Gyanesh Kumar : देशातील निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी असलेल्या भारतीय निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदी असलेल्या मुख्य निवडणूक आयुक्तांना (CEC) नेमका किती पगार मिळतो, तसेच त्यांना कोणकोणत्या सरकारी सुविधा मिळतात, याबाबत नागरिकांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. सध्या ज्ञानेश कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. त्यांनी 19 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.
ज्ञानेश कुमार हे 1988 बॅचचे केरळ कॅडरचे IAS अधिकारी राहिले आहेत. केंद्र आणि केरळ सरकारमध्ये विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर ते निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त म्हणून आले आणि त्यानंतर त्यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली.
महिन्याला अडीच लाख रुपये मूळ वेतन
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वेतनाबाबत सध्या उपलब्ध माहितीनुसार, CEC यांना दरमहा 2.50 लाख रुपये मूळ वेतन मिळते. हे वेतन कॅबिनेट सचिवाच्या वेतनाच्या बरोबरीचे आहे. यापूर्वी CEC आणि निवडणूक आयुक्तांचे वेतन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वेतनाशी जोडलेले होते. मात्र CEC चे आर्थिक पॅकेज केवळ 2.50 लाख रुपयांच्या मूळ पगारापुरते मर्यादित नाही. पदाच्या स्वरूपानुसार विविध भत्ते आणि सरकारी सुविधा त्यांना मिळतात.
दरमहा 34 हजार रुपयांचा भत्ता
मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांना दरमहा 34 हजार रुपयांचा भत्ता मिळतो. या भत्त्यावर मिळणारी आयकर सवलत न घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने यापूर्वी स्वेच्छेने घेतला होता. म्हणजेच, मूळ वेतनाव्यतिरिक्त हा भत्ताही CEC यांच्या सेवाशर्तींचा महत्त्वाचा भाग आहे.
सरकारी बंगला आणि इतर सुविधा
मुख्य निवडणूक आयुक्त हे देशातील अत्यंत महत्त्वाच्या घटनात्मक पदांपैकी एक असल्याने त्यांना पदाच्या दर्जानुसार अनेक सरकारी सुविधा दिल्या जातात.
यामध्ये सरकारी निवासस्थान, अधिकृत वाहन आणि चालक, सुरक्षा व्यवस्था यांचा समावेश होतो. तसेच वीज, पाणी आणि दूरध्वनी यांसारख्या सुविधाही नियमानुसार मोफत किंवा अनुदानित दरात उपलब्ध होतात. स्वतःसह कुटुंबीयांसाठी वैद्यकीय उपचार आणि आरोग्यविषयक सुविधाही मिळतात.
कुटुंबासह LTC ची सुविधा
CEC यांना स्वतःसाठी, पत्नी/पतीसाठी तसेच आश्रित कुटुंबीयांसाठी Leave Travel Concession (LTC) ची सुविधा मिळते.
पूर्वी वर्षातून तीन वेळा LTCची सुविधा उपलब्ध होती. मात्र निवडणूक आयोगाने 2022 मध्ये मितव्ययाचा निर्णय घेत ही सुविधा स्वेच्छेने वर्षातून एकदा घेण्याचा निर्णय केला होता. तसेच या भत्त्यावरील आयकर सवलतीचा लाभ न घेण्याचेही ठरवण्यात आले होते.
निवृत्तीनंतरही मिळतात लाभ
मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या सेवाशर्तींमध्ये निवृत्तीशी संबंधित काही लाभांचाही समावेश आहे. यामध्ये पेन्शन आणि इतर निवृत्तीविषयक लाभांचा समावेश होतो. तसेच कायद्यानुसार CEC आणि Election Commissioners यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या समकक्ष दर्जा आणि संबंधित सेवाशर्ती लागू होतात. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर अर्जित रजेच्या 50 टक्के रजेचे रोखीकरण करण्याची तरतूदही आहे.
ज्ञानेश कुमार यांची एकूण संपत्ती किती?
ज्ञानेश कुमार यांच्या एकूण वैयक्तिक संपत्तीबाबत अधिकृत आणि सार्वजनिक स्वरूपात निश्चित माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे सोशल मीडिया किंवा इतर ठिकाणी प्रसिद्ध होणाऱ्या आकडेवारीकडे अधिकृत माहिती म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही.त्यांच्या मालमत्तेशी संबंधित माहिती सार्वजनिक करण्याबाबत यापूर्वी प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र त्यावरून ज्ञानेश कुमार यांची नेमकी नेटवर्थ किती आहे, असा निश्चित निष्कर्ष काढता येत नाही.
CEC पदाचे महत्त्व काय?
भारताच्या लोकशाही व्यवस्थेत मुख्य निवडणूक आयुक्तांचे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा तसेच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांशी संबंधित घटनात्मक जबाबदाऱ्या भारतीय निवडणूक आयोगाकडे आहेत.
CEC आणि इतर निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ सहा वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जे आधी येईल तेवढा असतो. मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे कठोर आहे.






