DNA मराठी

Tukaram Munde : ‘सैराट’ फेम सल्ल्या प्रकरणानंतर FDA ची मोठी कारवाई; सोलापुरातील नोबेल हॉस्पिटलचे मेडिकल अखेर बंद

arbaz shaikh

Tukaram Munde : ‘सैराट’ चित्रपटातील अभिनेता अरबाज शेखने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सोलापुरातील नोबेल हॉस्पिटलवर गंभीर आरोप केल्यानंतर या प्रकरणात अन्न व औषध विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

उपचारादरम्यान रुग्णांना हॉस्पिटलमधील मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडल्याचा आरोप समोर आल्यानंतर राज्यभरात मोठी चर्चा रंगली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रुग्णांना कोणत्याही परवानाधारक मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट करत कठोर निर्देश जारी केले होते.

या पार्श्वभूमीवर सोलापुरातील नोबेल हॉस्पिटलमधील मेडिकल दुकान अखेर बंद करण्यात आले आहे. या कारवाईनंतर अभिनेता अरबाज शेख याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत, “माझ्यासाठी हा विषय आता संपला आहे,” असे म्हटले. तसेच, रुग्णांच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या सर्वांचे आभार मानत ही कारवाई सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची असल्याचे त्याने नमूद केले.

एफडीएने नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार कोणतेही हॉस्पिटल रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलशी संलग्न मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडू शकत नाही. रुग्णांना त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही परवानाधारक मेडिकलमधून औषधे घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

या संपूर्ण प्रकरणानंतर राज्यातील खासगी रुग्णालयांमधील औषध विक्रीच्या पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, एफडीएकडून अशा प्रकरणांवर अधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *