Sujay Vikhe : जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि ‘एसआयआर’च्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मोर्चावरून माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी खासदार निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मोर्चे काढून राजकारण करण्यापेक्षा आधी शेतकऱ्यांच्या बांधावर जा आणि त्यांची परिस्थिती समजून घ्या,असा थेट टोला विखे यांनी लगावला.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्याऐवजी इकडे-तिकडे मोर्चे काढत फिरणे ही फालतूगिरी आहे. ही परिस्थिती हास्यास्पद आहे. जिल्ह्याने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी आधी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळाची वस्तुस्थिती पाहावी, अशी घणाघाती टीका विखे यांनी केली.
दुष्काळाच्या परिस्थितीत केंद्र सरकारकडून मदत मिळवता येते का, यासाठी प्रयत्न करणे हे लोकप्रतिनिधींचे काम आहे. मात्र ते न करता सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांशी थेट संबंध नसलेल्या विषयांवर रस्त्यावर उतरून मोर्चे काढले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
शेतकऱ्यांना सध्या प्रत्यक्ष मदतीची आवश्यकता असताना त्यांचे प्रश्न सोडून अन्य विषयांमध्ये वेळ घालवला जात असल्याचे सांगत विखे यांनी लंके यांच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यापेक्षा मोर्चे काढण्यात धन्यता मानली जात असेल, तर त्यातून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, असे विखे म्हणाले.
महाविकास आघाडीच्या प्रस्तावित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विखे यांनी केलेल्या या आक्रमक टीकेमुळे अहिल्यानगरमधील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.






