DNA मराठी

Varsha Gaikwad : पंतप्रधानांच्या सल्ल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी गाड्यांचा ताफा सोडून मेट्रो, बेस्ट व लालपरीने प्रवास करावा

varsha gaikwad

Varsha Gaikwad : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अखेर देश संकटात आहे हे कबुल करून स्वतःचे अपयश मान्य केले आहे. १२ वर्षांपासून नरेंद्र मोदींनी देशाला वेठीस धरले आहे. निवडणुका, प्रचार व द्वेष पसरण्यापलिकडे भाजपा व मोदी सरकारने काहीही केलेले नाही. अमेरिका-इराण युद्धाचा फटका देशाला बसणार हे माहित असतानाही मोदी सरकारने कोणतेही नियोजन केले नाही, त्याचा मोठा फटका जनतेला बसत आहे. नरेंद्र मोदींच्या चुकांचे ओझे जनतेने का सहन करायचे? असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे.

नरेंद्र मोदींच्या विधानावर प्रतिक्रिया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, नरेंद्र मोदी स्वतः ८ हजार कोटी रुपयांचे विमान वापरतात, महागड्या वस्तू वापरतात, जनतेच्या पैशावर परदेश वाऱ्या करतात आणि पेट्रोल डिझेल कमी वापरा, सोने वर्षभर खरेदी करू नका, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा असे सल्ले जनतेला देत आहेत. नरेंद्र मोदी यांनी व त्यांच्या मंत्र्यांनीच आधीच काटकसर करण्याची सवय लावावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सल्ला प्रमाण मानून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गाड्यांचा ताफा घेऊन फिरण्यापेक्षा मुंबई, पुणे, नागपूर शहरात मेट्रो, सीटी बस व राज्यभरात लालपरीने प्रवास करून इंधन बचतीची सवय लावावी. देशासाठी एवढा त्याग करायला काय हरकत आहे. नरेंद्र मोदींचा सल्ला म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण’, असा आहे. संध्याकाळी जनतेला इंधन बचतीचा उपदेश देऊन दोन तासाने स्वतः मोदीच गाड्यांचा मोठा ताफा घेऊन फिरत होते, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

सलग १२ वर्षांपासून सत्तेत असतानाही नरेंद्र मोदी यांना देशावर येणाऱ्या संकटासाठी नियोजन करता आले नाही, हे मोदी यांचे मोठे अपयश आहे. जनता आधीच महागाईने पिचलेली आहे, त्यात गॅस, इंधनाच्या संकटाने भर घातली आहे. पेट्रोल-डिझेल हे चैन किंवा उधळपट्टी नाही तर दररोजची गरज झालेली आहे. राहुल गांधी यांनी इराण युद्धाच्यावेळीच संकटाचा इशारा दिला होता पण मोदींच्या हुकुमशाही कारभारामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *