Ahilyanagar Police: श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने छापा टाकून १० जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ६ लाख ३० हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कशी झाली कारवाई?
अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, भगवान थोरात, सुनिल मालणकर, रमीजराजा आत्तार आणि जालींदर साखरे यांचे पथक अवैध धंद्यांची माहिती काढण्यासाठी रवाना करण्यात आले होते.
२३ नोव्हेंबर २०२६ रोजी हे पथक श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माहिती घेत असताना, बेलापूर गावात बसस्थानकाच्या मागे एका पत्र्याच्या टपरीत काही जण सोरट पानावरील चित्रावर पैसे लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पथकाने पंचांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी जाऊन खात्री केली आणि छापा टाकला.
ताब्यात घेतलेले आरोपी व मुद्देमाल
या छाप्यात पोलिसांनी खालील १० जणांना ताब्यात घेतले:
१. चांगदेव परसराम देखणे (वय ४२, रा. उंबरगाव, ता. श्रीरामपूर)
२. सुरज विलास कुमावत (वय ३२, रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर)
३. विनायक ज्ञानेश्वर मोरे (वय २२, रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर)
४. सतीष अनिल गायकवाड (वय २७, रा. वडारवाडा, बेलापूर, ता. श्रीरामपूर)
५. विकास विठ्ठल गायकवाड (वय २५, रा. उंबरगाव, ता. श्रीरामपूर)
६. गणेश सोपान टाक (वय ४०, रा. टाकगल्ली, बेलापूर, ता. श्रीरामपूर)
७. संकेत श्रीराम कुमावत (वय २८, रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर)
८. सचिन श्याम खाजेकर (वय ३५, रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर)
९. सुनिल विजय खरात (वय २३, रा. खटकळी, पढेगाव रोड, श्रीरामपूर)
१०. संतोष बबन गाडे (वय ३६, रा. कुऱ्हेवस्ती, बेलापूर, ता. श्रीरामपूर)
आरोपींची पंचासमक्ष अंगझडती घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडून ६,३०,८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुढील तपास सुरू
या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे करत आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली.






