Amol Kolhe : राज्यातील राजकारणात ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. ऑपरेशन तुतारी अंतर्गत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पक्षाची साथ सोडणार असून एनडीएला लोकसभेत समर्थन देणार असल्याची चर्चा सुरू आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत ऑफर आली तर विचार करू असं विधान केल्याने अमोल कोल्हे पक्षाची साथ सोडणार आल्याचे सांगितलं जात होतं मात्र आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम देत आपण शरद पवार यांच्या नेतृत्वासोबत ठाम असल्याचे स्पष्ट केले.
कोल्हे म्हणाले की, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी “ऑफर आली तर विचार करू” असे म्हटले होते. हे विधान केवळ रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात होते, राजकीय प्रवेशाशी त्याचा कोणताही संबंध नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावरील आपली निष्ठाही व्यक्त केली. “पवार साहेब सांगतील तेच आमचे धोरण आणि ते बांधतील तेच तोरण,” असे म्हणत पक्षातील सर्व खासदार एकत्र असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच, आपण कुठेही जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनीही ‘ऑपरेशन तुतारी’च्या चर्चा फेटाळून लावत सर्व खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने काम करत असल्याचे सांगितले. विरोधी पक्षाच्या खासदारांना विकासकामांसाठी निधी मिळण्यात अडचणी येत असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.






