Yogesh Kadam : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान भवन आवारात पत्रकारांशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्यावर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. “कुणाल कामराचं लोकेशन आम्ही ट्रेस करतोय. जो कोणी कायदा हातात घेईल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असं कदम यांनी ठणकावून सांगितलं. संविधानाने बोलण्याचा अधिकार दिला असला तरी संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींवर टीका करणं योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
ठाकरे गटावरही निशाणा साधताना ते म्हणाले, “ठाकरे गटाने कायदा आणि सुव्यवस्था आम्हाला शिकवू नये. राज्यात शांतता राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
कुणाल कामरा याने अलीकडेच सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतल्याचं दिसत आहे. कदम यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून, काहींनी याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचा आरोप केला आहे. तर काहींनी सरकारच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. कुणाल कामराने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही या मुद्द्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, “एकनाथ शिंदेंचं कर्तृत्व मोठं आहे. व्यंगात्मक टीका ही ठाकरेंची ताकद होती, पण आता त्यांचे कार्यकर्ते असतील तर याकडे दुर्लक्ष करायला हवं. राजीव गांधींबद्दल एका सिरीजमध्ये काही बोललं गेलं तेव्हा राहुल गांधी म्हणाले होते की त्यांचं कर्तृत्व छोटं होत नाही. कलाकार काही बोलला म्हणून त्याचं ऑफिस फोडणं चुकीचं आहे.” पवार यांनी पुढे सावधगिरीचा इशारा देताना म्हटलं, “2014, च्या आधीचा काळ आता नाही. एखाद्या नेत्यावर बोलताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मर्यादित झालं आहे, त्यामुळे काळजी घ्यावी. व्यंगात्मक टीकेमुळे एकनाथ शिंदेंची उंची कमी होत नाही.”
या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. पुढील घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.