DNA मराठी

Maharashtra Rain Alert: नगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट

rain

Maharashtra Rain Alert: भारतीय हवामान विभागाने ८ जुलै रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यातील नद्यांमधील वाढता विसर्ग आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या तसेच धरण परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.

सध्या जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये विसर्ग सुरू असून आज दुपारी १२ वाजता भीमा नदीच्या दौंड पुलावरून ८५ हजार ७८४ क्युसेक, तर गोदावरी नदीपात्रात नांदूर मध्यमेश्वर धरणातून १५ हजार २४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अहिल्यानगर, पुणे व नाशिक जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्यास भीमा व गोदावरी नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरण परिसरात येणाऱ्या पर्यटकांनी तसेच प्रवरा व मुळा नदीकाठावरील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी मेघगर्जना, वीज चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली अथवा जाहिरात फलकांच्या परिसरात थांबू नये. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. गडगडाटी वादळादरम्यान कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये तसेच विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल, टॉवर्स, ध्वजांचे खांब, दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, ट्रान्सफॉर्मर तसेच अधांतरी लटकणाऱ्या केबल्सपासून दूर राहावे. वीज चमकत असताना मोकळ्या जागेत असल्यास गुडघ्यावर बसून हातांनी कान झाकावेत, डोके दोन्ही गुडघ्यांमध्ये ठेवावे आणि जमिनीशी कमीतकमी संपर्क ठेवावा. जुनाट, मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतींमध्ये आश्रय घेऊ नये.

धरण व नदी परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी पाण्यात उतरू नये तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. नदी, ओढे व नाल्यांतील पाणीपातळी वाढत असल्यास प्रवाहापासून दूर राहून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. पुलांवर किंवा बंधाऱ्यांवरून पाणी वाहत असल्यास ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन किंवा दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे आणि घाट रस्त्याने प्रवास टाळावा. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची व जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नजीकच्या पोलीस ठाणे, तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाशी ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४०, ११२ किंवा १०७७ या टोल-फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *