपीएल साठी आल्याची माहिती दानवे यांनी अंतिम आठवडावरील प्रस्तावावरील भाषणात सभागृहाला दिली.
राज्याच्या परिवहन, सिडको, महसूल, आरोग्य विभागातील घोटाळे, मंत्र्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, अधिकाऱ्यांचे घोटाळे सादर करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारचे वाभाढे काढले. तसेच राज्यातील आर्थिक स्थिती रसातळाला जात असल्याचे म्हणत दानवे यांनी सरकारच्या कार्यपध्दतीवर निषेध व्यक्त केला.
राज्याने गेल्या दोन वर्षांपासून क्राईम इन महाराष्ट्र अहवाल प्रसिध्द केला नाही. राज्यात 564 विविध गुन्हे दाखल झाले असून दंगलीच्या घटना घडल्या आहेत. नागपुर, पुणे,संभाजीनगरमध्ये बलात्कराच्या घटनांचा आलेख वाढला असून दररोज 22 बलात्कार, 45 विनयभंगाच्या घटना घडत आहेत. कायद्याचा धाक नसल्यामुळे या सर्व घटना घडत असल्याचे दानवे म्हणाले. सरकारने सुरु केलेले मिशन शक्ती अभियानात आतापर्यंत 22 टक्के रक्कम खर्च झाली असून ही दुर्देवी बाब असल्याचेही ते म्हणाले.
कारागृहाची बंदीची क्षमता 27 हजार 114 बंदी असताना 43 हजार बंदी कोंबून ठेवले आहेत. राज्यात 51 हजार कोटी रुपयांची फसवणूकीच्या घटना घडल्या आहेत. राज्यात गुन्हयांच व सायबर गुन्ह्याच प्रमाण वाढल असून ते रोखण्यासाठी सायबर सेल प्रभावी होण्याची आवश्यकता आहे.
अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसून चोरी करून त्याला मारण्याचा प्रयत्न झाला. बीड मस्साजोग सरपंच हत्येतील आरोपी अद्याप पकडला जात नाही. सोमनाथ सुर्यवंशी याचा मृत्यू मानव आयोगाच्या अहवालात पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले. मंत्र्यांचा परदेशात चाललेल्या मुलाच विमान वळवलं जातं परंतु सूर्यवंशीला मारहाण करणाऱ्या लोकांवर सरकार कारवाई करू शकत नाही अशा शब्दांत दानवे यांनी नाराजी व्यक्त केली.
अहमदाबादमधील सुधीर कोठडिया नावाच्या व्यक्तीने 2 हजार कोटी रुपये डिजिटल पध्दतीने जमवून हवाला मार्फत ते विदेशात पाठवले. यातील गुंतवणूकदारांची फसवणूक केली, याबाबत पराग अशोककुमार शहा यांनी तक्रार केली. मात्र याबाबत पुणे कि नारायण गावात गुन्हा दाखल व्हायला होता मात्र ठाण्यात पोलीस उपायुक्तांच्या सांगण्यावरून पोलीस आयुक्त गुन्हा दाखल करतात. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी दानवे यांनी केली.
सिडको योजनेतील खरपुडीची 247 हेक्टर क्षेत्र जमीन शेतकऱ्यांकडून सतीश अग्रवाल, कृष्णकुमार गोयल, राधेश्याम, चिप्पा रखमाजी आदींनी विकत घेतली. 18 जून 2008 ला हे प्रदूषित क्षेत्र म्हणून घोषित केले त्यानंतर आर्थिक साहाय्यता नसल्यामुळे हा प्रकल्प रद्द केला होता. यात सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल यांनी डी एसके लीगल सर्व्हिसेसची अवैध नेमणूक करून देयके दिल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चौकशीची मागणी केली.
मंत्री संजय राठोड यांचे खासगी सचिव विशाल राठोड यांनी स्वत:च्या सहीने गो बंजारा ट्रस्टची जागा मंत्र्याच्या नावे करून घेतली. उल्हास नगर महानगरपालिकेत युडीच उल्लंघन करून टीडीआर घोटाळा झाला आहे. यात ललित खोब्रागडे नावाच्या अधिकाऱ्याने युडीसिपीआर उल्लंघन केल्याचा गंभीर आरोपही दानवे यांनी केला.
अंधेरी, के पश्चिम विभागातील चक्रपाणी नावाचे उपायुक्तांच्या वरदहस्ताने अवैध बांधकाम सुरु आहे. बोरिवली येथील पालिकेचे भगवतीचे हॉस्पीटलचे खासगीकरण करण्याचं प्रयत्न महापालिका करतेय.
शत्रू संपत्तीबाबत पाकिस्तानच्या बॉंड वर आपल्याकडे कारवाई झाली. याबाबत मीरा भाईंदरच्या राजू शहा यांनी तक्रार केली असता, त्याला पाकिस्तान मधून धमकीचे फोन येत असल्याची माहितीही दानवे यांनी सभागृहात दिली.
परिवहन विभागाने वाहतूक स्पीडवर मीटर मर्यादा निर्बंधाचा उल्लेख केला पाहिजे. वाहतूक स्पीडवर वेग नियंत्रक असले पाहिजे, त्यावर परिवहन विभाग लक्ष देत नाही. बेस्ट, टीएमटी, एनएमटीच्या बस धावत असलेल्या मार्गावर सिटी फ्लोच्या बसेस धावतात, त्यामुळे सार्वजनिक वाहतूकीच्या बसेसवर बंधन येतात, त्यामुळे सीटी फ्लोच्या बसेस बंद करण्याची मागणी दानवे यांनी केली.
भोसरी एमआयडीसीत खुल्या जागेवर 150 शेड अवैधरित्या उभारले गेले. यासाठी विकी गोयल या व्यक्तीने बनावट कागदपत्रे बनवली. संभाजी नगरमध्ये हॉकी मैदानासाठी आलेले 21 कोटी रुपये संजय सबनीस व सुहास पाटील या अधिकाऱ्यांनी कंत्राटी कामगार हर्षकुमार क्षीरसागर यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करून गैरव्यवहार केला.
रोहयोमध्ये पालघर येथे निवृत्त अधिकारी नंदकुमार यांच्यासाठी मिशन महासंचालक पद निर्माण केलं, त्यासाठी केंद्राने यावर आक्षेप घेतल गेले.
मुंबईत आकाश ग्राहक नावाची संस्था नवीनचंद्र चालवितात आणि ते तांदळावर पॉलिश करून परराज्यात विकतात. त्यासाठी त्यांनी खोटी कागदपत्रे सादर करुन मुंबई, ठाणे जिल्हा विभाग असा उल्लेख करून शासनाची दिशाभूल केली. आता कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र दाखवल आहे, त्यामुळे याची चौकशी करण्याची मागणीही दानवे यांनी केली आहे.
आरोग्य विभागात बनावट औषधांचा पुरवठा झाला. तत्कालीन आरोग्य मंत्री यांनी यांत्रिक पध्दतीने स्वच्छता करण्याच्या निविदेसाठी ७७ कोटी रुपये खर्च येणार असताना ६६८ कोटी रुपये दाखवून गैरव्यवहार केल्याचा आरोप दानवे यांनी केला.
मुंबई ठाण्यातील हॉटेलमध्ये रुफ टॉपवर विदेशी दारू पुरविणे सुरु आहे. लीव्हीन लिक्वीड नावाची कंपनी त्यांच्या ऍपवर विदेशी दारू घर पोहच करून नियमाच उल्लंघन करतेय , त्यामुळे फोरेन लिकर बॉंडचे धोरण सरकारने स्पष्ट करण्याची मागणीही दानवे यांनी केली आहे.
जलसंपदा विभागातील अधिकारी जलसंधारणमध्ये घेतले जातात, यामुळे या विभागातील अभियंतांवर अन्याय होतो.
औरंगजेबच्या कबरीच्या देखभालीसाठी साडेसहा लाख रुपये तर सिंधुदूर्गमधील शिवरायांच्या मंदिरांच्या देखभालीसाठी 250 रुपये येतात. नागपूरमध्ये झालेल्या दंगलीचा उल्लेख करताना दानवे यांनी इतर धर्मांचाही मान राखला पाहिजे असे म्हणत हिंदूत्वादी म्हणणाऱ्या सरकारला सुनावले.