Ashadhi Wari Palkhi : आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजने’अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्याला ३ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून विश्वगुरू संत निवृत्ती महाराज, संत श्री एकनाथ महाराज, श्री संत निळोबाराय महाराज व श्री ज्ञानेश्वर आषाढी वारी पालखी (नेवासा) यांच्याबरोबरच अन्य पालख्याही पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी तात्पुरती शौचालये, स्वच्छतागृहे, स्नानगृहे बांधणे, पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय सुविधा, औषधे पुरवणे तसेच जलरोधक मंडप उभारणीकरिता निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनास सादरही करण्यात आला होता.
राज्यातील महायुती सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ३ कोटी ८६ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, याला प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. या निधीतून वारकऱ्यांसाठी सर्व सोयीसुविधा उभारण्यात येणार आहेत. मागील दोन वर्षांपासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पालख्यांना आणि वारकऱ्यांना प्रशासनाच्या माध्यमातून चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
“आषाढी वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. या सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या अहिल्यानगरच्या पालख्यांचा मान महत्त्वपूर्ण आहे. म्हणूनच या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांकरिता चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती मान्य केल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी आभार मानले आहेत.






