चौंडीचे धोंडे जेवण सभापती प्रा. शिंदेयांना देऊन गेले भरभरून कौतुक
Ram Shinde : आई-वडील, भाऊ व जुन्या मैत्रिणी भेटल्याने लेकी खूष होत्या…यानिमित्ताने सर्वांशी सुख-दुःखाचा संवाद झाल्याने त्या गहिवरल्या तर, आख्या गावाने आपला सन्मान केल्याच्या आनंदाने जावई भारावले…ठिकाण होते- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी व निमित्त होते- अधिक मासानिमित्त विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आयोजित केलेल्या धोंडे जेवण सोहळ्याचे. एखाद्या गावाने गावच्या लेक-जावयांसाठी धोंडे जेवणाचा सोहळा आयोजित करण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याने तिचे आयोजन करणारे सभापती प्रा. शिंदे राज्यभरातील 700 वर लेक-जावयांकडून कौतुक मिळवून गेले.
आमच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय सोहळा ठरला असे गौरवोद्गारही व्यक्त करून गेले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301 वी जयंती व अधिक मास यानिमित्त सभापती प्रा. शिंदे यांच्या पुढाकाराने चोंडी ग्रामस्थांनी लेक-जावयांचा सन्मान सोहळा आज रविवारी (14 जून) आयोजित केला होता. कर्जत-जामखेड व अहिल्यानगर शहर व जिल्ह्यातून तसेच पुणे, बारामती, करमाळा, मुंबई अशा अनेक ठिकाणाहून सर्व जाती धर्माचे लेक- जावई आले होते.
700 वर जावई, तेवढ्याच लेकी, त्यांची मुले-मुली व अन्य कुटुंबिय मिळून साडेतीन ते चार हजार जणांचे अनोखे गेट-टुगेदर या निमित्ताने रंगले. या सर्वांसाठी तब्बल 100 किलो पुरण, त्याच्या पोळ्या, पुरणाचा धोंडा, त्यावर साजूक तूप समवेत दूध गुळवणी, कटाची आमटी, भात, भजी, पापड, कुरडई असा जेवणाचा मेनू होता. गावातील महिलांनी यापैकी बहुतांश पुरणपोळ्या लाटल्या. तृप्तीचा ढेकर देत नंतर सर्वांनी आवर्जून प्रा. शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे मनापासून कौतुक केले.
जंगी निघाली मिरवणूक
या अनोख्या सोहळ्यासाठी आलेल्या जावयांना फेटा बांधून व त्यांच्या कपाळी गंधाक्षता लावून औक्षण करण्यात आले. सभापती प्रा. शिंदे यांच्या पत्नी व जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. आशाताई शिंदे यांच्यासह गावातील महिलांनी जावई मंडळींचे स्वागत केले. त्यानंतर त्यांची अहिल्यादेवी यांनी स्थापन केलेल्या अहिल्येश्वर महादेव मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
वैजापूर येथील प्रसिद्ध चौऊश ब्रॉस बँड पथकाने सादर केलेल्या जुन्या-नव्या गाण्यांच्या मेजवानीत व फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेल्या या मिरवणुकीत लेकीबाळींच्या फुगड्या रंगल्या. ब्रँड पथकाद्वारे लाडाचा जावई आला सासरला, परदेशीया ये सच है पिया, नवरी नटली, राम जी की निकली सवारी, झिंग झिंग झिंगाट अशा गाण्यांसह शिवछत्रपतींचा पोवाडा व महाराष्ट्र गीतांचे सादरीकरण दाद मिळवून गेले. यावेळी काही जावयांनी आपल्या मंडळीला (पत्नी) उचलून घेत नृत्योत्सव रंगवला. महादेव मंदिर परिसरात व पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक परिसरात सर्वांचे एकत्रित छायाचित्र घेतले गेले. यावेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग, रील, सेल्फी असे फोटोसेशनही रंगले.
महिलांचे डोळे पाणावले
यानिमित्त झालेल्या सन्मान सोहळ्यात बोलताना अनेक महिलांचे डोळे पाणावले. आम्ही अहिल्यादेवींच्या माहेर गावच्या लेकी असल्याचे सासरी अभिमानाने सांगतो, तो आमचा अभिमान आज लाडका भाऊ रामभाऊ यांच्यामुळे द्विगुणीत झाला. जुन्या मैत्रिणी भेटल्या, त्यांच्याशी गप्पा झाल्या, अधिक मासानिमित्त आईला भेटून तिची ओटी भरता आली आणि गावाने आमच्या ह्यांचा (पती) केलेला सन्मान आमचा आनंद वाढवून गेला, अशा भावना यावेळी महिलांनी व्यक्त केल्या. लताबाई गावडे-देवकर, उषा लोखंडे, शार्दुल निंबाळकर, सुरेखा उबाळे व अन्य महिलांना बोलताना गहिवरून आले. जावई मंडळीही भारावून गेले होते. त्यांच्यावतीने भावना व्यक्त करताना नाना करंजुले म्हणाले, चौंडीचा दाजी म्हणून आमच्या गावात आम्हाला कौतुक मिळतेच. मात्र आज चौंडीने केलेला सन्मान आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला.
भावाचे कर्तव्य केले : प्रा. शिंदे
यावेळी बोलताना सभापती प्रा. शिंदे यांनी गावच्या लेकींचा भाऊ असल्याच्या भावनेतून हा धोंडे सन्मान सोहळा केला असल्याचे सांगितले. गावच्या लेकींनी माहेर व सासरची नाती जपल्याचा आनंद आहे. दोन्ही कुटुंबे सांभाळताना चोंडीचा लौकिक वाढवला आहे. सभापती पदाच्या माध्यमातून सुमारे 5 हजार कोटीची अनेक विकास कामे करून चोंडीचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले त्यांचे जन्मगाव चौंडी हे जगाच्या नकाशावर आगळेवेगळे गाव करण्याचा प्रयत्न आहे. गावच्या लेक-जावयांनी कुटुंबीय व मित्रमंडळींसह नियमितपणे चोंडीला येऊन या गावच्या विकासात सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या सोहळ्यास गावातील माजी सरपंच व मान्यवर मंडळी उपस्थित होते. अशोक देवकर, अभिमन्यू सोनवणे, पांडुरंग उबाळे, बाबासाहेब सोनवणे, भाऊसाहेब उदमले, शशिकांत देवकर, गुलाब शेख, रवींद्र जगदाळे, सतीश लहामटे, दत्ता शिंदे, शिवाजी देवकर आदींसह गावातील युवकांनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले. जावयांना पसंतीनुसार पॅन्ट शर्ट, पायजमा, धोतर व लेकींनाही पाच वार, सहा वार, नऊवार व काठ पदरी साड्या त्यांच्या पसंतीनुसार भेट म्हणून दिल्या गेल्या. बत्तासे व अनारसे समवेत तांब्याचे दीपदानही अधिक मासानिमित्त दिले गेले. जिल्ह्यात पहिल्यांदाच आयोजित हा वेगळा सोहळा संस्मरणीय ठरला.
रेव्ह पार्टी करणाऱ्यांना धोंड्याचे महत्त्व काय?
सभापती प्रा. शिंदे यांनी आयोजित केलेल्या धोंडे जेवण सोहळ्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी टीका केली होती. लेक-जावयांना रोजगाराची गरज आहे, धोंडे जेवणाची नाही असे भाष्य त्यांनी केले होते. त्यावर प्रतिउत्तर देताना सभापती प्रा. शिंदे म्हणाले, रेव्ह पार्टी करणाऱ्यांना धोंडे जेवणाचे महत्त्व काय समजणार अशा सूचक शब्दात त्यांनी खडसे यांच्यासह अन्य विरोधकांना टोला लगावला.






