DNA मराठी

MPSC Group-C अर्जासाठी विद्यार्थ्यांची धावपळ; ई-मेलवर OTP येत नसल्याने नोंदणी प्रक्रियेत अडथळे

mpsc

MPSC Group-C : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) Group-C परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार समोर आली आहे. परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी नवीन खाते (Account) तयार करताना नोंदणीकृत ई-मेलवर OTP येत नसल्याने अनेक विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. वारंवार प्रयत्न करूनही OTP प्राप्त होत नसल्याने अर्जाची पुढील प्रक्रिया पूर्ण करायची कशी, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.

MPSC Group-C परीक्षेसाठी अर्ज करण्याकरिता नवीन खाते तयार करणे आवश्यक आहे. मात्र, खाते तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यान ई-मेलवर OTP पाठवला जात नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे, एकाच ई-मेलवर वारंवार प्रयत्न करूनही OTP येत नसल्याने काही विद्यार्थ्यांनी नवीन ई-मेल आयडी वापरूनही प्रयत्न केले. तरीदेखील त्यांना यश आलेले नाही.

या संदर्भात विद्यार्थ्यांनी आयोगाच्या अधिकृत ई-मेलवर तक्रार केली असता, ई-मेलमधील Spam फोल्डर तपासण्याचा सल्ला दिला जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. मात्र, Inbox, Spam आणि Trash यांसह सर्व फोल्डर तपासूनही OTP मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे. जवळपास ५० वेळा प्रयत्न करूनही समस्या सुटत नसल्याने विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात असून अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे, ही अडचण केवळ एका विद्यार्थ्यापुरती मर्यादित नसून अनेक MPSC उमेदवारांना याच समस्येला सामोरे जावे लागत असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीतील तांत्रिक त्रुटी दूर करण्याची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, MPSC प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन ई-मेलवर OTP मिळण्यातील अडथळा दूर करावा, तसेच तांत्रिक अडचणींमुळे कोणत्याही पात्र विद्यार्थ्याचे अर्ज भरण्याचे नुकसान होऊ नये, यासाठी आवश्यक मुदतवाढ किंवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *