DNA मराठी

Sujay Vikhe : सरकारी योजनांचा लाभ केवळ अनुदानापुरता मर्यादित ठेवू नका, प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी निर्माण करा

sujay vikhe

Sujay Vikhe : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन सर्वसामान्य कुटुंबांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज आहे. केवळ योजनांमधून मिळणारे अनुदान, साहित्य किंवा आर्थिक मदतीपुरते समाधान न मानता, शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कौशल्य प्रशिक्षणाचा उपयोग करून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करा. प्रशिक्षण घेतल्यानंतरही घरी बसून राहू नका. रोजगाराची मागणी करणाऱ्या प्रशिक्षित युवकांना काम मिळवून देण्याची जबाबदारी मी स्वीकारतो, अशी ग्वाही भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

पुणतांबा येथे आयोजित महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने आयोजित कौशल्य वृद्धीकरण प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार केवळ प्रमाणपत्रांचे वाटप करत नाही, तर योजनांचा प्रत्यक्ष लाभ लाभार्थ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहे. बांधकाम कामगारांना प्रमाणपत्रांचे ऑनलाइन वितरण पूर्ण झाल्यानंतर संबंधित कामगारांच्या खात्यावर प्रत्येकी चार हजार दोनशे रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, या आर्थिक मदतीबरोबरच कामगारांनी शासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या प्रशिक्षणाचा उपयोग करून स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

पुढे बोलताना म्हणाले शिर्डी आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक तसेच पायाभूत विकासाची कामे सुरू आहेत. एमआयडीसीच्या माध्यमातून उद्योग उभे राहत आहेत. शिर्डीमध्ये सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांच्या खर्चातून विकासकामे होत असून, जवळपास पन्नास कोटी रुपये खर्चून क्रीडांगणाची उभारणी केली जात आहे. याशिवाय अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. त्यामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र, या संधींचा लाभ स्थानिक तरुणांनी घेतला पाहिजे.

महिला आणि पुरुषांनीही कुटुंबाच्या आर्थिक जबाबदारीत समान सहभाग घेतला पाहिजे. केवळ महिलांनी घरकाम करावे आणि पुरुषांनीच रोजगारासाठी बाहेर पडावे, अशी मानसिकता बदलण्याची गरज आहे. कुटुंबाच्या प्रगतीसाठी दोघांनीही एकत्रितपणे प्रयत्न केले, तरच तालुक्याचे भविष्य उज्ज्वल होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य शासनाच्या योजनांचा उल्लेख करताना डॉ. विखे पाटील यांनी मोफत वीज, लाडकी बहीण योजना, दुष्काळी मदत आणि जलसिंचनाच्या कामांचा संदर्भ दिला. राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर राहाता तालुक्याचाही त्यामध्ये समावेश करण्यात आला. दिवाळीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाच हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. याशिवाय निळवंडे धरणाचे पाणी परिसरात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले.

महाराष्ट्रातील इतर भागांत दुष्काळाची परिस्थिती असली, तरी राहाता तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संकल्प केला आणि त्यादृष्टीने काम केले. पाणी, वीज रोजगाराच्या प्रश्नांवर सरकारने केलेल्या कामांचा लाभ जनतेने घेतला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

जात-पात बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर एकत्र या तसेच समाजातील जातीय आणि धार्मिक भेदांवर भाष्य करताना डॉ. विखे पाटील यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली. दुष्काळ पडतो तेव्हा तो कोणत्याही एका जातीसाठी पडत नाही. समाजातील नागरिक असोत, पाण्याची गरज सर्वांनाच असते. निसर्गाला जात माहीत नसते. त्यामुळे समाजाच्या विकासाचा विचार करताना जात आणि धर्मापेक्षा कौशल्य, गुणवत्ता आणि कर्तृत्वाला महत्त्व मिळाले पाहिजे.

राजकीय मतभेद असू शकतात; मात्र सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सर्वांनी एकत्र आले पाहिजे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना किंवा अन्य कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असला, तरी दुष्काळ आणि सामान्य माणसाच्या अडचणी सर्वांसाठी सारख्याच आहेत. राजकारण कुठपर्यंत करायचे आणि जनहिताच्या प्रश्नांवर कुठे थांबायचे, हे समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

श्रीमंतांनी स्वस्त धान्याचा लाभ सोडून गरिबांना संधी द्यावी स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेतील गैरप्रकारांवरही त्यांनी लक्ष वेधत आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या आणि चारचाकी वाहने, बंगले असलेल्या कुटुंबांकडूनही स्वस्त धान्याचा लाभ घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले. याउलट दुसरीकडे झोपडपट्टीत आणि पत्र्याच्या घरात राहणाऱ्या गरजू कुटुंबांना पुरेसे धान्य मिळत नाही, ही गंभीर बाब असून ज्यांना आर्थिकदृष्ट्या धान्य खरेदी करणे शक्य आहे, अशा कुटुंबांनी स्वतःहून स्वस्त धान्य योजनेचा लाभ सोडून तो खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आपण स्वतः अशा प्रकारे सुमारे ८० हजार अपात्र लाभार्थ्यांची नावे कमी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा विखे पाटील कुटुंबाचा इतिहास शिर्डी नगरपरिषदेचा प्रश्न, निळवंडे धरणाचे पाणी, साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांचा कायमस्वरूपी सेवेचा प्रश्न आणि परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा विषय अशा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांचा उल्लेख करत त्यांनी हे प्रश्न प्रत्यक्ष प्रयत्नांतून मार्गी लावल्याचे सांगितले.

केवळ आश्वासनांच्या जोरावर मत मागण्याचे दिवस आता संपले आहेत. जनतेच्या प्रश्नांवर काम करून दाखवावे लागते. गावातील राजकीय वाद आणि मतभेद बाजूला ठेवून गरिबांना घरकुल मिळावे, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत. गावातील एकही गरीब कुटुंब घरापासून वंचित राहू नये, यासाठी पुढील वर्षभरात नियोजन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून पुणतांबा गावात अत्याधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्स तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या साठी निधी मंजूर झाला असून या जागेची पाहणी ग्रामस्थांच्या उपस्थिती डॉ विखे यांनी केली. यावेळी पुणतांबा भाजपा महायुतीचे पदाधिकारी तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *