Manoj Jarange : बावनकुळे यांच्या डोळ्याला पाणी आल्याच्या प्रसंगाचा उल्लेख करत, मनोज जरांगे यांनी मंत्री सिरसाठ यांच्यावर टीका केली. “तुम्ही परळीच्या टोळीच्या नादी लागून हे सगळं केलं. यापुढे त्या टोळीच्या नादी लागू नका,” असा इशारा त्यांनी दिला.
“माझ्या समाजाच्या विरोधात कुणी आलं तर मी सोडत नाही,” असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सिरसाठ यांनी केलेली चूक माफ केली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
आईचा उल्लेख केल्याबद्दल त्यांनी वेगळी भूमिका मांडली. “तुम्ही तुमच्या आईचं नाव घेतलं. आई ही आई असते. माझ्यावर मराठीचे संस्कार आहेत. त्यामुळे यावेळी तुम्हाला माफ करतो मात्र पुढे अशी चूक झाली तर सोडणार नाही,” असं देखील मनोज जरांगे म्हणाले.
रद्द करण्यात आलेले प्रमाणपत्र पुन्हा देण्याची मागणीही त्यांनी केली. “28 ऑगस्टच्या आत तुम्ही केलेली चूक दुरुस्त करा. रद्द केलेले प्रमाणपत्र पुन्हा द्या, अन्यथा सोडणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
“तुम्ही आमच्या मागे लागलात म्हणून आम्ही तुमच्या मागे लागलो,” असे म्हणत त्यांनी यापुढे वैयक्तिक व्यंग किंवा टीका करणार नसल्याचे सांगितले. मात्र, संबंधितांनी केलेली चूक सुधारावी, अशी मागणी त्यांनी केली.
या वक्तव्यामुळे बावनकुळे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. संबंधितांकडून या आरोपांवर काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.






