DNA मराठी

Varsha Turkar Murder : गोंदियातील वर्षा तुरकर प्रकरणाचा धक्कादायक उलगडा! पतीच्या प्रेमसंबंधाला वैतागून पत्नीने दिली 13 लाखांची सुपारी

varsha turkar murder

Varsha Turkar Murder : पुण्यातील एअर होस्टेस वर्षा तुरकर यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील बोंडराणी जंगल परिसरात झालेल्या या निर्घृण हत्येचा पोलिसांनी उलगडा केला असून, या हत्येमागे धक्कादायक कारण समोर आले आहे. पतीचे दुसऱ्या महिलेसोबत असलेले कथित प्रेमसंबंध सहन न झाल्याने पत्नीनेच 13 लाख रुपयांची सुपारी देऊन वर्षा यांची हत्या घडवून आणल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

या प्रकरणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हत्येचा कट आखण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे. कारमधील GPS ट्रॅकिंगच्या माध्यमातून वर्षा आणि त्यांचा मित्र नेमके कुठे आहेत, याची माहिती आरोपींपर्यंत पोहोचवली जात होती.

नेमकं प्रकरण काय?

वर्षा धुरनलाल तुरकर (वय 35) या पुण्यातील धानोरी परिसरात राहत होत्या. त्या विमान कंपनीत एअर हॉस्टेस म्हणून कार्यरत होत्या. मूळच्या मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील किन्ही गावच्या असलेल्या वर्षा दिवाळीच्या सुट्टीनिमित्त आपल्या माहेरी आल्या होत्या.

14 नोव्हेंबर 2026 रोजी नितेश ऊर्फ नितीन अग्रवाल हा वर्षा यांना भेटण्यासाठी आला होता. त्यानंतर दोघेही तिरोडा परिसरात फिरण्यासाठी गेले. परत येताना गोंदिया जिल्ह्यातील बोंडराणी येथील शिवमंदिराजवळील निर्जन जंगल परिसरात त्यांनी आपली कार थांबवली.याच वेळी दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी वर्षा यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यांच्या पोटावर आणि पाठीवर गंभीर वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सुरुवातीला लुटमारीचा बनाव?

हल्ल्यानंतर सुरुवातीला अज्ञात लुटारूंनी हल्ला केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र वर्षा यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित असल्याने पोलिसांना या घटनेबाबत संशय आला. वर्षा यांच्या कुटुंबीयांनीही या घटनेबाबत शंका उपस्थित केली होती. त्यानंतर गोंदिया पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सहा विशेष पथके तयार करून घटनास्थळापासून तिरोडा, खैरलांजी, वाराशिवनी, बालाघाट आणि गोंदिया परिसरातील सुमारे 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले.

या तपासात नितेश यांच्या कारचा एका दुचाकीवरून तीन जण पाठलाग करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

13 लाखांची सुपारी

पोलिसांच्या तपासानुसार, नितेश अग्रवाल आणि वर्षा तुरकर यांच्यातील जवळीक नितेशची पत्नी मोना अग्रवाल हिला खटकत होती. याच कारणातून तिने शेजारी राहणाऱ्या कुणाल कुंभलकर याची मदत घेतल्याचा आरोप आहे. कुणालने शाहरुख खान पठाण याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर वर्षा यांच्या हत्येसाठी तब्बल 13 लाख रुपयांची सुपारी निश्चित करण्यात आली. शाहरुखने इमरान शेख, नलेन शेख आणि क्रिश राऊत या तिघांवर हत्येची जबाबदारी सोपवल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात छत्तीसगडमधील एका व्यक्तीकडून मोना हिला 13 लाख रुपये मिळाल्याची माहितीही समोर आल्याचे वृत्त आहे.

GPS ट्रॅकिंगच्या मदतीने आखला कट!

या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कारच्या GPS ट्रॅकिंग यंत्रणेचा वापर. नितेश ज्या कारचा वापर करत होता, ती कार त्याची पत्नी मोना हिच्या नावावर होती. या कारमध्ये टोयोटा आय-कनेक्ट (Toyota i-Connect) ही GPS ट्रॅकिंग सुविधा होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, मोनाने या सुविधेचा आयडी आणि पासवर्ड आरोपींच्या मोबाईलमध्ये लॉगिन करून दिला होता. त्यामुळे आरोपींना नितेशच्या कारचे लोकेशन मिळत होते. नितेश आणि वर्षा बोंडराणी येथील जंगल परिसरात पोहोचल्याची माहिती मिळताच हल्लेखोरांनी तिथे धाव घेतली आणि वर्षा यांच्यावर हल्ला केला. अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करून हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.

चार जणांना अटक

गोंदिया पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इमरान करीम शेख याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत या हत्येमागील कथित कट उघड झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात मोना नितेश अग्रवाल, कुणाल कुंभलकर, शाहरुख खान पठाण आणि इमरान करीम शेख या चौघांना अटक झाल्याचे वृत्त आहे. तर नलेन शेख आणि क्रिश राऊत हे दोन आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *