Rohit Pawar: राज्यातील राजकारणात एक मोठा खळबळजनक प्रकार समोर आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी थेट मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करत मोठा पर्दाफाश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पवार हे गोरे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्याच्या तयारीत होते. मात्र आता त्यांनी गोरे यांच्या कथित गैरकारभाराची सविस्तर माहिती देत त्यांच्या कारभारावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मातंग समाजाला न्याय मिळण्यात अडथळा
रोहित पवार यांनी सांगितले की, “मी सुरुवातीपासून महिलेला न्याय मिळावा यासाठी प्रयत्नशील होतो. मात्र, मंत्री गोऱ्हे हे मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन दबाव आणण्याचे काम करत आहेत.” पवार यांनी असा धक्कादायक आरोप केला की, गोरे यांनी त्यांच्या भागातील कॉलेजला रस्ता मिळावा यासाठी मातंग समाजातील मृत व्यक्तीचे खोटे आधार कार्ड तयार करून त्याला जिवंत दाखवले. या मृत व्यक्तीचे नाव पिराजी भिसे असून, त्यांचा मृत्यू 8 ऑक्टोबर 2016 रोजी झाला होता. भिसे यांच्या कुटुंबाने याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली असून सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
खोट्या सहीने जमीन हडप करण्याचा आरोप
“पिराजी भिसे यांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांचे खोटे कागदपत्र तयार करण्यात आले. भिसे हे अंगठा लावत असताना त्यांच्या नावावर तोतयाने सही केली. ही गंभीर फसवणूक असून यामुळे अॅट्रॉसिटी कायद्याचाही भंग होतो. एवढ्या गंभीर प्रकारानंतरही गोरे यांना जामीन मिळाला,” असा आरोप पवार यांनी केला. विशेष म्हणजे, ज्या न्यायाधीशाने गोरे यांना जामीन दिला, त्यांना उच्च न्यायालयाने डिमोट केल्याचेही पवार यांनी सांगितले.
कोरोना काळातील योजनांचा गैरवापर
या प्रकरणात आणखी गंभीर बाब उघड करत रोहित पवार म्हणाले, “गोरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्याचा फोटो वापरून कॉलेज रजिस्टरसाठी कागदपत्रे तयार केली. कोविड काळात सामान्य माणूस बाहेर फिरू शकत नव्हता. याच काळाचा फायदा घेत गोरे यांनी आपल्या फायद्यासाठी कॉलेज रजिस्टर केलं.” तसेच “मायनी मेडिकलमध्ये 3 कोटी 25 लाख रुपयांची अनियमितता झाली असून, हे मेडिकल देशमुख कुटुंबाशी संबंधित आहे, ज्यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली होती,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
गोरे यांना मोठ्या ताकदीचा पाठिंबा असल्याचा दावा
या संपूर्ण प्रकरणात गोरे यांच्या पाठीमागे मोठ्या ताकदीचा पाठिंबा असल्याचा दावा करत रोहित पवार म्हणाले, “देवा भाऊ त्यांच्या पाठीशी आहेत, म्हणूनच ते वाचत आहेत. पण पाठीशी कितीही मोठी शक्ती असली, तरी आम्ही न्यायासाठी लढत राहू.” तसेच या प्रकरणात पूर्ण पारदर्शकता यावी आणि सत्य बाहेर यावे, यासाठी आपला लढा सुरूच राहील, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
राजकीय वर्तुळात खळबळ
या आरोपांमुळे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता या प्रकरणाची चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रिया कोणत्या वळणावर जाते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रोहित पवार यांनी केलेले आरोप जर खरे ठरले, तर गोऱ्हे यांच्यासह संबंधितांवर मोठी कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.