DNA मराठी

Moshi Incident : मोशीच्या दुर्घटनेत अजूनही 8 ते 9 कामगार अडकल्याची भिती, कामगारांच्या हृदयाचे ठोके ऐकण्यासाठी जवानांनी राबवली मोहीम

moshi incident

Moshi Incident : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर बुधवारी दुपारी कचऱ्याचा प्रचंड डोंगर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेनंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, गुरुवारी सकाळपर्यंत ९ कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. मात्र, अद्याप ८ ते ९ कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सदर प्रशासकीय इमारत तळमजल्यासह तीन मजली आहे. तळमजल्यावर पार्किंग, पहिल्या मजल्यावर कॅन्टीन आणि दुसऱ्या मजल्यावर कॉन्फरन्स रूम आहे. दुर्घटनेच्या वेळी इमारतीत एकूण २३ कामगार उपस्थित होते. त्यापैकी दुसऱ्या मजल्यावरील पाच कामगारांनी प्रसंगावधान राखत तातडीने बाहेर पडण्यात यश मिळवले. त्यानंतर सुरू झालेल्या बचाव मोहिमेत मध्यरात्री ३ वाजेपर्यंत आणखी ९ कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, उर्वरित कामगारांचा शोध घेण्यासाठी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने ‘साउंड व्हायब्रेशन टेस्ट’ करण्यात आली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांकडून हृदयाचे ठोके किंवा कोणताही हालचालीचा प्रतिसाद मिळतो का, याची तपासणी करण्यात आली. मात्र, या चाचणीत आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती समोर आली.

यानंतर पुढील सलग सहा तास जेसीबीच्या मदतीने इमारतीलगत साचलेला कचरा हटविण्याचे काम सुरू ठेवण्यात आले. गुरुवारी सकाळी सुमारे ८.३० वाजता बचाव पथकाने पहिल्या मजल्याच्या भिंतीला मोठे छिद्र पाडून आत प्रवेश केला. या मार्गाने ९ ते १० जवानांनी थेट कॅन्टीनमध्ये प्रवेश करून शोधमोहीम सुरू केली आहे.

अनेक कामगार पहिल्या मजल्यावरील कॅन्टीनमध्ये अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर तळमजल्यावरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांमध्येही कोणी अडकले आहे का, याची तपासणी सुरू आहे. उर्वरित कामगारांचा शोध घेण्यासाठी बचाव पथके युद्धपातळीवर कार्यरत असून, संपूर्ण परिसरात बचावकार्य वेगाने सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *