Navale Bridge : मुंबई-बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ सोमवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात एका डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. सीमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी सांगितले की, रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास नवले पुलाच्या उतारावरून येत असताना सीमेंट ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रकने पुढे जाणाऱ्या वाहनांना धडक दिली. या दुर्घटनेत दुचाकीवरून जात असलेल्या डिलिव्हरी बॉयला जोरदार धडक बसली. गंभीर जखमी झालेल्या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात दाखल केले. ट्रक चालकही या अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून अपघाताचे नेमके कारण आणि ब्रेक निकामी होण्यामागील तांत्रिक बाबींचा तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे नवले पुलावरील अवजड वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.






