Ladki Bahin Yojana : राज्यातील लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेत सध्या मिळणारे १५०० रुपये वाढवून २१०० रुपये करण्याची शिफारस पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने केली आहे. मात्र, याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.
राज्यातील लाखो महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळते. आता ही मदत २१०० रुपयांपर्यंत वाढवण्याची चर्चा सुरू झाली आहे.
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने तयार केलेल्या अहवालात महागाई आणि वाढता खर्च लक्षात घेऊन अशा योजनांमधील आर्थिक मदतीचा वेळोवेळी आढावा घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार लाभार्थींना मिळणारी रक्कम वाढवण्याचाही विचार करण्यात यावा, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अहवालात ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याचेही सांगण्यात आले आहे. महिलांच्या बँक खात्यातील बचत वाढली असून, घरखर्च, आरोग्य आणि मुलांच्या शिक्षणासाठी या पैशांचा मोठा उपयोग होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
मात्र, १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्याचा कोणताही निर्णय राज्य सरकारने अद्याप घेतलेला नाही. त्यामुळे सध्या ही केवळ शिफारस असून, सरकारच्या अधिकृत निर्णयानंतरच याबाबत अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.






