DNA मराठी

Pune Police : ‘रक्षकच बनला भक्षक!’ मुलगा होत नाही म्हणून PSI पतीचा पत्नीचा गळा आवळला अन् मुलीला शेतात मारून टाकलं

crime

Pune Police : कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यावरच पत्नीचा छळ आणि तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. ‘मुलगा होत नाही’ या कारणावरून पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक धनाजी रंगराव टोणे आणि त्यांची आई अनुसया रंगराव टोणे यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न आणि बेकायदेशीर गर्भपातासह गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत.

हडपसरमधील शेवाळेवाडी येथील पी. एस. व्हिला परिसरात राहणाऱ्या धनाजी टोणे यांच्यावर पत्नीचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तसेच गर्भातील बाळ मुलगी असल्याचे समजल्यानंतर गर्भलिंग तपासणी करून पत्नीच्या इच्छेविरुद्ध गर्भपात घडवून आणल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारीनुसार, १९ मे २०१९ रोजी जतमध्ये धनाजी टोणे आणि संबंधित महिलेचा विवाह झाला. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच पत्नीवर नोकरी करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. २०२० मध्ये महिला पहिल्यांदा गर्भवती राहिली. त्यावेळीही तिच्यावर मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच, गर्भावस्थेच्या सातव्या महिन्यात तिच्या अंगावर बसून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

२७ जानेवारी २०२२ रोजी मुंबईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धनाजी टोणे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. या कारवाईमुळे आलेला रागही आणि पत्नीवर काढला. धनाजी यांनी पत्नीचे डोके फरशीवर आपटल्याने ती गंभीर जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यानंतर धनाजी टोणे यांची पुण्यात बदली झाली. मार्च २०२५ मध्ये त्यांची पत्नी दुसऱ्यांदा गर्भवती राहिली. मात्र, यावेळीही तिचा छळ सुरू राहिला.

१३ मे रोजी धनाजी टोणे आणि त्यांच्या आईने महिलेला एका गावातील शेतातील घरात नेले. तेथे तिची कथितरित्या बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करण्यात आली.

१९ मे रोजी गर्भातील बाळ मुलगी असल्याचे समजल्यानंतर गर्भपात करण्यासाठी महिलेवर दबाव आणण्यात आल्याचा आरोप आहे. तिच्या माहेरच्या कुटुंबीयांवरही यासाठी दबाव टाकण्यात आला. महिलेच्या वडिलांनी गर्भपातास विरोध केल्यानंतर धनाजी टोणे यांनी पोलिस अधिकारी असल्याचा धाक दाखवत धमक्या दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

अखेर २३ मे रोजी वाघोलीतील समर्थ हॉस्पिटलमध्ये महिलेच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर महिलेची प्रकृती खालावली. त्यानंतर ती कशीतरी माहेरी पोहोचली.

पतीकडून होणारा छळ थांबत नसल्याने महिलेने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने तिने हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर हे प्रकरण मांजरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून, पोलिस निरीक्षक इरफान नदाफ तपास करीत आहेत.

दरम्यान, आपल्याविरोधात पोलिस कारवाई होण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर धनाजी टोणे यांनी तातडीने सुट्टी घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, तपासातून पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *