Balasaheb Thorat : आपल्या न्याय्य मागण्यांसाठी नाशिकहून पायी मुंबईपर्यंत आलेले आदिवासी विद्यार्थी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन या मुख्यालयात मुक्कामी थांबले होते. मात्र मध्यरात्रीपासून पोलीस बेकायदेशीर रित्या, टिळक भवनमध्ये घुसून या विद्यार्थ्यांवर दबाव निर्माण करत आहेत, त्यांना धमकावत आहेत आणि चुकीच्या पद्धतीने अटकेची कारवाई केली जात असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
हे अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह आहे असा उल्लेख करत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
आपल्या हक्कांसाठी शांततेच्या मार्गाने आवाज उठवणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांशी सरकारने संवाद साधला पाहिजे. त्यांच्या समस्या ऐकल्या पाहिजेत. त्याऐवजी त्यांना पोलीस बळाच्या जोरावर दडपण्याचा प्रयत्न कशासाठी? लोकशाहीत प्रश्न विचारणे गुन्हा नाही. न्याय मागणे गुन्हा नाही. आंदोलन करणे गुन्हा नाही.
महाराष्ट्र हा कायद्याचा, लोकशाहीचा आणि सामाजिक न्यायाचा सन्मान करणारा प्रदेश आहे. त्या महाराष्ट्रात न्याय मागणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद करण्याऐवजी, सरकार त्यांना बेड्या ठोकत आहे.
सरकारच्या या दडपशाहीच्या भूमिकेचा आम्ही तीव्र निषेध करतो. आदिवासी विद्यार्थ्यांच्या लढ्यात आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी आहोत असं यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले.






